‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
आहेपणें सदोदित आद्य समस्तांसि सर्व व्यवहारीं ॥ आपण मीपण विरहित आधार अखंड राम निर्धारीं ॥१॥
नंदन अजात्मजाचा नंदिपतिप्रिय अपार सुखमय जो ॥ नंदवि निजभक्त स्वा - नंदानुभवेंचि मन तयास भजों ॥२॥
दर्शन सुखमय दे जो दरिद्र दुःखादि परिहरुनि सकल ॥ दमन करुनि शत्रूंचें दयाळु भक्ता न होउं दे विकळ ॥३॥
घर दारा सुत न प्रिय घडि पळ मनिं एक आवडी राम ॥ घसरत न कधिं तयातें घनदाट सुखींच मिळवि सुखधाम ॥४॥
नवविधभक्तिपथें नव नव हर्षद आत्मभजनशीलाला ॥ न असा दीन दयाळू नरवरसुरवंश दावि लीलांला ॥५॥
राजाधिराज सीता राघव माझा स्वभक्त अभिमानी ॥ राकाधिपप्रतिममुख रावण वधि जो सुरांसि अवमानी ॥६॥
मजवरि करूनि करुणा मन माझें स्वस्वरूपिं रमवि सदा ॥ मत्प्रिय आणिक न दुजा मन्मतिला विषयिं जाउं दे न कदा ॥७॥
आनंदघना रामा कृष्ण जगन्नाथ विष्णुगुरु दास ॥ आठवि निज नामातें जाणुनि भक्ताश्रयात्म बिरुदास ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP