जी द्वादशी एकादशीने विद्ध असेल ती ग्राह्य होय. महाद्वादश्या ज्या आठ आहेत, त्या येणेप्रमाणे -
१. जी शुद्धाधिका एकादशीने युक्त असते ती उन्मीलनी नावाची द्वादशी होय.
२. जी शुद्धाधिका द्वादशी वृद्धि पावणारि असते तिला अञ्जुली म्हणतात.
३. सूर्योदयी एकादशी, नंतर क्षय पावणारी द्वादशी आणि दुसर्या दिवशी सूर्योदयी त्रयोदशी असा एका अहोरात्रमध्ये तीन तिथींचा परस्परस्पर्श होत असल्यामुळे, या द्वादशीला स्त्रीस्पर्शाद्वादशी असे नाव आहे.
४. दर्श अथवा पौर्णिमा यांची जेव्हा वृद्धि असते तेव्हा तिला पक्षवर्धिनी म्हणतात.
५. जी पुष्यनक्षत्रयुक्त असेल ती जया.
६. जी श्रवणनक्षत्रयुक्त असेल ती विजया.
७. जी पुनर्वसुयुक्त असेल ती जयंती.
८. जी रोहिणीयुक्ता ती पापानाशिनी. ज्या कोणाला पापाचा नाश करून घेऊन मोक्ष पाहिजे असेल, त्याने द्वादशीला उपास करावा. जी द्वादशी श्रवणनक्षत्राने युक्त असते, ती एकादशीप्रमाणेच नित्य आहे. या आठापैकी एकादशी व द्वादशी ह्या जर एकाच दिवशी येतील, तर एकतंत्राने उपास करावा. निराळा आल्यास आणि अंगी शक्ति असेल तर दोन उपास करावेत. ज्याने दोन व्रतांचा आरंभ केला आहे, पण ज्याला उपास करण्याची शक्ति नाही अशाने जरी द्वादशीचा एकच उपास केला तरी त्याला उपासाचे पुण्य मिळते. द्वादशीला जरी श्रवणनक्षत्राचा योग एखादा मुहूर्तभर असला तरी ती घ्यावी. पुष्यादि नक्षत्रांचा योग जर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असेल, तर उपास करावा. तिथि व नक्षत्र यांचा संयोग असताना उपास असल्यास, दोहोंच्या अथवा एकाच्या शेवटी पारणे करावे असा निर्णय आहे. येथे अठरावा उद्देश संपला.