मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें

श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
श्री लक्ष्मी नारायण सदया मज या भवनिधि पासुनि तारिं तारिं ॥धृ०॥
तळमळुनि विषयीं बहु मळविं मन । हळ हळ होउनियां मी भारिं भारिं ॥श्री०॥१॥
भय रहित आपण स्फुरविं निजात्म खुण । नुरविं देह मीपण संकट हें वारिं वारिं ॥श्री०॥२॥
अद्वय स्वरुप भक्ति देउनि ज्ञान विरक्ति । विष्णु कृष्ण जगन्नथ ब्रह्मानंदीं सारिं सारिं ॥श्री०॥३॥

पद २ रें -
लक्ष्मी नारायण प्राण सखा माझा । देखिला नयनीं वैकुंठींचा राजा ॥धृ०॥
वामांकि विराजे लक्ष्मी जगदंबा । दिव्यालंकार भरित विश्वकद्म्बा । जो निरालस्य प्रिय आत्म भक्त काजा ॥ल० दे०॥१॥
भव भय हे मिथ्या कळवुनि परिहारि । नवनव सुख दायक आत्मैक्य विचारीं । भक्तांसि गांजितां मोडी शत्रु माजा ॥ल० दे०॥२॥
जो वरद हस्त मस्तकीं मुकुट ज्याच्या । रत्न जडित कंठीं हार पदकांचा । आनंदिं मेळवि भक्तजन समाजा ॥ल० दे०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथचि हा कळला । सच्चिदानंदघन दासावरि वळला । दर्शनेंचि मज आनंद होय ताजा ॥लक्ष्मी नारायण प्राण सखा माझा । देखिला नयनीं वैकुंठींचा राजा ॥४॥

पद ३ रें -
लक्ष्मी नारायण पारायण करिं जिव्हे साचा । नाहीं पारावार सारा हा संसारचि असाचा ॥धृ०॥
परावर चराचर व्यापक श्री रमावर, धराधर शेषशायी वराभयकर स्मर, तरावया हाचि यत्न पारक भवाचा ॥ल०॥१॥
भरावया साध्वी चारी, पराभवी दुःखें सारीं, न राहवि विघ्नें वारी, हरां दिकां जो प्रियभारीं, मधुकैठभारी सत्य स्मारक जिवाचा ॥ल०॥२॥
दधी मधु द्राक्षारस, सांडुसि सर्व विरस, सच्चिदानंद सुरस नित्य घोंटी आत्मरस, विष्णु कृष्ण जगन्नाथ तारक हे वाचा ॥ल०॥३॥

पद ४ थें -
आजिचा सुदीन रे सुदीन आमुचा उदयला भाग्याचा । लक्ष्मी नारायण पाहिला दयाघन देव वैकुंठींचा ॥धृ०॥
वज्रजडितशिरिंमुकुटप्रकाशित कौस्तुभमणिकंठिंचा नवरत्नांचा हार गळ्यामधिं गाळ वैजयंती । भव्य भाळ सिंव्हासनि केवळ सच्चित्सुखमय मूर्ति ॥आ०॥१॥
नारद तुंबर गाति नाचति जे देहात्म वियोगी । सनक सनंदन सनत्सनातन तत्सुत जात योगी ॥आ०॥२॥
सुरवर ऋषिवर थाट बैसले सन्मुख जागो जागीं । मन्मन पाहुनि उन्मन झालें तन्मय अद्वय आंगीं ॥आ०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा छंद आत्म भजनाचा । मंद हसित आनंदकंद निरखुनि मुख पंकज नाचा ॥आ०॥४॥

पद ५ वें -
नित्य करुनि स्मरणातें, पूजित श्री लक्ष्मीनारायणातें ॥धृ०॥
सहस्र कमळें तुळसी वाहुनी, आलिंगुनि चरणातें ॥नि०॥१॥
अवलोकुनि शिरिं मुकुट कुंडलें, रत्नजडित श्रवणातें ॥नि०॥२॥
मंदहसित आनंद भरित करि, शुद्धांतःकरणातें ॥नि०॥३॥
निज भक्तांतें अनुदिनि रक्षुनि, नुरवि जनन मरणातें ॥नि०॥४॥
भजक मनोरथ पुरवि सदोदित, करि संकट हरणातें ॥नि०॥५॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ प्रभू, दे सुख पद शरणातें ॥नि०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP