पद ३१ वें -
चला चला पाहुं राम राजा अयोध्येचा । आजि सुदिन सोन्याचा, भाग्योदयचि आमुचा ॥धृ०॥
दिव्य सिंहासनीं शोभे, भव्य दश वदनारी । सव्य भागीं लक्ष्मण वामांकीं जानकी नारी । श्यामल सुंदर पूर्ण सागर दयेचा ॥पा०॥१॥
रत्न जडित माथां, मुकुट कुंडलें कानी । गळां वैजयंती माळा, पितांबर परिधानी । पूर्ण ब्रह्मानंद दाता विजय श्रीयेचा ॥पा०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, नित्य आत्म भजनांत । होउनि आनंदमय नाचे संत सज्जनांत । नाम संकीर्तनाविण वय हें न वेंचा ॥पा०॥३॥
पद ३२ वें -
न येसि कां रे अजून प्रभु जानकि जीवना । जगदवना, सुख भवना ॥न०॥धृ०॥
पाप जनित हे त्रिताप गांजिति, माझि मति पहा कशि । जिकडून् तिकडून् मज सोसवेना ॥न०॥१॥
न सुचे कांहिं उपाय, हरिं हे अपाय, काय पाहसी गम्मत् । हटकुन् पकडून् करिं शत्रु हवना ॥न०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ, दावि निज पाय मज । माय बाप तूंचि तुज, हुडकून् मांडिलें स्तवना ॥न०॥३॥
पद ३३ वें -
पुरवि मनाची तान, राम आनंद निधान । नुरवि देह भान ज्याचें ध्यान छान छान ॥धृ०॥
विश्रांतीचें स्थान दे मज सुख समाधान । नाहीं ज्या समान, व्यापक आन मान मान ॥पुरवि०॥१॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ निजानुसंधान । धरितां भगवान्, करवि अमृत - पान् पान् ॥पुरवि०॥२॥
पद ३४ वें -
तूं झहकरिं ये श्रीरामा रे । तूं झडकरिं ये श्रीरामा रे । श्रीरामा रे, श्रीरामा रे ॥तूं०॥धृ०॥
विषय वासना संग करी मनोभंग, निजात्मा रामा रे । नाम रुपात्मक देहभाव हरीं, भेट देउनि सुखधामा रे । सुखधामा रे । सुखधामा रे ॥तूं०॥१॥
त्रिविध ताप मज जाचवि हे मति, कांचवि मेघश्याम रे । नाचविते अति चित्त निरंतर, कल्पुनि स्त्रीधन कामा रे । धन कामा रे । धन कामा रे ॥तूं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ शरण मी, दावी पद स्वयंधामा रे । या मानव जन्मी भजन रहित, जाऊं काल न रिकामा रे । न रिकामा रे । न रिकामा रे ॥तूं०॥३॥
पद ३५ वें -
धरुनि आलों आपुल्या प्रेमा ॥ गा श्रीरामा ॥ मेघश्यामा ॥ करुणा दृष्टीं मजकडे पाहें ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥धृ०॥
जन्मुनि जन्मुनि वारंवार । करितां श्रमलों हा संसार । पुरे झाला जीव बेजार ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥१॥
आपण अखंड सुख साचार । नकळुनि किती भ्रमलों अनिवर । माझा मज कळला अविचार ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥२॥
नेणुनि नित्या नित्य विचार । मी तव अन्यायी हा फार । आत्मज्ञानें करिं उद्धार ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥३॥
तुजसम त्रिजगीं नाहिं उदार । आतां करिं इतका उपकार । शाश्वत चरणीं देईं थार ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥४॥
सच्चित्सुख हेमालंकार । नटसी विश्वात्मक अवतार । विष्णु कृष्ण जगन्नाथाकार ॥गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥५॥
पद ३६ वें -
येईं रे येईं रे वेगीं येईं रे श्रीरामा । कां रे अजुनी अंत पहासी, संत मनोविश्रामा ये०॥धृ०॥
निष्ठुर नव्हसी कधीं आयकों पुराणीं । भक्त जनाची कळवळ ऐसी, गर्जे व्यास वाणी ॥येईं०॥१॥
तुजवीण माझें निज सुख बोलवेना । भजन पुजन नित्य, नेम चालवेना ॥येईं०॥२॥
किती आठवूं या खोट्या जाणुनी प्रपंचा । तोटा आयुष्याचा न सरे, मोठा कर्म संचा ॥येईं०॥३॥
विष्णु कृष्ण जगनाथ स्मरे निज नामा । या मानव जन्माचें साधन, आपण मुखधामा ॥येईं०॥४॥
पद ३७ वें -
तुज नमो जनकजा पति ॥राघवा॥ तुज नमो जनकजा पती ॥ तूं घालिसी उडी भक्तांच्या संकटीं ॥तु०॥धृ०॥
हुस्तरभवजलधि निस्तारिं हा निरवधि प्रभुसदया, करुनि दया ॥तु०॥१॥
मारिले त्वां असुरांसि, तारिले नर सुरांसि । वारुनि भया, करिं अभया ॥तु०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । रक्षिसि मज अनाथा । लक्षुनि बरा, जानकि वरा ॥तु०॥३॥
पद ३८ वें -
राजीव नयन हरे, जगजीवन मूरारे । निज नेट लाउनि, भेटसी कधिं, थेट सुविचारें ॥धृ०॥
कामादि षड्रिपु रे, रामा न ठेविं पुरे । मी रंक, तव पदपंकजीं निःषंक करीं बारे ॥रा०॥१॥
नरदेह न राहिल रे, परमार्थ जाइल रे । यमराय दंडिल काय कशी रघुराय, सुटका रे ॥रा०॥२॥
करुणा सागर रे, अद्वय सुखागर रे । विष्णु कृष्ण जगन्नाथ, नित्य तुज गात, आत्म निर्धारें ॥रा०॥३॥
पद ३९ वें -
रामा स्वरूपीं चित्त वृत्ति वळविं वळवीं ॥धृ०॥
गळउनि हंकृति कळविं स्वसुख मज । मळविं संसार दुःख टळवीं टळवीं ॥रामा०॥१॥
होऊनि विषयीं तळमळत मानस । कळवळुनि दुरितें सारीं पळवीं पळवीं ॥रामा०॥२॥
चपळ पणमनाचें सकल हरुनि । विष्णु कृष्ण जगन्नाथ पदिं मिळवीं मिळवीं ॥रामा०॥३॥
पद ४० वें -
मज कां रे रामराया संसारीं भारीं गांजविला ॥धृ०॥
तूं कैवारी निज भक्तांचा । अशि गर्जे संतांची वाचा । दृढ धरिला निश्चय हा साचा । परि अजुनी भेट द्याया, काय पापें माझ्या लाजविला ॥म०॥१॥
तूं करुणाघन सज्जन वदती । शरणागत दासां देशि गती । परिनिष्ठुरता मनि धरिशि किती । अवतरसी ठायिं ठायीं, साधूनीं डंका वाजविला ॥म०॥२॥
ये विष्णू कृष्ण जगन्नाथा । दे दर्शन झडकरिं बा आतां । मी गाइन घडि घडि गुण गाथा । दीनातें उद्धराया, त्रैलोक्यीं महिमागाजविला ॥म०॥३॥
पद ४१ वें -
दाविसि कधिं पाया, हरिति जे अज्ञान अपाया ॥धृ०॥
आळवितों किति तुज सीतापति, मज दर्शन व्हाया ॥आपुलें मज०॥ हा मायाब्धि तराया, गुण गाया, रघुराया ॥दाविसि०॥१॥
मंद हसित मुख अखंडात्मसुख, अंगें अनुभवाया । हृदया या, उदया या, पदिं काया, अर्पाया ॥दाविसि०॥२॥
धीर तुझा रघुवीर मानसिक, दुःख अंतराया ॥ जीवाया श्रमवाया, भ्रमवाया, सुत जाया ॥दाविसि०॥३॥
कंज लोचना वंधमोचना, न करिं उशिर या या ॥ अवताराया, रिपु माराया, उद्धराया मन थाराया ॥दाविसि०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ, त्रिभुवन ताराया ॥ भूभारा या, तूं हाराया, अघ साराया, अभय कराया ॥दाविसि०॥५॥
पद ४२ वें -
रघुराज न धरिं वाज आत्म भक्ति दे सदा ॥धृ०॥
नरतनु त्वां दिधलि खरी । मळलि विषयिं बहुत परी । करुनि कृपा दृष्टि बरी । सदय हृदय झडकरिं मज, भेट एकदा ॥रघु०॥१॥
स्थिर धरिं सुहृदात्प वित्त । चंचल विषयांत चित्त । विनवि मि तुज या निमित्त । न करिं उशिर तळमळे मति, येसि तूं कदा ॥रघु०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । कळविलि तुज सर्व मात । तूं तो अससि दिनानाथ । दाखविं सच्चित्सुखमय, आपुल्या पदा ॥रघु०॥३॥
पद ४३ वें -
मज तारक तूं श्रीरामा रे ॥धृ०॥
पारक भव अवतार तुझा हा । भयहारक निज सुखधामा रे ॥मज०॥१॥
फार कठिण संसार तरी हित - । कारक गाइन नामा रे ॥मज०॥२॥
मारक दुर्जन भार कळत क्षण । स्मारक जन विश्राम रे ॥मज०॥३॥
गार करिसी निर्धार भजनीं । सुविचारक जगदाभि रामा रे ॥मज०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ पतित । उद्धारक मेघश्यामा रे ॥मज०॥५॥
पद ४४ वें -
अनन्य मी शरण तुला श्रीरामा । प्रियभक्त निज पूर्ण कामा ॥धृ०॥
जागृति स्वप्न सुषुप्ति विलक्षण । आपण निजसुख धामा ॥अ०॥१॥
नाम रुपात्मक विश्व प्रकाशक । एक अनेक विरामा ॥अ०॥२॥
त्रिभुवन साक्षी अलक्ष लक्षी । आपण आठवुनि निजधामा ॥अ०॥३॥
आत्म विचारें आत्म स्वरूपीं । विरवीं मेघश्यामा ॥अ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथात्मज । नाहीं क्षणहि रिकामा ॥अ०॥५॥
पद ४५ वें -
पुरे हरी नको मजला संसार ॥धृ०॥
मीपण घेउनि व्यर्थचि फिरलों । परि हें सर्व असार ॥पु०॥१॥
सूक्ष्म विचारें सत्य गमे कीं । तव नाममृत सार ॥पु०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याचा । वेळ कीर्तनीं सार ॥पु०॥३॥
पद ४६ वें -
नारायण तुज न ओळखिला ॥धृ०॥
न कळे कांहिं वाटत गोड विषय । साठत पाप निचय आटत सकळ वय । कां रे हरे उगिच मला भ्रम येथ करुनिं ठेला ॥का०॥ना०॥१॥
नाहीं नाम रस प्रेम धरुनियां सेवियला । फिरतां संसारीं हे लुब्ध झाला । साच अनुदिनीं जाच होय जिव वायां गेला ॥कां०॥ना०॥२॥
दृढ आशापाश तेणें जाय पर सदनाला । भासे दुर्दैव योग आड आला । भजन पुजन ध्यान न घडे खलचि केला ॥कां०॥ना०॥३॥
विप्र जगन्नाथ बाळ करि आळ होई त्याला । प्रसन्न तोडीं तव बंधनाला । दुर्जन षड्वैरी यांच्या संगें कृष्णदास भ्याला ॥कां०॥ना०॥४॥
पद ४७ वें -
हृदयीं धीर मज रघुवीर तुझा गंभीर भव जलधि तीर आत्मपद राघवा देवा धांव झडकरिं ॥हृ०॥धृ०॥
स्वजन भजन रत विजनिं असति दिन रजनि रजनीचर पीडिति सुरां, असें कमल जनित पद कमलिं विनविं जइं तेधवां, वेगें भुमि मार हरि ॥हृ०॥१॥
करुनि निज कृपा पात्र देइं चिन्मात्र भेटि हे वरद वरा, कोटि मदन सुंदर तनु वदन हसित सीताधवा, येरे विलंब न करिं ॥हृ०॥२॥
पुत्र कलत्र भ्रम मात्र सकळ परि रात्र दिवस करि विकळ खरा, प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथ भोगुनि विटलों भवा, नको नको मन्मवरि ॥हृ०॥३॥
पद ४८ वें -
श्रीरामचंद्र रघुराज चरण मज दाविं एकदां ॥धृ०॥
शामसुंदर भक्तकाम कल्पद्रुम नाम तुझें तरि आज ॥च०॥१॥
अंत रहित तुज संत वळखती अंतरिंचि हरि लाज ॥च०॥२॥
कंजनयन भवभंजन मुनि मन रंजन हें करिं काज ॥च०॥३॥
राम विष्णू कृष्ण जगन्नाथा ध्यास मनिं न धरिं वाज ॥च०॥४॥