सप्तमीला तेलाला स्पर्श करू नये, काळे वस्त्र वापरू नये, आवळकाठीच्या काढ्याने स्नान करू नये, भांडण करू नये व तांब्याच्या भांड्यात जेवू नये, प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या दिवशी तैलाभ्यंग करू नये. चतुर्थी, नवमी व चतुर्दशी या तिथींवर क्षौर करू नये.(क्षौर म्हणजे हजामत). तृतीया, अष्टमी व त्रयोदशी या तिथींवर शूद्रादिकांनी मांस खाऊ नये. पंचमी, दशमी व पौर्णिमा या तिथींवर स्त्रीसंग करू नये. आदित्यवारी तैलाभ्यंग, मंगळवारी हजामत (स्मश्रु) आणि बुधवारी स्त्रीसंग; ही वर्ज्य करावीत. चित्रा, हस्त व श्रवण या नक्षत्रांवर तेल वर्ज्य करावे. विशाखा व प्रतिपदा यांवर क्षौर वर्ज्य आहे. मघा, कृत्तिका आणि तीन उत्तरा यांवर स्त्रीसंभोग करू नये. सप्तमीला तीळ खाणे व तिळांनी तर्पण करणे, अष्टमीला नारळ, नवमीला भोपळा, दशमीला पडवळ, एकादशीला निष्पव म्हणजे पावटा, पांढरा पावटा, चवळी, काळे वाल व घेवडा, द्वादशीला मसुरा, त्रयोदशीला वांगी ही वर्ज्य करावीत. पौर्णिमा, अमावास्या, संक्रान्ति, चतुर्दशी आणि अष्टमी या तिथींवर तेल, स्त्रीसंग आणि मांससेवन, ही केल्यास चांडाळाचा जन्म येतो. पौर्णिमा, अमावास्या, संक्रान्ति, द्वादशी व श्राद्धाची तिथि यावर वस्त्र पिळू नये. रात्री माती, शेण व पाणी ही आणू नयेत. प्रदोषकाळी गोमूत्र घेऊ नये. अमावास्यादि पर्वांवर शान्तीसाठी तिळाचा होम अवश्य करावा. स्वतःच्या रक्षणाकरिता दानादि कर्मे करावीत. पर्वाचे दिवशी शिक्षणाला सुटी घ्यावी व शौच, आचमन आणि ब्रह्मचर्य यांचे सेवन करावे, प्रतिपदा, अमावास्या, षष्ठी, नवमी, श्राद्धदिन, जन्मदिवस, व्रतदिन, उपासाचा दिवस, रविवार व मध्याह्नसमय या काळी काटक्यांनी दात घासू नयेत. दात घासण्याच्या काड्या ज्या दिवशी मिळणार नाहीत त्या दिवशी आणि निषिद्ध दिवशी पाण्याच्या बारा चुळा करून किंवा झाडाच्या पानांनी तोंड धुवावे. या सर्व निषेधात जी तिथिवारनक्षत्रादि घेणे ती सर्व तत्कालव्यापी अशी जी असतील तीच घ्यावीत. याप्रमाणे येथे तिथि, वार व नक्षत्रे यांच्या निर्णयाचा तेहेतिसावा उद्देश संपला.