मध्यरात्रीनंतर जर दशमी असेल तर कपालवेध, ५२ घ, असेल तर छायावेध, ५३ घटका असेल तर ग्रस्तवेध, ५४ घ. असेल तर संपूर्ण वेध, ५५ घटका असेल तर सामान्य वेध, ५६ घ. असल्यास महावेध, ५७ घ. असल्यास प्रलयवेध , ५८ घ. असल्यास महाप्रलयवेध, ५९ घ. असल्यास अघोरवेध आणि ६० घ. असल्यास राक्षसवेध - असे वेधाचे दहा प्रकार नारदांनी सांगितले आहेत. मध्वाचार्यांच्या मताने चालणारे काही लोक यापैकी काही वेधांप्रमाणे चालतात. माधवाचार्यादिकांना जो संमत असा एक ६५ घटकांचा तेवढाच वेध आहे. दशमी पंधरा घटकांनी एकादशीला दूषित करते, असे जे सांगितले, ते उपासावाचुनच्या व्रतासंबंधाने म्हणजे व्रताची अंगे जी संकल्प, पूजा वगैरे, त्यासंबंधाने होय. असे जरी आहे, तरी या दोषामुळे तिचा सर्वथा त्याग न करिता, प्रातःकाली करायची जी संकल्प, अर्चन वगैरे कृत्ये, ती मध्याह्नानंतर करावीत, असे समजावे.