स्पर्शकालाच्या आधी स्नान केल्यावर
'अमुक गोत्रोऽभुकशर्माहं राहुग्रस्ते दिवाकर निशाकरे वा अमुकदेवताया अमुकमंत्रसिद्धिकामो ग्रासादिमुक्तिपर्यन्तं अमुक मंत्रस्य जपरूपं पुरश्चरणं करिष्ये'
असा संकल्प करावा आणि आसनविधि, न्यास वगैरे स्पर्शाच्या पूर्वी करावीत. मूलमंत्राचा जप, स्पर्शापासून आरंभ करून मोक्षापर्यंत जपावा. नंतर दुसर्या दिवशी स्नानादिक नित्यकर्म करून,
'अमुकमंत्रस्य कृतैतद्ग्रहणकालिकामुकसंख्याकपुरश्चरणजपसांगतार्थंतद्दशांशहोम तद्दशांशतर्पण तद्दाशांशमार्जन तद्दशांशब्राह्मनभोजनादिकरिष्ये'
अशा संकल्पानंतर होमादिक कृत्ये करावीत. अथवा होमादिकांच्या चौपट किंवा दुप्पट जप करावा. पुरश्चरण करणार्याने आपल्या पुत्रादिकांना आपल्या स्नानादिक क्रिया करण्याची आज्ञा केल्यावर, पुत्रादिकांनी,
'अमुकशर्मणोऽमुकगोत्रस्यामुकग्रहणस्पर्शस्नानजनिश्रेयःप्राप्त्यर्थं स्पर्शस्नानं करिष्ये'
असा संकल्प करून, त्याची स्नानादिक कृत्ये करावीत. पुरश्चरण जे कोणी न करतील त्याम्नीही गुरूने सांगितलेल्या मंत्राचा, आपापल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा आणि गायत्रीमंत्राचा जप, ग्रहणांत अवश्य करावा. नाहीतर मंत्र मलिन होतो. ग्रहणात जर झोप घेतली तर रोग, मूत्रोत्सर्ग केला तर दारिद्र्य, शौचाला गेल्यास कृमिजन्म, मैथुन केले असता गावडुकराचा जन्म, अभ्यंग केल्यास कोड आणि जेवण केल्यास नरकप्राप्ति- अशी फळे सांगितली आहेत. ग्रहणाच्या पूर्वी शिजविलेले अन्न ग्रहण सुटल्यावर टाकून द्यावे. ग्रहणांतले पाणि प्यायले तर पादकृच्छ्रप्रायश्चित्त सांगितले आहे, म्हणून ते पाणी टाकून द्यावे. कांजी, ताक, तूप व तेल यात तळलेले पदार्थ व दूध या वस्तु ग्रहणाच्या आधी तयार केलेल्या असल्यास, ग्रहणानंतर घ्याव्या. तूप, लोणची व दूध यांत ग्रहणाच्या वेळी दर्भ घालावेत.