भोजननिषेधात्मक व व्रतात्मक असे एकादशीच्या उपवासाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला पुत्रवान गृहस्थांना कृष्णपक्षात देखील अधिकार आहे. व्रतात्मक उपवास मात्र अपत्ययुक्त गृहस्थांनी कृष्णपक्षात करू नये, समंत्रक व्रतसंकल्प न करिता यथाशक्ति नियमयुक्त भोजनवर्जन मात्र करावे. याप्रमाणे तिथीचा क्षय असता शुक्लपक्षातही जाणावे. शयनी आणि बोधिनी यांच्या मध्यंतरीची कृष्णपक्षातली एकादशी करण्यास सापत्य गृहस्थादिक सर्वांना अधिकार आहे. विष्णूची सायुज्यमुक्ति व आयुष्य आणि पुत्र यांची इच्छा करणारे यांनी काम्यव्रत दोन्ही पक्षात करावे. काम्यव्रताला मुळीच निषेध नाही. वैष्णव गृहस्थाश्रमी यांनी कृष्णपक्षातल्या एकादशीला देखील नित्य उपवास करावा. हे एकादशीव्रत शैव, वैष्णव, सौर इत्यादि सर्वांना नित्य आहे. केले नाही तर दोष सांगितला आहे. संपत्ति आदि फल प्राप्त होते असे सांगितले आहे. यास्तव हे काम्यव्रत देखील आहे. काहींचे मत असे आहे की, मुहूर्तपरिमित दशमी असता दशमीत भोजन करावे, आणि सूर्योदयाच्या अगोदर आरंभ झालेली जी शुद्धधिकाधिक द्वादशिका तिचे ठिकाणी निरंतर दोन उपवास करावे; याप्रमाणेच तिथिपालनही करावे. परंतु हे मत योग्य नाही. आठ वर्षानंतर ऐशी वर्षापर्यंत एकादशी करण्याला अधिकार आहे. शक्ति असेल तर ऐशी वर्षांच्या नंतर देखील करण्यास अधिकार आहे. सभूर्तृक स्त्रीने भर्त्याच्या अनुज्ञेवाचून अगर पित्रादिकांच्या अनुज्ञेवाचून उपवासव्रतादिकांचे आचरण केले तर व्रत निष्फळ होते, भर्त्याच्या आयुष्याचा क्षय होतो आणि नरक प्राप्त होतो. अशक्तांना नक्त, हविष्यान्न, अनौदन (भात न खाणे), फळ, तिळ, दूध, उदक, तूप, पंचगव्य, वायू ही एकाहून पुढचे श्रेष्ठ आहे. याप्रमाणे आपल्या शक्तीचे तारतम्य पाहून एका पक्षाचा स्वीकार करावा. एकादशीचा त्याग करू नये. द्वादशीला देखील केले नाही तर एकमध्य चांद्रायण (शुक्ल प्रतिपदेपासून दररोज एक घास वाढविणे, वद्य प्रतिपदेपासून कमी करून अमावास्येला उपोषण) प्रायश्चित्त करावे. नास्तिकपणामुळे न केल्यास पिपीलिकामध्य चांद्रायण (वरील प्रमाणेच) प्रायश्चित्त आहे. पति, पिता वगैरे अशक्त असल्यामुळे स्त्री, पुत्र, भगिनी, बंधु इत्यादिकांनी त्यांच्याकरिता एकादशी व्रताचे आचरण केले तर करणाराला शंभर यज्ञांचे पुण्य मिळते. ॥११॥