धर्मसिन्धु सुबोध व्हावा येवढ्यासाठी मी जे कार्य हाती घेतले आहे, त्याकरिता विघ्नेशाला वंदन करतो.
करुणेचा सागर, तत्काळ संतुष्ट होणारा, दीनांचे मनोरथ पुरविणारा, पातकांच्या राशीरूपी समुद्राचे शोषण करणारा, लक्ष्मीरूपी रुक्मिणीची बुद्धि आकर्षण करणारा आणि प्रत्येक प्राणिमात्राच्या ह्रदयात राहात असूनही ज्याच्या चरित्राचा ठाव लागणे कठीण आहे, असा जो परम पुरुष श्रीविठ्ठल, त्याला मी वन्दन करतो. १ पातकांचा नाश करून, भक्तांचे कल्याण करणारा जो शंकर त्याला मी नमस्कार करतो. तो शंकर आपला वरदहस्त रात्रंदिवस (अक्षयी) माझ्या मस्तकावर ठेवो. पार्वती, गणपती, ब्रह्मदेव आणि सरस्वती- या सर्वांचे मी तत्काळ नमन करतो २. श्रीलक्ष्मी, गरुड, शेष, प्रद्युम्न, नारायण, मारुति, सूर्य, चंद्र, मंगल, बुध, गुरु, शुक्र, शनि, कार्तिक स्वामी, इन्द्रादि सर्व देव, गुरु, माता, अनंत नावाचा बाप व थोर असे जे माधवादि धर्मशास्त्राचे निबंधकार त्या सर्वांना प्रणिपात करून, मी धर्माब्धिसार या नावाचा ग्रंथ रचितो. या ग्रंथात पाल्हाळ करण्यात येणार नसून, संक्षेपाचाही आश्रय करण्यात येणार नाही.
निर्णयसिंधु वगैरे प्राचीन ग्रंथातली मूळ वचने सोडून, निर्णयसिंधूच्या क्रमानेच त्या ग्रंथातील वचनांचे प्रसिद्ध असे अर्थ, अज्ञानी जनांना समजण्यासाठी मी लिहितो.