दिवसाचे पाच भाग केले असता, त्यातल्या अपराह्ण नावाच्या भागात जर व्याप्ति असेल, तर ती अमावास्या श्राद्धाला ग्राह्य होय. पहिल्या दिवशी किंवा दुसर्या दिवशी जर अपराह्णी पूर्ण अथवा भागशः व्याप्ति असेल, तर तीच घ्यावी. दोन्ही दिवशी जर अपराह्णी कमीअधिक अशी अंशतः व्याप्ति असेल, तर ज्या दिवशी अधिक व्याप्ति असेल तो दिवस घ्यावा. त्या काळी जर दोन दिवस समान व्याप्ति असेल, तर तिथिक्षय असल्यास पहिली तिथि घ्यावी, तिथिवृद्धि किंवा तिथिसाम्य असल्यास दुसरी घ्यावी. समान व्यापति असताना तिथीची वृद्धि, क्षय किंवा साम्य यांची उदाहरणे - चतुर्दशी १९ घ., अमावास्या २३ घ., व दिनमान ३० घ., या ठिकाणी दोन्ही दिवशी सारखीच पाच घटका एकदेशव्याप्ति आहे व चतुर्दशीपेक्षा अमावास्येची चार घटकांनि वृद्धि आहे, म्हणून दुसर्या दिवसाचीच घ्यावी. चतुर्दशी २३ घ. व अमावास्या १९ घ. असता येथे एक घटका सारखी व्याप्ति आहे व चार घटकांनी तिथीचा क्षय आहे यास्तव पूर्व दिवसाची घ्यावी. चतुर्दशी २१ घ. व अमावास्याही २१ घ. आहे, अशा वेळी तीन घटकांनी दोन्ही दिवशी अंशतः सारखी व्याप्ति असून, तिथीची वृद्धि व क्षय यातील काहीही नाही, तर समत्व आहे, म्हणून दुसर्या दिवसाची घ्यावी. पूर्वाह्णी व अपराह्णी अशी जर दोन दिवशी व्याप्ति असेल, तर येथे तिथीची वृद्धि असल्याने दुसर्या दिवसाची घ्यावी. ज्या वेळी दोन्ही दिवसा अपराह्णकाळी व्याप्ति नसेल, त्यावेळी गृह्याग्नि व श्रौताग्नि यांच्या उपासकांनी 'सिनीवाली' या नावाची चतुर्दशीमिश्रित अशी पहिल्या दिवसाची घ्यावी. जे अग्निहोत्री नसतील त्यांनी, व स्त्री व शूद्रादिक यांनी 'कुहु' नावाची प्रतिपदेने मिश्रित अशी दुसर्या दिवसाची घ्यावी. हा जो माधवाचार्यांना संमत असलेला दर्शनिर्णय, तोच प्रायः सर्व शिष्टसंमत आहे. या बाबतीत पुरुषार्थचिंतामणीत मात्र जे निराळे मत दिले आहे, ते येणे प्रमाणे - अग्नि बाळगणारे ऋग्वेदी व तैत्तिरीय शाखेचे जे कोणी असतील त्यांनी, अपराह्णकाळी व्याप्तीचा अभाव असताही इष्टिदिनाच्या आदल्या दिवशीच दर्शश्राद्ध केले पाहिजे. दोन दिवस जर संपूर्णपणे अपराह्णकाळी व्याप्ति असेल, तर दर्श दुसर्या दिवशी समजावा. अपराह्णकाळी जर एकदेशव्याप्ति असेल, तर प्रतिपदेची वृद्धि असल्याने, प्रतिपदेला इष्टि येते म्हणून, दुसर्या दिवशीच दर्शश्राद्ध करावे. फक्त दुसर्याच दिवशी जर अपराह्णव्याप्ति असेल आणि प्रतिपदेचा क्षय असल्यामुळे जर दर्शाच्याच दिवशी इष्टि येईल, तर ऋग्वेद्यांनी 'सिनीवाली
व तैत्तिरीयांनी 'कुहु' ह्या ग्राह्य समजाव्या. सामवेद्यांना विकल्पाने दोन्ही ग्राह्य आहेत. आदल्या दिवशी अपराह्नकाळी जेव्हा अधिक व्याप्ति व दुसर्या दिवशी थोडी व्याप्ति असेल, तेव्हा सामवेद्यांनी पहिली व तैत्तिरीयामी दुसरी घ्यावी. दोन्ही दिवशी जरी अपराह्णकाळी व्याप्ति नसली, तरी देखील सामवेद्यांनी पहिली व तैत्तिरीयांना दुसरी घ्यावी, असे आधीच सांगितले आहे. दर्शाच्या अमावास्येला जर दर्शश्राद्ध व वर्षश्राद्ध, दर्शश्राद्ध व मासिक श्राद्ध अथवा दर्शश्राद्ध व उदकुंभश्राद्ध ही एकत्रच आली, तर देवताभेदाने दोन दोन श्राद्धे करावीत. अशा प्रसंगी, आधी मासिक किंवा सांवत्सरिक श्राद्ध करून, दुसरा पाक तयार करावा आणि मग दर्शश्राद्ध करावे. सांवत्सरिकादि श्राद्ध केल्यावर शिल्लक राहिलेल्या भाताने अथवा निराळा भात करून दर्शश्राद्धाच्या आधी वैश्वदेव करावा. अग्निहोत्र्याने वैश्वदेवानंतर पिंडपितृयज्ञ करून, मागून सांवत्सरिक श्राद्ध करावे. मुंज न झालेला, विधुर, प्रवासी वगैरे सर्वांनी दर्शश्राद्ध करावे. दर्शश्राद्ध करण्याचे चुकल्यास 'न्युषुवाचम्' या ऋचेचा शंभर जप करावा. याप्रमाणे येथे दर्शनिर्णयाचा चोविसावा उद्देश संपला.