उपाकर्म, उत्सर्जन आणि अष्टकाश्राद्धे ही अधिक महिन्यात करू नयेत. चौल, मौजीबंधन, लग्न, तीर्थयात्रा, वास्तुकर्म, गृहप्रवेश, देवप्रतिष्ठा, विहीर, बाग इत्यादिकांचा उत्सर्ग, नवी वस्त्रे किंवा अलंकार ही धारण करणे, तुला-पुरुषादि महादाने, यज्ञकर्म, अग्निस्थापना, पूर्वी न पाहिलेल्या देवतीर्थादिकांचे दर्शन, संन्यास, काम्यवृषोत्सर्ग, राज्याभिषेक, व्रते पुढे केला असता अडचण नसणारा अन्नप्राशनसंस्कार, सोडमुंज, पुर्वी होणे राहिलेला नामकर्मादि संस्कार, पोवती वाहाणे, दवणा वहाणे, श्रवणाकर्म, सर्पबलि वगैरे; पाकसंस्था, देवाचे शयन, परिवर्तन (एका कुशीवरून दुसर्या कुशीवर वळण्याची क्रिया) वगैरे उत्सव, शपथविधि, दिव्य करण्याची वगैरे कामे- ही सर्व अधिक महिन्यात वर्ज्य करावीत. रजोदर्शनानिमित्त शांति, विच्छिन्नाग्नीचे पुन्हा संधान, पुनः प्रतिष्ठा वगैरे जी नैमित्तिक कर्मे, त्यांच्या बाबतीत, ती निमित्त झाल्याबरोबर जर केली, तर त्यांना मलमासादिकांचा दोष नाही; परंतु निमित्त होऊन जर काळ लोटला, तर ती शुद्ध मासातच करावीत. दुर्भिक्षादि जर संकट असेल, तर आग्रयण मलमासात करण्यास हरकत नाही. संकट नसल्यास शुद्ध मासातच करावे. युगादि व मन्वादि श्राद्धे अधिक व शुद्ध अशा दोन्ही महिन्यात करावीत. क्षयमासाच्या आधी येणार्या अधिकमासाला संसर्प हे नाव असल्याचे मागे सांगितलेच आहे. या संसर्पमासात- चूडाकर्म, व्रतबंध, विवाह, अग्निस्थापना, यज्ञ, उत्सव, महालय, राज्याभिषेक ही कर्मे करू नयेत. यांहून इतर कर्मे करण्यास हरकत नाही. पूर्वी न केलेल्या व्रताचा आरंभ अथवा समाप्ति ही मलमासात वर्ज्य आहेत. पूर्वी केलेल्या माघस्नानादि कर्माचा आरंभ अथवा समाप्ति, क्षयमासात करण्यास हरकत नाही. मकरसंक्रातीने युक्त असलेल्या क्षयमासात पौर्णिमेला माघस्नानारंभ करून कुंभसंक्रांतियुक्त माघमासी पौर्णिमेला त्याची समाप्ति करावी. कार्तिकमासासंबंधानेही हेच जाणावे. वैशाख महिना जेव्हा अधिक येतो तेव्हा वैशाखस्नानादि मासव्रताचा आरंभ चैत्री पौर्णिमेला करून, त्याची समाप्ति शुद्ध वैशाखातल्या पौर्णिमेला करावी; म्हणजे हे व्रत दोन महिन्यांचे झाले.