ज्या कर्मांना जो काल सांगितला असेल त्या कर्माकरिता तत्कालव्यापिनी तिथि घ्यावी. उदाहरणार्थ - विनायकव्रतामध्ये पूजन मध्यान्हकाळी सांगितले आहे; यास्तव, मध्यान्हकाळव्यापिनी तिथी घ्यावी. कर्मकाल जर दोन दिवसाम्चा असेल अथवा नसेल किंवा अंशतः असेल, तर युग्मवाक्याच्या अनुरोधाने पूर्वविद्धा किंवा परविद्धा तिथि घ्यावी. युग्मवाक्य हे द्वितीया तृतीया विद्धा घ्यावी, तृतीया द्वितीया विद्धा घ्यावी असे सांगते. यावरूनच -द्वितीयातृतीयांचे युग्म, चतुर्थीपंचमीचे युग्म, षष्ठीसप्तमीचे युग्म, अष्टमीनवमीचे युग्म, एकादशीद्वादशीचे युग्म, चतुर्दशीपौर्णिमांचे युग्म व अमावास्याप्रतिपदांचे युग्म- अशी युग्मे जाणावीत. गणपतीच्या व्रताविषयी चतुर्थी तिथि तृतीयेने विद्ध घ्यावी अशी जी विशेष वचने आहेत, त्यावरूनच तिथिनिर्णय ठरतो. विशेष वचनांनी सांगितलेल्या तिथीचा कर्मकाली जर अभाव असेल, तर सर्वसाधारण वचनाला अनुसरूनच तिथिनिर्णय करावा. 'ज्या तिथिवर सूर्योदय होतो ती तिथि- स्नानदानजपादि कर्मांना पूर्ण आहे' अशा प्रकारची सर्वसाधारण वचने आहेत. याप्रमाणे येथे चौथा उद्देश संपला.