चातुर्मास्याच्या प्रयोगाचे चार पक्ष आहेत ते येणेप्रमाणे
१. फाल्गुनी किंवा चैत्री पौर्णिमा यांतलय कोणत्याही पौर्णिमेला वैश्वदेवपर्व करून, आषाढी वगैरे पौर्णिमांवर पर्वाचा आरंभ करावा आणि चार चार महिन्यांनी पौर्णिमेला एकेक पर्व करावे. याप्रमाणे यावज्जीव जे वागणे तो यावज्जीव पक्ष.
२. या सांगितलेल्या रीतीने एक वर्षपर्यंत अनुष्ठान करून, नंतर सवनेष्टि व पशुयाग यांनी अथवा सवनेष्टि व होमयाग यांनी समाप्ति करण्याचा जो पक्ष तो सांवत्सर पक्ष.
३. पहिल्या दिवशी वैश्वदेवपर्व, चौथ्या दिवशी वरुण प्रघासपर्व, आठव्या व नवव्या दिवशी साकमेधपर्व आणि बाराव्या दिवशी शुनासीरीय पर्व असा हा बारा दिवसांचा द्वादशाहपक्ष.
४. पाच दिवसपर्यंत करून, पाचव्या दिवशी जो समाप्ति करण्याचा तो यथाप्रयोगपक्ष. यांचा आरंभ-उत्तरायणांतल्या शुक्लपक्षी देवनक्षत्रावर करून, शुक्लपक्षातच त्याची समाप्ति करावी असे जसे बरेच ग्रंथकार म्हणतात, तद्वतच कृष्णपक्षात समाप्ति करावी असेही कित्येकांचे म्हणणे आहे. बारा दिवसांचा व पाच दिवसांचा अशा या दोन पक्षांची समाप्ति सवनेष्टि इत्यादिकांनी जर एकाने केली, तर ते दोन पक्ष एक वेळ करावे; तशी समाप्ति जर केली नाही, तर प्रत्येक वर्षी करावे. काही ग्रंथात एका दिवसाचाही प्रयोग सांगितला आहे. तो प्रयोग, चैत्र्यादिक चार पौर्णिमापैकी कोणत्याही एका पौर्णिमेत होतो. क्वचित ग्रंथात सात दिवसाचाही जो पक्ष सांगितला आहे, तो येणेप्रमाणे - दोन दिवस वैश्वदेवपर्व, तिसर्या दिवशी वरुण प्रघासपर्व, चौथ्या दिवशी ग्रहमेधीया, पाचव्या दिवशी महाहवीषि, सहाव्या दिवशी पितृयज्ञादिक साकमेधपर्वाचा शेष आणि सातव्या दिवशी शुनासीरीय पर्व या सात दिवसांच्या पक्षासंबंधाने, पांच दिवसांच्या पक्षाला जो शुक्लपक्षादिक काल सांगितला आहे, तो घ्यावा. याप्रमाणे येथे चातुर्मास्याच्या कालनिर्णयाचा अठ्ठाविसावा उद्देश संपला.