शुक्लपक्षात त्रयोदशी पहिल्या दिवसाची घ्यावी. ज्या त्रयोदशीला शनिवार असेल, अशा कोणच्या तरी त्रयोदशीला आरंभ करून, प्रत्येक त्रयोदशीला एक वर्षभर, किंवा ज्या शनिवारी असतील, अशा चोवीस शुक्ल त्रयोदशीपर्यंत, प्रदोषकाली शिवपूजा, नक्तभोजन वगैरे करण्याचे जे व्रत, त्याला सुर्यास्तानंतर तीन मुहूर्तपर्यंत म्हणजे प्रदोषकालापर्यंत असणारी जी त्रयोदशी ती घ्यावी. त्रयोदशीची व्याप्ति जर दोन दिवस प्रदोषकालि सारखीच असेल, तर दुसर्या दिवसाची घ्यावी, कमी अधिक असल्यास अधिक व्याप्तीची घ्यावी; आणि पूर्वदिवसाची देवपूजा जर भोजन संपेपर्यंत असेल, तर पूर्वदिवसाची घ्यावी. तसे नसल्यास समानकालव्याप्तीप्रमाणे दुसरी घ्यावी. दोन्ही दिवशी जर व्याप्तिचा अभाव असेल, तर दुसरीच घ्यावी. येथे त्रयोदशीच्या निर्णयाचा एकोणविसावा उद्देश संपला.