सूर्यास्तानंतर तीन मुहूर्तपर्यंतची म्हणजे प्रदोषकालव्यापिनी तिथि नक्ताला ग्राह्य आहे. दोन दिवसातून ज्या दिवशी वरच्याप्रमाणे व्याप्ति असेल, अथवा वरिल काली जरी अंशतः व्याप्ति असली, तरी तोच दिवस घ्यावा. भोजन करणे ते सूर्यास्तानंतर तीन घटका संध्याकाळ असतो, तो उलटल्यावर करावे. कारण, संध्याकाळी भोजन, निद्रा, मैथुन आणि अध्ययन ही कर्मै वर्ज्य आहेत. यति, ज्याला मुलगा झाला नाही असा, विधुर आणि विधवा यांना रात्री जेवणाचा निषेध असल्यामुळे, त्यांनी सायाह्नव्यापिनी तिथीला, दिवसाच्या आठव्या भागात नक्त करावे. तिथि जर दोन दिवस प्रदोषव्यापिनी असली, तर ती दुसर्या दिवसाची घ्यावी. दोन दिवस नसल्यास, दुसर्या दिवशी सायान्हकाळी दिवसाच्या आठव्या भागात नक्त करावे, रात्री करू नये. दोन्ही दिवशी सारखीच व्याप्ति असल्यास दुसरा दिवस घ्यावा. कमी अधिक प्रमाणाने असल्यास, पहिल्या दिवशी जर पूजाभोजनादिक संपूर्ण होईपर्यंत असेल, तर पहिल्याच दिवसाची तिथि घ्यावी, आणि तसे नसल्यास साम्यपक्षास अनुसरून दुसर्याच दिवसाची घ्यावी. पहिल्या दिवशी दुसर्या दिवसापेक्षा अधिक काळ व्याप्ति आहे, म्हणूनच केवळ पहिल्या दिवसाची घेऊ नये. रविवार संक्रांति वगैरे दिवशीही नक्त व्रताचा भोजनविधि करावा. रविवार, संक्रांति वगैरे दिवशी रात्रीच्या इच्छाभोजनाचा निषेध सांगितला आहे. विधियुक्त भोजनाचा निषेध सांगितलेला नाही. एकादश्यादिकांच्या उपासाच्या ऐवजी करण्याचे जे नक्त ते उपासाच्या दिवसाचा जो निर्णय सांगितला आहे, त्याप्रमाणे करावे. अयाचितकर्म हे अहोरात्र साध्य असल्यामुळे, त्याचा निर्णय उपासाप्रमाणेच समजावा. पित्र्यकर्मे जी अपराह्नकाळी करायची, त्यांचा निर्णय पित्र्यकर्मनिर्णयाच्या प्रकरणांत जो सांगितला आहे तो पहावा. एकभुक्त, नक्त, अयाचित आणि उपवास ही पूर्व तिथीला केल्यावर, दुसर्या दिवशी तिथि संपल्यावर त्याचे पारणे करावे. दुसर्या दिवशी जर तिसर्या प्रहरापर्यंत तिथि संपत नसली, तर सकाळी पारणे करावे असा माधवाचा सर्वत्र निर्णय आहे. याप्रमाणे पाचवा उद्देश येथे संपूर्ण झाला.