दैवकर्मे व पित्र्यकर्मै असे कर्मांचे दोन प्रकार आहेत. एकभुक्त, नक्त, अयाचित, उपवास, व्रत आणि दान या सहा गोष्टी दैवकर्मात येतात. मध्यान्ही एकदाच जे एकच अन्न खाणे ते एकभुक्त, रात्री प्रदोषकाळी जे भोजन करणे ते नक्त, याचना केल्यावाचून ज्या दिवशी जे अन्न मिळेल ते खाणे म्हणजे अयाचित, स्त्रीपुत्रादिकांजवळ याचना न करिता इतर दिवशी मिळालेल्या अन्नाचे भोजन देखील अयाचितच होते, असेहि कोणी म्हणतात. अहोरात्र भोजन न करने म्हणजे उपवास. पूजनादि स्वरूपाचे जे विशिष्ट कर्म त्यास व्रत म्हणतात. आपल्या मालमत्तेवरची आपली सत्ता काढून, दुसर्याची सत्ता तिच्यावर स्थापन करण्यास दान म्हणतात. ही जी एकभुक्तादि कर्मे, ती क्वचित व्रतादिकांचे अंग, क्वचित एकादश्यादिकांच्या उपवासांच्या प्रतिनिधिरूपांची अंगे व क्वचित स्वतंत्र अशी तीन प्रकारची सांगितली आहेत. अंगरूप अथवा प्रतिनिधीरूप कर्माचा निर्णय प्रधानकर्माच्या निर्णयाप्रमाणेच समजावा.