लग्ने वगैरे मंगलकार्याच्या वेळी, साधारणपणे सर्व संक्रांतीच्या आधीच्या व नंतरच्या मिळून सोळा सोळा घटिका वर्ज्य कराव्यात. चंद्रादि ग्रहांच्या संक्रांन्तीच्या आधीच्या व नंतरच्या मिळून क्रमाने २। ९। ८४। ६ व १५० घटका वर्जाव्यात. संक्रात जर रात्री सुरू होत असेल, तर ग्रहणाप्रमाणे रात्रीच स्नानदानादि कर्मे करावीत, असे कित्येकांचे म्हणणे आहे. संक्रान्त जरी रात्री सुरू झाली, तरी स्नानादि कर्मे दिवसाच करावीत, रात्री करू नयेत हे सर्वसंमत असून, अनेक जागी असाच परिपाठ आहे. ज्याच्या जन्मराशीला सूर्यसंक्रांत असेल, त्याला घनक्षयादि पीडा होतात. त्यांचा परिहार करण्यासाठी कमलपत्रांनी युक्त असलेल्या पाण्याचे स्नान करावे. विषुव आणि अयन या संक्रांति दिवसास जर सुरू झाल्या, तर आधीच्या व पुढच्या रात्रि आणि त्या संक्रांतीच्या दिवशी शिकणे व शिकवणे ही कामे करू नयेत. संक्रात जर रात्री लागेल, तर आधीच्या व पुढच्या दिवशी आणि त्या रात्री शिकणे व शिकवणे ही वर्ज्य करावीत. याप्रमाणे संक्रांत ज्या काळी प्राप्त होते ते चार, पूर्वीचे चार व पुढचे चार प्रहर असा एकंदर बारा प्रहरपर्यंत अनध्याय असतो असा याचा अर्थ समजावा. यापेक्षा याची अधिक माहिती अयनसंक्रांतप्रकरणात सांगण्यात येईल. याप्रमाणे संक्रांत्युद्देश दुसरा येथे संपला