अमावास्येच्या दिवसाचे सारखे तीन भाग करावेत. पहिला भाग पूर्वाह्ण, दुसरा मध्याह्न आणि तिसरा अपराह्ण. यात रात्रिसंधि असताना प्रतिपदेला चंद्रदर्शनी इतरांप्रमाणे कात्यायनांनीसुद्धा संधिदिवशी-पिंड, पितृयज्ञ व अन्वाधान - ही करावीत आणि दुसर्या दिवशी इष्टि करावी हे निर्विवाद आहे. पूर्वाह्णी आणि दिवसाचा दुसरा भाग जो मध्याह्न त्या काळी जर संधि असेल, तर संधीच्या आदल्या दिवशी-अन्वाधान, पिंड व पितृयज्ञ ही करावीत व संधिदिनी इष्टि करावी. चतुर्दशीच्या दिवशी अमावास्येच्या दिवसाचा अपराह्ण नावाचा जो तिसरा काळ, त्याची जर पूर्ण व्याप्ति असेल, तर अमावास्यायुक्त अशा अपराह्णकाळी पितृयज्ञ करावा यात संशय नाही. अपराह्ण नावाच्या तिसर्या भागाच्या शेवटच्या अपराह्णकाळाच्या एका भागात जर अमावास्येची व्याप्ति असेल अमावास्येत पिंडपितृयज्ञ करावा; कारण, त्यावेळी चंद्र अत्यंत क्षीण असतो, असे दुसर्या पक्षाचे मत आहे. अपराह्णसंबंधाने जे चार पक्ष आहेत, ते येणेप्रमाणेः-
१. संधीच्या दिवशीच अपराह्ण नावाच्या तिसर्या भागात अमावास्येची पूर्ण व्याप्ति. उदाः- चतुर्दशी २९ घ. अमावास्या ३० घ., प्रतिपदा २९ घ., आणि दिनमान ३० घ. अशी संधिस्थिति असेल तेव्हा-अन्वाधान व पितृयज्ञ ही कर्मै करावीत आणि दुसर्या दिवशी याग करावा.
२. संधीच्या आदल्या दिवशीच अपराह्णकाळी अमावास्येचि पूर्ण व्याप्ति हा दुसरा पक्ष. उदाः - चतुर्दशी २० घ., अमावास्या २२ घ., प्रतिपदा २४ घ., आणि दिनमान ३० घ., अशा वेळी संधिदिवसाच्या दुसर्या दिवशी तीन मुहूर्ताचा जो प्रातःकाळ, त्या काळी, प्रतिपदेच्या तीन चरणांपर्यंतच्या यागकालाचा लाभ होतो; यास्तव, संधीच्या दिवशी अन्वाधान, पितृयाग आणि प्रतिपदेला इष्टि-ही कर्मे करावीत असेल कौस्तुभाचे मत आहे.' प्रतिपदेला अपराह्णकाळी तीन मुहूर्त द्वितीया असल्यास, दुसर्या दिवशी पिंडपितृयज्ञ व उपास ही करावीत. संधिदिवशी इष्टि करावी असे इतर गंथकारांचे मत आहे. दुसर्या पक्षाचे आणखी एक उदाः - चतुर्दशी १८ घ., अमावास्या १८ घ., प्रतिपदा १९ घ., आणि दिनमान २७ घ. - अशा स्थितीत प्रतिपदेच्या दिवशी पहिले तीन चरण असा जो यागकाल, त्याचा अभाव असल्यामुळे, संधीच्या दिवशीच कात्यायनांनी इष्टि करावी, आणि आदल्या दिवशी पिंडपितृयज्ञ व उपास ही कर्मे करावीत, असे सर्वांचे मत आहे.
३. सम किंवा विषम अशी एकव्याप्ति दोन दिवशी असणे हा तिसरा पक्ष. उदाहरण - चतुर्दशी २५ घ., अमावास्या २५ घ., प्रतिपदा २४ घ. आणि दिनमान ३० घ. ही स्थिति समान अशा अपराह्णव्यापिनीची जाली. या बाबतीत कौस्तुभ आणि इतर ग्रंथाकर यांचे स्वतंत्र जे दोन निर्णय आहेत, ते वर सांगितले. दुसरे उदाहरण - चतुर्दशी २५ घ. अमावास्या २० घ. प्रतिपदा १७ घ. आणि दिनमान २७ घ., ही सुद्धा सारखीच एकदेशव्याप्ति झाली. अशा स्थितीतसुद्धा कात्यायनांनी अशा या संधिदिवशीच इष्टि करावी, आणि आदल्या दिवशी पिंडपितृयज्ञ व उपासही करावा असे सर्वांचे एकमत आहे. आता विषम असे एकदेशव्याप्तीचे उदाहरण घेऊ - चतुर्दशी २५ घ. अमावास्या २३ घ., प्रतिपदा २३ घ. आणि दिनमान ३० घ. येथे सुद्धा वर सांगितल्याप्रमाणेच दोन मतांचा दोन प्रकारचा निर्णय समजावा. दुसरे उदाहरण- चतुर्दशी २५ घ. अमावास्या २२ घ. प्रतिपदा १८ घ., आणि दिनमान ३० घ., ही देखील विषम अशी एकदेशव्याप्तीच होय. अशा स्थितीत सुद्धा कात्यायनांनी संधिदिवशीच इष्टि करावी आणि चतुर्दशीला उपास व पिंडपितृयज्ञ ही करावीत असे सर्वांचे मत आहे. आणखी एक उदाहरण - चतुर्दशी २५ घ. अमावास्या २७ घ. प्रतिपदा २९ घ. आणि दिनमान ३० घ. अशावेळी संधिदिवशी अन्वाधान व याग करून प्रतिपदेला इष्टि करावी
४. संधीच्या दिवशीच फक्त एकदेशव्याप्ति असणे हा चौथा पक्ष होय. २८ घ. अमावास्या २२ घ. प्रतिपदा १७ घ. आणि दिनमान २७ घ. या दोन्ही उदाहरणात संधीच्याच दिवशी पिंडपितृयज्ञ व अन्वाधान ही कर्मे करून, याग मात्र दुसर्या दिवशी प्रतिपदेला करावा. याप्रमाणे कात्यायनमताप्रमाणेही वरील सार्या उदाहरणात चंद्रनिषेधाचे प्रतिपालन संभवत नाही. काही दिवशी चंद्राच्या निषेधाचा नियम पाळण्यासाठी आदल्या दिवशी याग वगैरे करायला सांगितले आहे व काही वेळी चंद्रदर्शनाच्याही दिवशी करायला सांगितले आहे. पिंडपितृयज्ञाबद्दलची याचप्रमाणे मत समजावे. दर्शश्राद्धासाठी अमावास्येचा सर्वसाधारण नियम पुढे निराळा सांगितला आहे.