इष्टि व स्थालीपाक यांचा आरंभ पौर्णिमेला करावा, अमावायेला करू नये. अग्निस्थापना जी करणे ती, गृहप्रवेशनीय होमानंतर करावी. दर्शपौर्णमासाच्या स्थालीपाकाचा प्रारंभ जर पौर्णिमेला करावयाचा असेल, तर त्या बाबतीत मलमास, पौषमास अथवा शुक्रादिकांचा अस्त यांचा दोष नाही. हा आरंभ करणे जर राहिले, तर शुद्धमासादि येईपर्यंत थांबावे, असे कोणी म्हणतात व नेहमी शुद्धकाळीच आरंभ करावा असेही इतर कित्येकांचे म्हणणे आहे. येथे इष्ट्यादिप्रारंभनिर्णयाचा पंचविसावा उद्देश संपला.