दिवसाच्या पांच भागापैकी जो पहिला तो प्रातःकाल, दुसरा संगवकाल, तिसरा मध्याह्नकाल, चौथा अपराण्हकाल आणि पाचवा सायान्हकाल
सूर्यास्तानंतर तीन मुहूर्तापर्यंत प्रदोषकाल असतो. एक भुक्तकर्माला मध्यान्हव्यापिनी तिथि ग्राह्य समजावी. त्यात देखील दिवसाचा अर्ध भाग गेल्यावर, तीस घटकांचे मध्यम दिनमान धरून, सोळाव्या घटकेच्या आरंभापासून अठराव्या घटकेच्या अखेरीपर्यंत तीन घटका हाच मुख्य भोजनकाल होय. त्यापुढे सायंकाळपर्यंतचा जो काळ तो गौण होय. तिथीच्या व्याप्तीबद्दल निरनिराळी जी सहा मते आहेत, ती येणेप्रमाणे -
१. पूर्वदिवशी मुख्यकाळी व्याप्ति
२. दुसर्या दिवशी व्याप्ति.
३. दोन्ही दिवशी व्याप्ति.
४. दोन्ही दिवशी व्याप्तीचा अभाव.
५. दोन्ही दिवशी अंशतः सारखी व्याप्ति. आणि
६. दोन्ही दिवशी कमी अधिक अंशाने व्याप्ति. पुर्व दिवशी जर मुख्य काली ग्राह्य तिथि असेल तर पूर्व दिवस घ्यावा, आणि दुसर्या दिवशी असेल तर दुसरा दिवस घ्यावा हे उघडच आहे. दोन्ही दिवशी जर पूर्ण व्याप्ति असेल, तर युग्मवाक्यावरून निर्णय करावा. दोन्ही दिवशी जर व्याप्तीचा अभाव असेल, तर गौणकाली व्याप्ति आहे यास्तव, पूर्व तिथिच घ्यावी. दोन्ही दिवशी जरी अंशतःच व्याप्ति असेल, तरी पूर्वतिथिच घ्यावी. कमी अधिक प्रमाणाची व्याप्ति असल्यास किंवा दोन्ही दिवशी कर्मसमाप्तिपुरतीच तिथी असल्यास युग्मवाक्यावरून तिथिनिर्णय करावा. कर्मसमाप्तिपुरती जरी तिथि नसेल तरी पूर्वीचीच घ्यावी. याप्रमाणे एकभुक्ताचा निर्णय झाला.