अमावास्या व प्रतिपदा यांचा ज्या अहोरात्रात संधि होत असेल, त्या दिवसाचे समान पाच भाग करून, त्यातल्या चौथ्या अपराह्णकालाच्या भागात पिंडपितृयज्ञ करावा. जर अपराह्णसंधि असेल, तर तो (पिंडपितृयज्ञ) अन्वाधानाच्या दिवशी करावा. मध्याह्नी अथवा पूर्वाह्णी जर संधि असेल, तर यागाच्या दिवशी यागानंतर अपराह्णकाळी तो (पिंडपितृयज्ञ) होतो. दिवस आणि रात्र यांच्या संधीत जेव्हा तिथींचा संधि येतो, तेव्हा अन्वाधानाच्या दिवशी पिंडपितृयज्ञ करावा. याप्रमाणे आपस्तंब व हिरण्यकेशी यांच्या मतांप्रमाणे वागणार्यांनीही संधिदिनीच पितृयज्ञ करावा. हा यज्ञ अपराह्णांत अथवा साधारणपणे सूर्य वर असेपर्यंत करावा. दिवसाचे पाच भाग केले असता, त्यातला चौथा तो अपराह्णकाल होय; किंवा दिवसाचे नऊ भाग केले असता, त्यातला जो सातवा भाग तो अपराह्णकाल होय. सांख्यायन, कात्यायन व सामवेदीयांनी पिंडपितृयज्ञ, दिवसाचे समान तीन भाग करून त्यातला तिसरा भाग जो अपराह्णाचा येईल त्या वेळी करावा. दर्शश्राद्ध व पिंडपितृयज्ञ हे जर एकाच दिवशी येतील, तर गृह्याग्निव्रताच्या ऋग्वेद्यांनी त्या दोहोंचे एकदम एकत्रच अनुष्ठान करावे. व्यतिषंग म्हणजे दोन्ही कर्मे एकदम बरोबरच करणे. खंडपर्व असल्यास आदल्या दिवशी फक्त दर्शश्राद्ध करून, पुढच्या दिवशी फक्त पिंडपितृयज्ञ करावा. श्रौताग्निमान् म्हणजे जे अग्निहोत्रि असतील त्यांनी फक्त दक्षिणाग्नीच्या ठिकाणी पिंडपितृयज्ञ करावा. तो व्यतिषंगाने त्यांनी करू नये. दर्श जर संपूर्ण असेल, तर अग्निहोत्र्यांचा क्रम असा आहे- सुरवातीला अन्वाधान, नंतर वैश्वदेव, त्यानंतर पिंडपितृयज्ञ आणि शेवटी दर्शश्राद्ध. ज्या अग्निहोत्र्यांचा बाप जिवंत असेल अशांनी, याच वेळी होमाच्या शेवटी पित्रादि त्रयीच्या उद्देशाने पिंडासह किंवा पिंडावाचूनही पिंडपितृयज्ञ करावा, किंवा पिंडपितृयज्ञाला आरंभच करू नये. एका इष्टीचा लोप झाला असता, पादकृच्छ्राचे प्रायश्चित्त करावे, दोन इष्टीचा लोप झाल्यास अर्धकृच्छ्राचे प्रायश्चित्त करावे आणि तीन इष्टींचा जर लोप झाला असेल, तर अग्निनाश होतो म्हणून, पुन्हा अग्नीची स्थापना करावी. पिंडपितृयज्ञाचा जर लोप होईल, तर वैश्वानरेष्टि प्रायश्चित्त करावे. इष्टीच्या जागी 'सप्तहोतारं होष्यामि' या मंत्राने संकल्प करून, याच मंत्राने चार वेळा तूप घेऊन पूर्णाहुति द्याव्या. येथे तेविसावा उद्देश संपला.