अयनांश हे ज्योतिःशास्त्रात प्रसिद्ध आहेत. सध्या म्हणजे शालिवाहन शकाच्या १७१२ या वर्षी ते अयनांश २१ आहे; यास्तव संक्रांतीच्या आधी एकविसाव्या दिवशी अयनांश-पर्वकाळ होतो असा याचा अर्थ झाला. याप्रमाणेच कमी अथवा अधिक शक असता समजावे. वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ या (चार) संक्रांतीना विष्णुपद अशी संज्ञा असून, मिथुन, कन्या, घन व मीन या (चार) संक्रांतींना षडशीति असे नाव आहे आणि मेष व तूळ या (दोन) संक्रांतींना विषुव आणि कर्क व मकर या संक्रांतींना अयन अशी नावे आहेत. या ज्या चार प्रकारच्या संक्रांति, त्या उत्तरोत्तर म्हणजे विष्णुपद संक्रांतीहून षडशीति-संक्रान्त, षडशीतिहून विषुव आणि विषुवापेक्षा अयन नावाची संक्रांत, या उत्तरोत्तर अधिक पुण्यप्रद होत.