मेष नावाच्या संक्रांतीच्या आधीच्या १५ व नंतरच्या १५ घटका पुण्यकाळ. आधीच्या १० व पुढच्या १० घटका पुण्यकाळ असतो असेही कित्येक सांगतात. वृषभसंक्रातीच्या आधीच्या १६ घटका, मिथुनसंक्रांतीच्या पुढच्या १६ घटका, कर्कसंक्रांतीच्या आधीच्या ३० घटका, सिंहसंक्रांतीच्या आधीच्या १६ घटका व कन्यासंक्रातीच्या पुढच्या १६ घटका पुण्यकाळ असतो. तुलासंक्रांतीच्या आधीच्या १५ व पुढच्या १५ घटका पुण्यकाळ. आधीच्या व पुढच्या १० घटका हा काळ असतो असे कित्येक म्हणतात. वृश्चिक संक्रातीच्या आधीच्या १६ घटका, धनुसंक्रांतीच्या पुढच्या सोळा घटका, मकर संक्रांतीच्या पुढच्या ४० घटका, कुंभसंक्रातीच्या आधीच्या १६ घटका व मीनसंक्रांतीच्या पुढच्या १६ घटका पुण्यकाळ असतो. दोन घटकांहून अधिक नाही इतका थोडा दिवस बाकी राहिला असता जर-मिथुन, धन, मीन व मकर, या संक्रांति लागल्या, तर पूर्वीच्याच घटका पुण्यकाळ. सकाळी २ घटकांहून अधिक नाही अशा थोड्या वेळी जर वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ व कर्क या संक्रान्ति सुरू होतील, तर पुढच्याच घटका पुण्यकाळ. सकाळीच जर कर्कसंक्रांत सुरू होईल, तर आदल्या दिवशी पुण्यकाळ धरावा असे कित्येकांचे मत आहे. रात्री जर मध्यरात्रीच्या आधी संक्रांत सुरू होईल, तर पूर्वीच्या दिवसाचा उत्तरार्ध पुण्यकाळ व मध्यरात्रीनंतर जर संक्रांत सुरू होत असेल तर पुढच्या दिवसाचा पूर्वार्ध पुण्यकाळ. मकर व कर्म (या दोन) संक्रांतीखेरीज करून इतर कोणत्याही संक्रांतीचा रात्री आरंभ झाला, तरच हा शास्त्रार्थ जाणावा. मकरसंक्रांत जरी रात्री सुरू झाली, तरी दुसर्या दिवशीच पुण्यकाळ समजावा. कर्कसंक्रान्त जर रात्री येईल, तर आदल्या दिवशीच पुण्यकाळ. सूर्यास्तानंतर ३ घटका सायं संध्याकाळ या काळी जर मकरसंक्रान्त सुरू होईल, तर आदल्या दिवशीच पुण्यकाल. सूर्योदयाच्या पूर्वी ३ घटका जो प्रातःसंध्याकाळ, त्याकाळी जर कर्कसंक्रांत सुरू होईल, तर दुसर्या दिवशी पुण्यकाळ धरावा, असा जो संधिकाळाचा विशेष संक्रांतिनिर्णय, तो ज्योतिःशास्त्रात प्रसिद्ध आहे.