पद १ लें -
दामोदर पद धरा । करा निज आत्म विचार बरा ॥धृ०॥
देह मी ऐसें मानिति कांहो, समज मनीं घ्या जरा । चिन्मय अमृत त्यजुनि न सेवा, प्रपंच हाका जरा ॥दा०॥१॥
कोण मी कैंचा आलों याचा शोध करुनि अंतरा । पूर्णानंदानुभवें मृगजलसम, भव सागर हा तरा ॥दा०॥२॥
रज्जुज्ञानें सर्प भयाचा, मिथ्याभ्रम परिहरा । जगन्नाथ सुत कृष्ण वदे जरि, नकळे सद्गुरु करा ॥दा०॥३॥
पद २ रें -
श्री दामोदर मी तव किंकर, पूर्ण कृपा कर देवा रे ॥श्री०॥धृ०॥
बहु अन्यायी मी मज पाळिसी, जरि चुकलों निज सेवा रे ॥श्री०॥१॥
जाळुनि मत्तम हे पुरुषोत्तम, दाविं निजात्मा ठेवा रे ॥श्री०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला, देईं शाश्वत मेवा रे ॥श्री०॥३॥
पद ३ रें -
देइल सुख दामोदर तुज गा ॥धृ०॥
जवळिं असे हृदयांत विलोकीं, कां भुलतोसि जगा ॥दे०॥१॥
आत्मा रज्जुवरी कल्पुं नको, मिथ्या जग भुजगा ॥दे०॥२॥
प्रार्थी कृष्ण जगन्नाथात्मज, स्वस्थरुपीं भज गा ॥दे०॥३॥
पद ४ थें -
जन बसले कां उठा या दामोदर भेटी प्याया ॥ज०॥धृ०॥
त्रैलोक्याचा नाथ तुम्हाला, समर्थ इच्छित द्याया ॥ज०॥१॥
पूर्ण कृपेचा सागर जाणुनि, वदनिं निरंतर गाया ॥ज०॥२॥
भावें कृष्ण जगन्नाथात्मज, शरण तयाच्या पायां ॥ज०॥३॥
पद ५ वें -
धन्य दिवस वाटला, नयनिं आजि श्री दामोदर पाहिला ॥धृ०॥
गुंतुनि जो भक्तांचे वचनीं, जंबावलिं राहिला ॥न०॥१॥
घडला बहु अपराध क्षमेनें, नेणों किति साहिला ॥न०॥२॥
जगन्नथ सुत कृष्णें मस्तक, भावें पदिं वाहिला ॥३॥
पद ६ वें -
श्री दामोदर मजला देइं झडकरीं निजचरणिं विसावा ॥धृ०॥
क्षणिक विषय सुख मानुनि याचा, तिळभरि तरि मज संग नसावा ॥श्री०॥१॥
वृत्ति रहित आनंदानुभवें, जनिं वनिं मनिं चिन्मात्र दिसावा ॥श्री०॥२॥
विनवी कृष्ण जगन्नाथात्मज, तुजवरि हरि बहु प्रेम असावा ॥श्री०॥३॥
पद ७ वें -
जोडुनि कर दामोदर वंदा ॥धृ०॥
तत्वविचारें साधुनि घ्या हो, निज आत्मानंदा ॥जो०॥१॥
भक्ति ज्ञान विरक्ती योगें, लागा या छंदा ॥जो०॥२॥
बोले कृष्ण जगन्नाथात्मज, हाचि खरा धंदा ॥जो०॥३॥
पद ८ वें -
सुखकर दामोदर घ्यावा हो ॥धृ०॥
चिन्मय ध्यान निरंतर करुनि, कांहिं विसावा घ्यावा हो ॥सु०॥१॥
अज्ञानें हा काळ तुमचा, फुकत न जाऊं द्यावा हो ॥सु०॥२॥
सांगे कृष्ण जगन्नाथात्मज, निजानंद रस प्यावा हो ॥सु०॥३॥
पद ९ वें -
सुंदर सिबिकायानीं बैसुनि दामोदर धनी आला रे ॥धृ०॥
चिन्मय हा परि धरि अवतारा, उत्साह बरा झाला रे ॥सुं०॥१॥
दर्शन मात्रें निनवी गात्रें, होतें सुख नयनाला रे ॥सुं०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज, याच्या पूर्णानंद मनाला रे ॥सुं०॥३॥
पद १० वें -
नमन तुज दामोदर राजा ॥धृ०॥
यथायोग्य तव भजनहि न घडे, नकळे मज पूजा ॥न०॥१॥
निज सौख्यीं मन समरस व्हावें, साधीं या काजा ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज सांगे, भाव जडो माझा ॥न०॥३॥
पद ११ वें -
बहु देवीं देव एक । महाकालि श्री चामुंडेश्वरि ऐश्या मूर्ति अनेक ॥धृ०॥
निजानंद परमात्मा भरला, करणें हाचि विवेक ॥ब०॥१॥
सर्वाधार जगाचा साक्षी, विसरुं नको नावेक ॥ब०॥२॥
निरहंकारें कृष्ण विनवितो, जगन्नाथ द्विज लेक ॥ब०॥३॥
पद १२ वें -
तव पद कमलीं मी भृंगरसें रमवीं श्री दामोदर सखया ॥धृ०॥
त्रिगुणात्मक माया गांजिति हे शमवीं, जगदात्मा वारिं भया ॥त०॥१॥
बहु चंचल हें मज विषय सुखीं भ्रमवी, फिरवि जसा घट नभ या ॥त०॥२॥
निज जगन्नाथ सुत कृष्णपणा दमवीं, विघड हरीं जो उभया ॥त०॥३॥
पद १३ वें -
मनुजा रामनाथ लक्ष्मी नारायण दामोदर तिघेहि एकचि गा ॥धृ०॥
भेद मनीं जरि किमपि धरिसि तरि, मारुनि घेसि दगा ॥म०॥१॥
निज चैतन्याधार जगीं या, जेवीं कनक नगा ॥म०॥२॥
वदतो कृष्ण जगन्नाथात्मज, पालक तोचि जगा ॥म०॥३॥
पद १४ वें -
निशिदिनिं दामोदारा स्मरुनि कांहिं या जन्मीं तरि उद्धरा ॥धृ०॥
बहु सायासें मानव देहीं, आले निश्चय धरा ॥स्म०॥१॥
धन सुतदारा मोह पसारा, होय अशाश्वत खरा ॥स्म०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज विनवी, जोडुनियां द्वय करा ॥स्म०॥३॥