वर सांगितलेला वर्ज्यावर्ज्यनिर्णय, गुरु सिंहस्थ असतानाहि आहे. गुरु सिंह राशीत असताना- कान टोचणे, चौल करणे, मुंज करणे, लग्न करणे, देवयात्रेला जाणे, व्रते आरंभणे, वास्तुकर्म करणे, देवप्रतिष्ठा व संन्यास या गोष्टी मुळीच करू नयेत, हा यात विशेष आहे. या नियमाला अपवाद आहेत, ते येणेप्रमाणे- मघानक्षत्रात व सिंहेच्या अधिक अंशात जर गुरु असेल, तर सर्व देशी सर्व मंगलकृत्याचा निषेध सांगितला आहे. सिंहाशातून गुरु गेल्यावर गोदेच्या दक्षिणेकडे आणि भागीरथीच्या उत्तर दिशेला सिंहस्थाचा दोष नाही. सूर्य वृषभ राशीचा असताना देखील सिंहस्थ गुरूचा दोष नाही, असेही क्वचित सांगितलेले आहे. गुरु सिंहेचा असताना गोदास्नान यात्रिकांनी आणि कन्येचा असताना कृष्णास्नान, यांचे महापुण्य सांगितले आहे. गोदातीरी यात्रिकांनी मुंडन व उपवास ही अवश्य करावीत. तेथेच राहणार्यास या गोष्टी आवश्यक नाहीत. बायको गरोदर असली किंवा विवाहादि मंगलकार्य झाले असले तरीहि गोदावरीच्या तीरी मुंडन करण्यात दोष नाही. गया व गोदावरी यांच्या यात्रांना-मलमास व गुरुशुक्रास्त यांचे दोष नाहीत. मलमासाचे विशेष ब्रत निर्णयसिंधूत सांगितले आहेत. याप्रमाणे येते तिसरा उद्देश समाप्त झाला.