पद १ लें -
विनवीं मी तुज कामाक्षा जननी ग । नित्य निरंतर चित्त चरणिं जडूं ॥धृ०॥
मदन दहन सति वदन निरखितां । सदन सुखाचें सुख लख लख आवडूं ॥वि०॥१॥
करितां गुण श्रवण ये भुले तुज कवण । नवविध भक्ति रसीं मन सांपडूं ॥वि०॥२॥
कृष्ण जगन्नाथ ह्मणे नावडे चिद्रुपाविणें । दास्यपणें वय सार्थकता घडूं ॥वि०॥३॥
पद २ रें -
श्री कामाक्षा निजपदीं लक्षा लावी त्या सुख कारी रे ॥धृ०॥
स्वभक्त रक्षा, या बहु दक्षा, जनन मरण भय हारी रे । जे कमलाक्षा प्रिय जन साक्षात्कारीं भजन विचारीं रे ॥श्री०॥१॥
प्रपंच पक्षा, भुलतां मोक्षा, अंतर पडतें भारीं रे । आत्म परिक्षा, करुनि निरिक्षा, चिन्मात्रा शिव नारी रे ॥श्री०॥२॥
सज्जन शिक्षा, तेचि सुदिक्षा, कृष्ण जगन्नाथ धारी रे । कृपा कटाक्षा करि जरि दाक्षा-, यणि हे कांक्षा वारी रे ॥श्री०॥३॥
पद ३ रें -
विषयिं न मन ज्याचें वमनसें मानुनि, श्रीकामाक्षा ध्यानीं निरंतर ॥धृ०॥
तेचि सुजन जरि विजन न सेविति, वसति सदनिं तरी मुक्त अंतर ॥वि०॥१॥
भजन पूजन भावें श्रवण मनन त्यांसि, उगिच फिरुनि फळ काय वनांतर ॥वि०॥२॥
गुरुसि शरण गेला अनुभविं दृढ झाला, कृष्ण जगन्नाथ ह्मणे तोचि सु नरवर ॥वि०॥३॥
पद ४ थें -
श्री कामाक्षा नमिली निजात्म भावें ॥श्री०॥ चरणिं शरण जातां, त्रिताप हरिति भावें ॥धृ०॥
चरणिं बहुत जन्म, उगिच म्या मति माझि भ्रमिली । सज्जनिं सावध केला, उचित हे रिती ॥श्री०॥१॥
होतां श्रवण मनन, भजनीं रमलें मन, विषयिं इंद्रिय वृत्ति दमली । गुरुकृपा थोर निजानंदीं जे भरिती ॥श्री०॥२॥
चरणिं ठेवितां माथा, सुख कृष्ण जगन्नाथा, नित्य गुण गातां वर्षे क्रमिली । ऐसी हे साधन सिद्धी सुजन वरिति ॥श्री०॥३॥
पद ५ वें -
दक्षा साधुनि गुरु कृपा कटाक्षा, लक्षीं कामाक्षा । शिक्षा, हे सुजनाची केवळ दीक्षा, पावसि तूं मोक्षा ॥धृ०॥
नारी अर्ध नटेश्वर मनदारी, रत ऐक्य विचारीं । चिद्रूपत्वें नटली या संसारीं, परि निर्विकारी ॥द०॥१॥
नातें सुहृद जनीं धरिसि मनातें, सत्य दिसे ना तें । मळसी कां होउनि वश कुजनातें, वय हें तव जातें ॥द०॥२॥
थारा पदिं देइल तेचि उदारा, सज्जनीं विचारा । अनुभव हा कृष्ण जगन्नाथ कुमारा, तुज कथिला सारा ॥३॥
पद ६ वें -
श्री कामाक्षा नमूं निरंतर भावें चरणीं रमूं ॥धृ०॥
सार नसुनि संसार सुखीं या, काया अहर्निशीं श्रमूं ॥श्री०॥१॥
अपार भवनिधि पार काराया, साधनिं बहु किती दमूं ॥श्री०॥२॥
कृष्ण जगन्नाथ ह्मणे हित हें, सांडुनिं न उगी भ्रमूं ॥श्री०॥३॥
पद ७ वें -
जननी कामाक्षा ध्यावी हो ॥धृ०॥
विषयीं आशा धरितां पाशा, पडती म्हणुनि त्यजावी हो ॥ज०॥१॥
गृहधन दारा मोह पसारा, वृत्ती यांत नसावी हो ॥ज०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण करी हित, चिन्मय बुद्धि असावी हो ॥जननी कामाक्षा ध्यावी हो॥३॥