पद १ लें -
मजविषयिं तें मन निष्ठुर कां केलें ॥धृ०॥
प्रर्हादासाठीं कडकड घडघड शब्दें, स्तंभिंच जें उदेलें । गजेंद्रासी नक्रें गांजितां, होउनी सकृप जें त्वरें गेलें ॥मज०॥१॥
होउनि भक्तांसी लंपट हरी जें, संकट आयिकेलें । कीर्ति किती संत महंतांची चित्त स्वानंद होउनि ठेलें ॥मज०॥२॥
दुर्जन वधार्थ सज्जन सुखार्थ जागृत जें न निजेलें । विष्णू कृष्ण जगन्नाथ सच्चित्सुखपावाया चित्त भुकेलें भेटुनियां बहु भक्त समाधान कार्य सिद्धिस नेलें ॥मज०॥३॥
पद २ रें -
धांव रे धांव माझ्या पंढरिनाथा । श्री रघुनाथा । सोसवेना मज या संसार वृथा ॥धृ०॥
पुत्र नातु पणतु सुना आणि जावया । भुलुनियां पाहे माझें वय जावया ॥धां०॥१॥
तूंचि एक मज मागें पुढें रक्षिता । किति वेळ झाला तुझि वाट लक्षितां ॥धां०॥२॥
जळुं ऐसें जिणें माझें लाजिरवाणें । घडि एक नाहीं तुझें नाम मुखीं गाणें ॥धां०॥३॥
कोणीकडे जाऊं तुज पाहुं कोणे ठाया । नेणों कधीं पडेल हे नाशिवंत काया ॥धां०॥४॥
धरुंनियां सोस विषयांचा अंतरीं । जन्म मरणाच्या पडलों मी भरी ॥धां०॥५॥
अससि हृदयिं निश्चय मानसाचा । अंत पहातोसी काय दिना गरिबाचा ॥धां०॥६॥
अपराधि म्हणूनी मी त्यजिसी तूं जरी । सदय हृदय नाम गेलें तुझें तरी ॥धां०॥७॥
सोडुनियां ऐसा मज रहासि तूं ऊगी । संतपथें आपणासी आकळीन जगीं ॥धां०॥८॥
सच्चित्सुख विष्णु कृष्ण जगन्नाथा । सद्भावें गाइन नीत्य आत्म गुण गाथा ॥धां०॥९॥
पद ३ रें -
आतां कैसा सोडिन तुला मी सांपडला अंतर्यामी ॥धृ०॥
तुज शोधितां श्रीरामा रे काळ गेला बहु सुखधामा रे ॥आ०॥१॥
आजी गवसलासि हाता रे । उलत दृष्टीनें पहातां रे ॥आ०॥२॥
जरि तूं नाना रूपें धरिसी रे । एक सच्चित्सुखमय स्फुरसी रे ॥आ०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथारे । मुखें गाइन निजगुण गाथारे ॥आ०॥४॥
पद ४ थें -
किति काळ झाले अजुनि न भेटसी मज । येतां वाटे कोणि काय आडविलें तुज । काय गरिबाची माझी करितोसी मौज । तुजविण कंठवेना मज प्रतिरोज । राम हरे कृष्ण हरे गोविंद हरे गोपाल हरे ॥रा०॥१॥
दिला मज मनुष्य जन्म तुवां आईबापें । न भेटसि काय माझीं सरलीं न पापें । गिळियलें पहा मज मृत्यु रुप सापें । कासाविस झालों संसाराच्या धापाधापें ॥रा०॥२॥
पुरे नको आला विट प्रपंचाचा जाण । वाटे जीव द्यावा गळां बांधुनि पाषाण । येरे झडकरिं माझा जाऊं पाहे प्राण । त्रिविध तापें तापयलों मी देवा तुझी आण ॥रा०॥३॥
माझ्या कन्या माझे पुत्र म्हणतां माझी दारा । सरलें आयुष्य दे रे आत्म पदीं थारा । विषय वासनांचा मज लागों नेदि वारा । आपणा विरहित कोणी न मज उदारा ॥रा०॥४॥
वाट पाहे तुझी विष्णू कृष्ण जगन्नाथा । कळे तैसी गातों प्रेमें निजगुण गाथा । न करीं विलंबा येरे वेगें दिनानाथा । ठेविन सद्भावें आत्मपदावरी माथा ॥रा०॥५॥
पद ५ वें -
व्यर्थ हें वय जाय तुज विण हें राघवा । मज भेटसी तूं केधवां ॥धृ०॥
शामल सुंदर राम मनोहर दर्शन दे निज भक्ती लाघव ॥व्य०॥१॥
गृहधन दारा मोह पसारा भ्रमकर वाटे आघवा ॥व्य०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ दयाळू त्रिजगांत । उद्धरिं जानकीच्या धवा ॥व्य०॥३॥
पद ६ वें -
मज तारीं रे तारीं रे राघवा । तारीं दशवदनारी विघ्नें हीं निवारीं ॥मज तारीं॥धृ०॥
काया वाचा मनें तुज शरण मीं रघुराज दाविं निज पद राजिवा मला ॥वेगीं दाविं०॥ दुस्तर हा भवजलधि न तरवे करीं कृपा दृष्टी देवा कष्टी झालों भारीं ॥मज०॥१॥
नेणुनि आत्मभजन विषयीं भ्रमुनी मन विसरवि स्वसुख जिवा रघुत्तमा ॥वि०॥ क्षणभंगुर तनु धीर न, गेलें जातें वय माझें या संसारीं ॥मज०॥२॥
राम विष्णु गुरु साक्षी कृष्ण जगन्नाथ लक्षी आपण चिद्घन दिवा अलक्ष जो ॥आपण०॥परी देह बुद्धी खोटी हरितां न हरवे धांव झडकरिं ब्रह्मानंदिं वृत्ति सारीं ॥मज०॥३॥
पद ७ वें -
रामा माझीच चूक मज कळली कळली रामा०॥धृ०॥
बाळपणिं बाळमती धरुनी बाळसंगती । खेळतां खेळतां वृत्ति मळलि मळली ॥रा०॥१॥
मन्मित्र पुत्र कलत्र स्मरतां दिवस रात्र । माया हे चित्र विचित्र बळलि बळली ॥रा०॥२॥
तरुणवयि पाहुनि तरुणि नयनी । केली करणी वाइट स्थिति चळलि चळली ॥रा०॥३॥
विष्णु गुरु ज्ञान देतां त्यांचि कृष्ण जगन्नाथा । तेणें देहींची अहंता गळलि गळली ॥रा०॥४॥
पद ८ वें -
सत्संगें तुजला श्रीरामा गांठिला न सोडिं रे ॥धृ०॥
मिथ्या माया दृष्य पसरा द्रष्टा तूंचि नटला सारा रे । थारा स्वस्वरुपींच मजला निजानंद गोडी रे ॥स०॥१॥
जरि पैसावसि कांहीं बळें धरिन हृदयिं पाहीं रे । भक्तांहुनि प्रिय तुज नाहीं ( रे ) कळली हे खोडी रे ॥स०॥२॥
सर्वदा तुज गातां ध्यातां विष्णु कृष्ण जगन्नाथा रे । ऐसी पदवी आली हाता सच्चित्सुख जोडी रे ॥स०॥३॥
पद ९ वें -
शरण तुला मिं राघवा, तारीं दशवदनारि रे ॥धृ०॥
शाम सुंदर प्रभुराम दयाघन, वर्षुनि त्रिताप वारीं रे ॥श०॥१॥
अवलोकिन तुज हेतु असा मज, उपजला मनिं भारीं रे ॥श०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा सोसवेना भव व्यथा, जन्म मृत्यु परिहरीं रे ॥श०॥३॥
पद १० वें -
दाखवि पद पंकज रघुराज एकदा ॥धृ०॥
जाचवि मति पांच विषयिं लाचवली सदा, साचरे तुजवांचुनि अघ सांचलें चित्तिं कांच बैसुनि वांचेना कदा ॥दा०॥१॥
जानकिपति पाहसि किती अंत सर्वदा, संत सद्गति सत आत्म चिंतनिं मज भेटुनि हरिं वेगिं आपदा ॥दा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ इछि दैवि संपदा, कंपवि देहा हंपण दुःसंपवि अपरंपरा नुरविं असन्मदा ॥दा०॥३॥
पद ११ वें -
तूंचि जननि जनक निज जानकी जीवन मज तारक सर्वदा ॥रामा०॥ सदया, उदयासि सदोदित ये हृदयांत हरी विपदा । चरणिं शरण भव तरणिं करुणाघन स्मरण तुझें सदा ॥रा०॥धृ०॥
जाचवि मन जनिं याचुनियां वांचविं श्रीहरि यांतुनियां ॥ नाचवि घडी घडि धरुनि विषयिं गोडी आवरिं एकदा ॥रा०॥ करुं काय, प्रभो न उपाय सुचे, तुज गाय मुखें शतदा, । पुरे पुरे पुरे इहपर विषयिक सुख मुक्त नव्हे कदा ॥रा०॥स० च० तूं०॥१॥
क्षणभंगुर चर नरकाया, परमात्मा श्री रघुराया माया मय जाया गृह सुत धन मिथ्या संपदा ॥रा०॥ व्यवसाय मुळें वय जाय, न पाहुनि पाय तुझे सुखदा । मुख दाखवुनि माझें चुकविं सकळ दुःख नुरवुनि आपदा ॥रा०॥स० च० तूं०॥२॥
जरि अपराधी अनंत तरी, रक्षण तुजविण कोणा करी, न क्षणभरि धीर न धरावे अंतरिं परमानंददा ॥रा०॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ नाम तुझें स्मरि शामसुंदर वरदा । घरदार, परिवार, तुजवरि सारा भार आळवितों पदा ॥रा०॥स० च० तूं०॥३॥
पद १२ वें -
पहावा राम सदोदित हाचि मला हेतु भारीं ॥धृ०॥
जिवन जिवाचें धाम सुखाचें नाम जपे त्रिपुरारी ॥जयाचें ना०॥प०॥१॥
काम मनोहर शामसुंदर वामांकिं जानकी नारी ॥जयाचे वा० प०॥२॥
स्मरणिं अखंडित चरणिं पवन सुत करणि अगम्य संसारीं ॥जयाची क० प०॥३॥
जनक जननि जो भक्त जनाचें संकट विघ्न निवारी ॥जनाचें सं० प०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सदा अद्वय आनंदकारी ॥सदा अ०॥प०॥५॥
पद १३ वें -
पद मनोहर शामसुंदर जानकी वर पाहिं सदोदित ॥धृ०॥
चाप बाण धर ताप सकल हर यापरता नाहिं दयाघन या० आप शिवाचा बाप जयाचा सुख दाता देहिं अखंडित ॥रा०॥१॥
स्नेहि असा मज ज्या विण न दिसे जनिं विजयीं गेहीं सर्वदा ॥रा०॥२॥
एक असुनि जो अनेक याची किती वदुं नवलाई । सेव्य सेवक व्याप्य व्यापक त्रिंजगाचे ठायीं ॥रा०॥३॥
चिन्मय स्वरुपीं तन्मय असतां जन्म न तुज बाई । साच कीं राम विष्णु कृष्ण जगान्नाथचि तरिल लवलाही ॥रा०॥४॥
पद १४ वें -
अजुनि कां न येसि राम राया रे । गेलें माझें व्यर्थ वय वायारे ॥अ०॥धृ०॥
प्रपंच हा करितो मज क्षिण रे । उबगलों वाटुनि बहु शीण रे । जाउं कोणा शरण तुजवीण रे । कोण काजी गुंतला कोणा ठाया रे ॥अ०॥१॥
विषयींचे जाच जाणुनि रे । निज बळें लाथ हाणुनि रे । राजे गेले राज्यें सोडुनि रे । एकांत स्वरुपीं रमाया रे ॥अ०॥२॥
रघुविरा राजीव लोचना रे । कोणाशीं करुं मी याचना रे । विशयाशा बंध मोचना रे । क्षणभंगुर हे तौं काया रे ॥अ०॥३॥
भेटीसाठीं तळमळत भारीं रे । मुखें गातों श्रीराम कृष्ण हरी रे । सुख व्हाया बहुत अंतरीं रे । आळवितों अद्वय रस प्यायारे ॥अ०॥४॥
कृष्ण जगन्नाथ हेतुला रे । न पुसतां लाज हे तुला रे । भव समुद्रींच्या सेतुला रे । दाखविं दिव्य तव पायारे ॥अ०॥५॥
पद १५ वें -
भक्तांचा कैवारी श्रीराम आजि मा पाहिला ॥धृ०॥
कोटि मदन लावण्य मनोहर स्तविति पुजिति, ब्रह्मादिक सुरवर रत्न जडित सिंहासनि रघुविर जानकीसह शोभला हो ॥कै०॥१॥
उमारमण शिव सांब निकट अति, भक्तियुक्ति करि नम्रपणें स्तुति, नाम स्मरणें वार गर्जति, थाट वाटतो भला हो ॥कै०॥२॥
चाप बाण करिं ताप समुळ हरी, पाप परि हरुनि आपण सुख करि, बाप माय विश्वासाचा श्रीहरि, दिव्य नयनिं झोंबला हो ॥कै० भ०॥३॥
काम जनक निज नाम प्रिय निष्काम, भजक जन काम पूर्ण करि धाम, सौख्य कल्पद्रुम साचा दृढ हृदयीं खोंवला हो ॥कै० भ०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथा, दिवस रात्र आवडीनें ध्यातां, अद्वय मुक्ति सुखाचा दाता, अलभ्य हा लाभला हो ॥कै० भ०॥५॥