वैष्णव आणि स्मार्त असे एकादशीव्रताच्या अधिकार्यांचे दोन भेद आहेत. 'ज्याने वैष्णवी दीक्षा घेतली तो वैष्णव आणि ती न घेणारा तो स्मार्त होय,' अशी जरी मोठाल्या ग्रंथांतून व्याख्या केलेली आहे, तरी 'ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेवरूनच वैष्णवत्व आणि स्मार्तत्व ही ठरतात, असे वृद्ध मानतात,' असे जे निर्णयसिंधूचे म्हणणे, तेच सर्वत्र शिष्टसंमत असे मानण्यात येते. अरुणोदयकाली दशमीवेध आणि सूर्योदयकाळी दशमीवेध असे दोन प्रकारचे वेध आहेत. सूर्योदयाच्या आधी चार घटका अरुणोदय समजावा. सूर्योदय स्पष्टच आहे. ५६ घटकांनंतर एक पळभरही जरी दशमीचा प्रयोग झाला असला, तरी तो अरुणोदयवेध वैष्णवांच्या संबंधाने घ्यावा. ६० घटकांनंतर एका पळाचाही जरी दशमीचा प्रवेश झाला असला, तरी तो सूर्योदयवेध स्मार्तींबद्दल घ्यावा. ज्योतिषी लोकांच्या विवादामुळे जर वेधादिकांबद्दल संशय असेल, किंवा निरनिराळ्या मतांच्या वाक्यांच्या विरोधामुळे जर ब्राह्मणांमध्ये मतभेद असेल, तर एकादशी सोडून तिचा उपास द्वादशीला करावा. शुद्धा आणि विद्धा असे एकादशीचे दोन भेद आहेत. अरुणोदयाचा जी वेध करते ती विद्धा. ही वैष्णवांनी सोडून देऊन द्वादशीला उपास-करावा. जी अरुणोदयाचा वेध करीत नाही, ती शुद्धा. या शुद्धेचे जे चार भेद आहेत, ते येणेप्रमाणे -
१. एकादशी मात्राधिक्यवती. येथे आधिक्य म्हणजे दुसर्या दिवशी सूर्योदयानंतर तिथि असणे असा अर्थ समजावा. उदा. दशमी ५५ घटका, एकादशी ६० घ. १ प. द्वादशीचा क्षय ५८, ही एकादशीमात्राधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णवांनी दुसर्या दिवशी उपास करावा आणि स्मार्तांनी पहिल्या दिवशी करावा. दशमी ५५ घ., एकादशी ५८ घ. व द्वादशी ६० घ. १ प. द्वादशीचा क्षय ५८ घ. ही द्वादशी मात्राधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णवांनी द्वादशीला उपास करावा आणि स्मार्तांनी एकादशीला करावा. दशमी ५५ घ. १ प., एकादशी ६० घ. १ प. आणि द्वादशी ५ घ. ही उभयाधिक्यवती शुद्धा झाली. अशा वेळी वैष्णव आणि स्मार्त या दोघांनी दुसर्या दिवशीच उपास करावा. दशमी ५५ घ., एकादशी ५७ घ. आणि द्वादशी ५८ घ. ही अनुभयाधिक्यवती शुद्धा होय. वैष्णव आणि स्मार्त या दोघांनी यातली पहिलीच उपासाला घ्यावी. याप्रमाणे थोडक्यात वैष्णव निर्णय सांगितला.