विकृति तीन प्रकारच्या आहेत.
१. आग्रयण, चातुर्मास्य, वगैरे नित्यविकृति
२. जातेष्ट्यादि नैमित्तिक विकृति, आणि
३. सौरी वगैरे काम्य विकृति. ही कृत्ये पुरुषार्थाची आहेत. याचप्रमाणे यज्ञाच्या अंगभुत अशा ज्या विकृति आहेत, त्याही नित्य व नैमित्तिक अशा दोन प्रकारच्या आहेत. या विकृति तत्काल अथवा दोन दिवस कराव्या असा विकल्प आहे. त्याप्रमाणेच शुक्लपक्षात जी देवनक्षत्रे असतील, त्या नक्षत्री ह्या कराव्यात असाही विकल्प आहे. पर्वदिवशी जर करणे असेल, तर अपराह्णसंधि असताना संधिदिवशी 'तत्कालिक' अथवा 'दोन दिवसांची' विकृति करून, प्रकृतीचे अन्वाधान करावे. संधि जर मध्याह्नी अथवा पूर्वाह्णी असेल, तर संधीच्या दिवशी प्रकृति समाप्त करून 'तत्कालिक' विकृतिच करावी. कृत्तिकांपासून विशाखांपर्यंत जी चौदा नक्षत्रे, त्यांना देवनक्षत्रे म्हणतात. आग्रयणाची विशेष माहिती दुसर्या परिच्छेदात सांगेन. अन्वारम्भणीया इष्टि चतुर्दशीलाच करावी. याप्रमाणे विकृतीच्या सामान्यनिर्णयाचा सव्विसावा उद्देश येथे संपला.