मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री दत्तात्रेयाचीं पदें

श्री दत्तात्रेयाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
( राग - यमन कल्याण, ताल - त्रिवट. )
पाहूं या गुरुदत्त अवधूत वेषधारी । अनुसूया अत्रि ऋषि नारीचा, पुत्र मनोहारी, त्रैमूर्ति अवतारी ॥पा०॥धृ०॥
रमतां विषय सुखीं, तळमळ दुःख शेखीं, नाहीं घडी विश्रांति संसारीं । पुरे पुरे किति येराजारी, भोगिल्या अविचारीं, गुंतुनि गृहदारीं ॥पा०॥१॥
गुरुवर तारक निजसुखकारक भेटतां संतोष होय भारीं । प्रगटला नित्य निर्विकारी, भक्तांचा सहाकारी, संकटें विघ्नें वारी ॥पा०॥२॥
धन्य धन्य नरनारी, दर्शना येती सामोरीं, दत्त दत्त नाम हें उच्चारी । विष्णु कृष्ण जगन्नाथा तारीं, उघड चराचरीं, आवडला जिव्हारें ॥पा०॥३॥

पद २ रें -
( राग - जिल्हा, ताल - त्रिवट. )
हृदयीं साचा तुज गांठिला दत्ता । आतां कोठें जासी भावबळ मोठें निजभक्तांचें ॥हृ०॥धृ०॥
दृश्य चराचर मिथ्या जें जें दिसतें, त्या तुझी एक सत्ता । ऐसा दाटला त्रिजगी, येती लाटा आनंदाच्या ॥हृ०॥१॥
तूंचि प्रकाशक एक निजात्मज्ञानें, खुण बाणलि चित्ता । होती कोटी ब्रह्मांडें ज्या पोटीं, जिवन जीवाचे ॥हृ०॥२॥
सत्संगतिनें अद्वय मार्गें, शोधितां मज लागला पत्ता । गुरु विष्णु कृष्ण जगन्नाथा, सौख्य भजनांचें ॥हृ०॥३॥

पद ३ रें -
( जलभरन जात जमुनाके - ह्या चालीवर. )
श्रीगुरु यतिवर, जोडुनि प्रार्थितों कर, न पडूं निज विसर, दत्त दिगंबर ॥धृ०॥
होउनियां अविचार, चरणिं चुकलों फार, शरण तुज निर्धार, वारीं देह अहंकार ॥श्री०॥१॥
त्रिविध ताप हर, करिं देवा मजवर, करुणा जलधर, वृष्टि निरंतर ॥श्री०॥२॥
श्रीदत्त विष्णु गुरु, हृदय कमलिं धरूं, कृष्ण जगन्नाथ स्मरूं, त्रिभुवनीं सुंदर ॥श्री०॥३॥

पद ४ थें -
( राग - बेहाग ताल - त्रिवट. )
महिमा मोठा अनुसूया अत्रि मुनिचा । पुत्र ऐसा गुरुदेव दत्त यतिवर ज्याचा ॥धृ०॥
दत्त दत्त ऐशीं नांवें । गातां प्रेमरस भावें । संकट समयीं धांवे । भक्ताभिमानी साचा ॥म०॥१॥
सदय हृदय भारीं । ऐसा कोणी ना संसारीं । पापी जनांसही तारी । घेतां लाभ दर्शनाचा ॥म०॥२॥
विष्णु गुरु दत्त राणा । प्रिय प्राणांहूनि जाणा । कृष्ण जगन्नाथ आण । वाहे मी दास दत्ताचा ॥म०॥३॥

पद ५ वें -
( राग - भैरवी, पंजाबी - ठोका. )
सेवुं दत्तगुरु दत्त दत्तगुरु दत्त नामरस रे ॥धृ०॥
विषय मदें उन्मत्त चित्त हें सच्चित्सुख विसरे । पुत्र वित्त गृह कलत्र चिंतुनि, मोहजाळिं पसरे ॥से०॥१॥
ज्या रसपानें संसारांतुनि, पाय सहज निसरे । काय लाभ तरी याहुनि मनुजा, पुनर्जन्म घसरे ॥से०॥२॥
अजरामर होसी रस प्याया, एकांतीं बसरे । विष्णु चरणीं कृष्ण, जगन्नाथाचें मानस रे ॥से०॥३॥

पद  ६ वें -
( राग - वागेसरी, ताल - त्रिवट )
शरण आलों तुजला गुरुवरा ॥धृ०॥
शरण आलों मज्जनन मरण हर चरण कमल दाविं दत्त दिगंबर ॥श०॥१॥
पावन करिं देह भाव हरुनि मज, ठाव देउनि पदिं रक्षिं निरंतर ॥श०॥२॥
गलिताहंकृति होइल कधिं मति, प्रपंच हा अति होय भयंकर ॥श०॥३॥
स्मरण अविद्या हरणार्थ करीं, विष्णु कृष्ण जगन्नाथ निजपदीं किंकर ॥श०॥४॥

पद ७ वें -
( राग - जिल्हा, ताल - त्रिवट. )
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरु देवदत्त यतिराया ॥धृ०॥
तुजविण मजला क्षणभर न रुचे, प्रपंच धन सुत जाया ॥ स्वयंप्रकाशक दर्शन दे मज, हरुनिअविद्या माया ॥श्री०॥१॥
दत्त दिगंबर तन मन धन, हें अर्पण तुझिया पाया ॥ स्वस्वरुपीं स्थिरवृत्ति रहाया दाखविं निजपद ठाया ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा बहु, आवडी भजन कराया ॥ अखंड ब्रह्मानंद स्फूर्ति, वाढवि चित्त रमाया ॥श्री०॥३॥

पद ८ वें -
( राग - जिल्हा, ताल - त्रिवट. )
मधुर नाम तुझें श्री गुरु दत्तराया । जें कां विपद विराम होय हृदयीं आराम ॥नाम तुझें॥धृ०॥
औदुंबर तळवटीं चिंतितां, ध्यानीं ये निज मूर्ति । मावळवी देह स्फूर्तिं । पाववी आत्म ठाया । कधीं विषयीं नुपजे काम दावी सुखधाम ॥नाम तुझें०॥१॥
शुकसनकादिक संत साधुजन सेवुनियां विश्रांति । सुख अनुभविती एकांति । परि प्रेम नाम गाया । योगी जरी झाले आत्माराम आवडे निष्काम ॥नाम तुझें०॥२॥
चित्त एकाग्र घडेना बहुविध ग्रंथ विवरिले प्रांतीं । मग सांडुनि लौकिक भ्रांति । लागलो या उपाया । विष्णु कृष्ण जगन्नाथ गातां पावला विश्राम ॥नाम तुझें०॥३॥

पद ९ वें -
( अभाग्याच्या घरीं बाबा कामधेनु आली, या चालीवर. )
घेऊं या चला जाऊं श्री दत्त दिगंबर भेटी । बहुविध येति संत साधु सद्भक्त भाव बळ नेटीं ॥धृ०॥
मुख्य दर्शनें बहु जन्मार्जित दुःखें हरति कोटी ॥ सखत्वें गुरुराज मिळुनि प्रख्याती होइल मोठी ॥घेऊं०॥१॥
अभय वरप्रद हरिल आमुची देह वासना खोटी ॥ स्वयं प्रकाशक निजात्म ज्ञानें आलिंगिल निज पोटीं ॥घेऊं०॥२॥
अलभ्यलाभ असा हा ह्मणवुनि गांठा हितकर गोष्टी ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथा गुरु स्वरुपानंदीं लोटीं ॥घेऊं०॥३॥

पद १० वें -
( राग - परज, ताल - दादरा. )
तो हा दत्त चिद्घन आला रे ॥धृ०॥
नेटें भक्तांच्या अनुसूयात्रिचा पुत्र त्रैमूर्ति झाला रे ॥ पायीं पादुका शोभति ज्याच्या, कंठीं रुद्राक्ष माला रे ॥तो०॥१॥
काषायांबर धारी तुंबर, नारद गाती ज्याला रे ॥ औंदुबरीं वास रक्षी भक्तांस, जो वश गायनाला रे ॥तो०॥२॥
तारक भवहारक सुखकारक हा जिवाला रे ॥ श्रीविष्णु गुरुच्या कृपें कृष्ण जगन्नाथ निवाला रे ॥तो०॥३॥

पद ११ वें -
( राग - महाड, ताल - दादरा. )
मागणें तुजला दत्ता निज लाभ दे मला ॥धृ०॥
दुर्जन जरि गांजिति मति होउं निश्चला । देह मीपण हें करि क्षीण त्या विलक्षण स्वात्म ईक्षण प्रेम हो भला ॥मा०॥१॥
संत संगति आवडे अति नेट लागला । भेटति कधीं सज्जन करवीं सुखी मज मज्जन बहू जीव जाचला ॥मा०॥२॥
विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथ विषयीं वीटला । नीट राजयोगासि साधित भोगुनि सुखदुःख अद्वय रूपें वांचला ॥मा०॥३॥

पद १२ वें -
( राग व ताल सदर )
गुरु दत्त चरण चिंतुनि मनिं तृप्त हो सदा ॥धृ०॥
विषय हें विष सुख न निमिष दे मला कदा । जनिं स्मृति हर पद निरंतर स्मरुनियां करूं धंदा ॥गु०॥१॥
नवविधा भक्तियोगें जीवन्मुक्ति वारि आपदा । नारीनर ऐसा करुनि विचार हरूं भव कंदा ॥गु०॥२॥
अनंत सुकृतें भेटला मनुष्यजन्म एकदां । दत्त विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथ सेवितो ब्रह्मा नंदा ॥गु०॥३॥

पद १३ वें -
( मन बैरागी मोरा रे, या चालीवर. )
श्री नरसिंह सरस्वति स्वामी शरण तुला मी आलों रे ॥धृ०॥
श्रीपाद श्रीवल्लभ देवा नरहरी राया मज नेईं निज पायीं रे । अखंड ठेवीं क्षमा करुनि कांहीं जरि अपराधी झालों रे ॥श्री०॥१॥
सुरवर गण संस्तुत करुणामुर्ते दुस्तर भवनिधि पासुनि त्राहीं रे । विचारितांही न कोणि मजला पाही तुजविण मनीं बहु भ्यालों रे ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा मजला रक्षीं मारुनि शत्रु साही रे । सर्वांग दाही करावा न सुचे उपायीं नेणुनि विषय विष प्यालों रे ॥श्री०॥३॥

पद १४ वें -
( जलभरन जात० या चालीवर. )
नरसिंव्ह सरस्वति गुरुयतिवर कर ठेउनि शिरीं वर देईं सुखकर ॥धृ०॥
परत परत मन फिरत विषय सुखीं । जरि न धरित करिं निजपदिं स्थिर ॥न०॥१॥
चरण दाउनि तव स्मरण करविं मज । तरविं भवजलधि जनीं स्मृत हर ॥न०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ जोडुनि कर मागत । ब्रह्मानंदा माजीं रत करिं निरंतर ॥न०॥३॥

पद १५ वें -
( राग - जिल्हा ताल - त्रिवट. )
नरसिंव्ह सरस्वति स्वामी नरहरे । करिं निज कृपा जलधर वृष्टि निरंतर ॥धृ०॥
रमतां विषयीं मन भ्रमत भोगुनि दुःख । श्रमत विविध तापें जिव तळमळ हर ॥न०॥१॥
जनक जननि तुझी कनक सदृश्य दिप्ति । सनक सनंदनादि ध्याति आत्म हितकर ॥न०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ व्हावया स्वरुपीं रत । द्यावी भक्ती अखंडित अभय वरदकर ॥न०॥३॥

पद १६ वें -
( राग व ताल सदर )
भेटसि कधीं नरसिंव्ह सरस्वति स्वामी । शरिर हें क्षणभंगुर धरवेना मनीं धीर ॥धृ०॥
दत्त दिगंबर करुणा सागर । नसुनि निष्ठुर ऐसा लाविलासि कां उशीर ॥भे०॥१॥
भव हा भयंकर वाटुनि निरंतर । तुझी आठवण येतां नयनीं सुटतें नीर ॥भे०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा चरणिं ठेविन माथा । दर्शनें होईल माझें चित्त आत्मपदीं स्थिर ॥भे०॥३॥

पद १७ वें -
( नमो भक्त सुरतरलते० या चालीवर )
श्रीदत्तात्रेय गुरु अवधूता ॥धृ०॥
दत्तगुरु नरसिंव्ह सरस्वति गुरुवरा सुंदरा दुर्भराला हरा स्तविति निर्जर तुज निरंतर तूंचि हितकर मोक्षप्रद ॥श्री०॥१॥
दावि मज निज पाय या भवसागराला तराया जरा श्रीकरा विषयिं बळकट चित्त मळकट चित्सुख निकट नेणिजे पद ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा मीपणा कातरा ना करा द्या वरा उद्धरा येइं सत्वर ठेविं शिरिं कर लाविं न उशिर कंथ सद्गद ॥श्री०॥३॥

पद १८ वें -
( राग - यमन कल्याण ताल - त्रिवट )
गुरु नरसिंव्ह सरस्वति पाहुंया । करुनियां त्वरा वेगें गाउंया ॥धृ०॥
हरुनि देह मीपण दाविल निजात्म खुण । लक्षुनि अखंड गुण गाउंया ॥गु०॥१॥
औदुंबर कल्पतरु तेथें वसति श्रीगुरु । सन्मुख जोडुनि कर राहुंया ॥गु०॥२॥
दत्त विष्णु गुण गाथा प्रिय कृष्ण जगन्नाथा । सद्गुरुचरणीं माथा वाहुंया ॥गु०॥३॥

पद १९ वें -
( राग व ताल सदर )
नरसिंव्ह सरस्वति पाहिला । सिंहासनावर शोभे तरुतलवटिं ॥धृ०॥
धन्य वृक्ष औदुंबर, जेथें दत्त दिगंबर । नारद तुंबरादिकीं गाईला ॥न०॥१॥
नारीनर घेती भेटी, भाव भक्ति बळ नेटी । चला जाउं कृष्णातटीं राहिला ॥न०॥२॥
दत्त विष्णु हा त्रैमूर्ति दृष्य द्रष्टा ज्याची स्फूर्ति । कृष्ण जगन्नाथें चित्तीं वाहिला ॥न०॥३॥

पद २० वें -
( राग - जिल्हा, ताल - त्रिवट )
शरण गुरुराज तुला स्वामी । भक्ति अखंडित दे अंतर्यामीं ॥धृ०॥
श्री नरसिंव्ह सरस्वति नरहरि राया । प्रपंच हा भला न वाटतो मजला । अघटित वय निश्चय विषय दुराशा । निजात्म भेटीचा बहु नेट लागला । पुरवि मनोरथ ठेवुनि सुख धामीं ॥श०॥१॥
संग रहित निस्संग मनें निश्चल स्वरुपचि व्हाया । किति ग्रंथ वाचिला विवरुनि घोंकिला । तरि झोंक अधिक मी ज्ञाता । विषयीं चंचळ मज कां असा करुनी टांकिला । नाठवूं कधिं देह ह्मणुनियां हा मी ॥श०॥२॥
अभय वरप्रद ठेविं शिरीं कर । नरहरे काय उगला अजुनि राहिला । विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझ्या छंदें निर्लज्ज जाहला । सर्वत्रीं पाहिला निरहंकृतिनें जोडीं निजधामीं ॥श०॥३॥

पद २१ वें -
( राग - जिल्हा, ताल - त्रिवट )
भला रे नरसिंव्ह सरस्वति आला । आत्मपदीं रमवि जिवाला ॥धृ०॥
भस्म चर्चित काया पादुका शोभति पायां । कंठीं दिव्य रुद्राक्षांच्या माला ॥भ०॥१॥
दंड कमंडलु करिं भव्य जटाजूट शिरीं । दर्शनें आनंद भारीं झाला ॥भ०॥२॥
दत्त विष्णु सिंव्हासनीं पाहिला निज नयनीं । कृष्ण जगन्नाथ वंदी त्याला ॥भ०॥३॥

पद २२ वें -
( राग - तिलंग ताल - त्रिवट )
नरसिंह सरस्वति यतिराज भेटले आजि मला । गुरुपद राजिव सुखी लंपट जीव हा रमला ॥धृ०॥
सेविन असंग मनीं अभंग महानिज भला । आनंद समुद्र होईन क्षुद्र सांडूनि विषय जला ॥न०॥१॥
दत्तगुरू विष्णुच्या पदीं चित्त लावूनियां बसला । कृष्ण जगन्नाथ हृदयीं शब्द सद्गुरुंचा डसला ॥न०॥२॥

पद २३ वें -
चाल - हरि भजनावीण काळ घालवूं नकोरे )
दत्त विष्णु गुरु नरहरि राम एक झाला । सच्चित्सुख आपण हा अनुभव जयीं आला ॥धृ०॥
करितां संसार काम । आठवतें नित्य नाम । तेंचि ब्रह्मानंद धाम । पाववी जिवाला ॥द०॥१॥
द्रष्टा हें दृश्य सकळ । नटला तरि स्थिति अविकल । नुरवुनि अज्ञान पटल । स्वस्वरुपीं विराला ॥द०॥२॥
दत्त विष्णु गुरु नरहरि । राम नाम जप अंतरिं । कृष्ण जगन्नाथ वरी । अद्वय भजनाला ॥द०॥३॥

पद २४ वें -
( भजनी चालीवर )
श्रीगुरु दत्तात्रेय दत्तात्रेय तोचि दाशरथि राम ॥धृ०॥
एकत्वें मज अनुभव आला । अखंड जपतां नाम ॥श्री०॥१॥
श्री नरसिंह सरस्वति स्मरतां । भेटे निज सुखधाम ॥श्री०॥२॥
विष्णु गुरु कृपा कृष्ण जगन्नाथा । फळली निष्काम ॥श्री०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP