मीमांसा व धर्मशास्त्र जाणणारे, बुद्धिवान आणि ज्यांना आळस नाहीत असे जे पण्डित, ते पूर्वीचे ग्रंथ पाहून प्राप्त कार्ये करीत असतातच; म्हणून त्यांच्यासाठी मी हा उद्योग केलेला नाही. बुद्धिहीन, आळशी व अडाणी असून जे धर्माबद्दलचा निर्णय समजण्याची इच्छा करतात, त्यांच्यासाथी मी हा 'धर्मसिन्धुसार' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. भक्तवत्सल असा श्रीमद्विठ्ठल या ग्रंथाने संतुष्ट होवो. या ग्रंथात दिलेली सारी मूळची वचने व त्याबद्दलचा विचार जर समजून घ्यायचा असेल तर, कौस्तुभ, निर्णयसिन्धु आणि श्रीमाधव यांचे ग्रंथ पाहावेत. हा माझा ग्रंथ-शब्द व त्यांचे अर्थ- या बाबतीत जरी सदोष असला, तरी सज्जनांनी याचा प्रेमपूर्वक स्वीकार करून, त्याचे संशोधन करावे. कोंड्याने भरलेले सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाने निवडून घेऊन जसे स्वीकारले, त्याचप्रमाणे सज्जनांनी माझ्या ग्रंथाचा स्वीकार करावा. याप्रमाणे अनंतोपाध्यायांचे पुत्र काशीनाथोपाध्याय यांनी रचिलेली जो 'धर्मसिन्धुसार' नावाचा ग्रंथ, त्याचा पहिला परिच्छेद येथे संपला.