जी केल्यावाचून सोयच नाही अशी जी - अनन्यगतिक, नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मे, ती अधिकमास अथवा क्षयमांस यात करावीत. पुढे करता येतिल अशी जी -सगतिक-नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्मे, ती (अधिक अथवा क्षय) या महिन्यात करू नयेत. उदाहरणार्थ - संध्या, अग्निहोत्र वगैरे नित्यकर्मे. ग्रहण-स्नानादि नैमित्तिक कर्मे आणि पर्जन्यसंबंधी करीर्यादि व ब्रह्मराक्षसादिकांबद्दलची पीडाशमनार्थ रक्षोघ्नेष्ट्यादि काम्यकर्मे, ही सर्व अधिक महिन्यात देखील करावीत. ज्योतिष्टोमादि नित्य, जातेष्ट्यादि नैमित्तिक, पुत्रकामेष्ट्यादि काम्य वगैरे कर्मै मलमासानंतर शुद्ध महिन्यातच करावीत. आधी आरंभिलेले काम्यकर्म अधिक महिन्यातहि करावे. नवीन कर्माचा आरंभ व पूर्वी सुरू केले असलेल्याची समाप्ति- या गोष्टी या मलमासात करू नयेत. त्याचप्रमाणे पूजेचा लोप झाल्याकारणाने करावी लागणारी मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा, अनन्यगतिक व ज्यांचा कालच येऊन ठेपला आहे अशी जी गर्भाधानापासून अन्न प्राशनापर्यंतची संस्कारकर्मै ती, ज्वरादिक रोगनिमित्त शान्ति, अलभ्य योगावर करावे लागणारे श्राद्धव्रतादिक नैमित्तिक प्रायश्चित्त, नित्यश्राद्ध, ऊनमासादि श्राद्धे दर्शश्राद्ध ही मलमासातसुद्धा करावीत. चैत्रादिकांपैकी एखाद्या अधिक महिन्यात मेलेल्याचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध, पुन्हा तोच चैत्रादिकांपैकी मलमास आला तरी त्यातच करावे. शुद्ध महिन्यात मेलेल्याचे सांवत्सरिक श्राद्ध (पहिले वर्ष जर अधिक महिन्यात पुरे होत असेल तर) मलमासातच करावे, शुद्धमासात करू नये. दुसरे अगर पुढील सांवत्सरिक श्राद्धे मात्र शुद्ध महिन्यातच करावीत. पहिल्या दिवसापासून अकराव्या दिवसापर्यंत करावयाची कर्मे व त्याचप्रमाणे सपिंडीकर्म- ही मलमासात देखील करावीत. द्वितीय मासिकादि श्राद्ध, मलमासात व शुद्ध मासात अशी दोनदा करावीत. याचप्रमाणे बारावे मासिक श्राद्ध जर अधिक महिन्यात करणे प्राप्त होईल, तर तेहि मलमासांत व शुद्ध मासात असे दोनदा करून, ऊनाब्दकली ऊनाब्दिक करावीत व चवदाव्या महिन्यात पहिले वार्षिक (सांवत्सरिक) श्राद्ध करावे. ज्या वर्षी अधिक महिन्याच्या पुढचाच महिना क्षयाचा येईल, त्यावर्षी कार्तिकांत करावयाचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध अधिक महिन्यात व क्षयमासात असे दोनदा करावे. उदाहरणार्थ - अधिक कार्तिक महिना येऊन, पुढच्या महिन्यात वृश्चिक व धनु अशा दोन संक्रांति आल्यामुळे तो जो क्षयमास होतो, त्याप्रसंगी वरील निर्णय जाणावा. अधिक महिन्याच्या पाठोपाठ जेव्हा क्षयमास नसेल, तेव्हा आश्विन महिन्यातले श्राद्ध, ते दोन्ही महिने कर्मार्ह असल्यामुळे अधिक व शुद्ध अशा दोन्ही आश्विनात करावे, असे मला वाटते. उदाहरणार्थ - आश्विन हा अधिक महिना येऊन मार्गशीर्ष महिना जेव्हा क्षयाचा येईल तेव्हा, वरील म्हणण्याचे तात्पर्य जाणावे. क्षय महिन्याच्या आधीचा महिना जर अधिकाचा नसेल तर क्षयमासांत जे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावयाचे, ते क्षयमासीच करावे! त्याचप्रमाणे वर जे मार्गशीर्षाचे क्षयमासाचे उदाहरण सांगितले आहे, त्यामध्ये मार्गशीर्ष व पौष या महिन्यात करावयाचे जे सांवत्सरिक श्राद्ध, ते तिथीचा पूर्वार्ध व उत्तरार्ध असा विभाग न करता एकदाच क्षयमासी करावे.