मेषसंक्रातीला बकर्याचे दान, वृषभसंक्रातीला गाईचे दान, मिथुनसंक्रातीला वस्त्रदान व अन्नदान, कर्कसंक्रातीला तूप व गाय यांचे दान, सिंहसंक्रांतीला छत्री व सोने यांचे दान, कन्यासंक्रातीला घर व वस्त्र यांचे दान, तूळसंक्रातीला तीळ व दूध यांचे दान. वृश्चिकसंक्रातीला दिव्याचे दान, धनुसंक्रातीला वस्त्र आणि वाहन यांचे दान, मकरसंक्रांतीला लाकूड व विस्तव यांचे दान, कुंभसंक्रातीला गाय, गवत व पाणी यांचे दान, आणि मीनसंक्रातीला जमीन व फूलांच्या माळा यांची दाने करावीत. अशाच प्रकारची दुसरी दानेही पाहावीत. मकर व कर्क या ज्या दोन अयनसंक्रांति, त्यांच्या आधी व तूळ आणि मेष याहि संक्रांतीच्या आधी तीन रात्री किंवा एक रात्र उपास करून, स्नानदानादि कर्मे करावीत. चवथा उपास- संक्रांतीसह रात्रंदिवस किंवा पुण्यकाळासह रात्रंदिवस घडेल असा करावा. हा उपास पुत्रवान गृहस्थावाचून, पापाचा नाश करू इच्छिणार्या गृहस्थाने करावा. हा उपास कामनिक असून, नित्य नाही. सर्व संक्रांतीच्या दिवशी पिंडश्राद्ध करू नये. मकर व कर्क या संक्रातीच्या दिवशी श्राद्ध नित्य आहे. संक्रांतीना जी दाने देण्यास सांगितले, तशीच ती त्या त्या संक्रांतीच्या पूर्वी अयनांशकाल सुरू झाला म्हणजे, आधी स्नानादिक कर्तव्यकर्मे करावीत व मग द्यावीत.