श्री रामनाथाचीं पदें
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद १ लें -
मज विषयीं करुणा कैसी तुज न ये रामनाथा, व्यर्थ गुंतुनि संसारिं गेलें वय अविचारीं ॥म०॥धृ०॥
काम दहन दिन यामिनि हृद्गत साक्षि स्वरूपा निश्चयें आवडसि दिनानाथा । परि विषय वासना भारीं जाचिति निवारिं ॥म०॥१॥
या मनासि सुख धाम दाविं निज नाम स्मरणें सदया रक्षिलें त्वां अनाथा । आत्म भक्तांच्या कैवारी धांवसी नानाअवतारीं ॥म०॥२॥
वैष्णव सुखकर कृष्ण जगन्नाथ तुला शरण सदोदित अर्पिला चरणीं माथा । देह मी पण हें सारी ब्रह्मांनंदीं निर्विकारीं ॥मज्विषयीं करुणा कैसी तुज न ये रामनाथा॥३॥
पद २ रें -
श्री रामनाथ कां रें लाविला देवा वेळ निजात्म भेटि द्याया ॥धृ०॥
साच सांगतों मी तुज जाच न साहति, मज वांचवि एकदा सर्व हरुनि अपाया ॥श्री०॥१॥
नावडे संसार मनिं त्रासलों दिन यामिनी, कामिनी धन चिंतुनि जाय जन्म वाया ॥श्री०॥२॥
वैष्णव सज्जन खुण साक्षि हृदयिं आपण, प्रभु नाशिवंत कृष्ण जगन्नाथ काया ॥श्री०॥३॥
पद ३ रें -
यामिनि प्रियकर नाम तुझें प्रभु रामनाथ भक्त काम कल्पतरु ॥धृ०॥
राम स्मरण सुख सेविसि आंगें प्रमुख, सुंदर सुहास्य मुख भेटि दे चंद्रशेखरु ॥या०॥१॥
गिरिजा रमणा मज दाउनि पदांबुज, कथिं निज हितगुज भवांबुधि हा उतरूं ॥या०॥२॥
क्षणभंगुरशरीर चित्तिं धरवेना धीर किति लाविसी उशीर नको देवा दुरि धरूं ॥या०॥३॥
पद ४ थें -
शरण तुला मी सदया स्वामि रामनाथा रे ॥धृ०॥
कळवुनि निजखुण पळवीं देहात्म बिज रे । दावि दिव्य पदांबुज देवा दिनानाथा रे ॥श०॥१॥
साक्षि मनाचा तूं प्रिय साचा रे । लाभ देउनि आत्म सुखाचा रक्षि मज अनाथा रे ॥श०॥२॥
वैष्णव सद्भक्ति नेटीं ध्यातों आपणा धूर्जटि रे । दर्शनाची आस पोटीं कृष्ण जगन्नाथा रे ॥शरण तुला मी सदया स्वामी रामनाथा रे॥३॥
पद ५ वें -
देव रामनाथ हास्य मुखी पाहिला नयनी देव । जिव हा सुखी झाला अंतरिं जिव हा सुखी झाला ॥धृ०॥
लाउनि निज नामाचा छंद । जो हरि भक्तांचा भवकंद । दृष्यत्वातित परमानंद । तो हा प्रत्यय आला ॥जि० अ० दे०॥१॥
चिन्मय मूर्ति हा त्रिपुरारि । त्रिभुवन साक्षी निर्विकारि । प्रगट्नि संकट विघ्न निवारी । संरक्षी भजकांला ॥जि० अ० दे०॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाचा । हृद्गत हा परमात्मा साचा । नित्य विवरितां प्रिय स्वहिताच्या ।..........॥जि० अ० दे०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP