पद ४१ वें -
आत्मभक्तांचा सारथी । तो हा राम दाशरथी । वैष्णवांचे मनोरथीं । सीतापती सर्वदा ॥धृ०॥
चिद्रत्न जडित सहजासनी । आपण राजाराम त्रिभुवनीं । निजांकीं चिच्छक्ती भामिनी । जानकी ते धरियेली ॥आ०॥१॥
ऐसा आत्माराम राजा । केवळ प्राणविसावा माझा । उडी घालुनि भक्तकाजा । मूर्तिमंत बैसला ॥आ०॥२॥
लक्ष लाउनी सज्जन । अलक्ष लक्षिति चिद्घन । तो हा राम सनातन । ब्रह्मानंद प्रगटला ॥आ०॥३॥
सन्निध विवेक मारुती । ज्यासि दृश्याची उपरसी । आत्माराम पूर्ण ज्योती । चित्तीं चिंती सर्वदा ॥आ०॥४॥
वैष्णव सद्गुरु करुणामूर्ति । ज्यांची त्रैलोक्यीं सत्कीर्तीं । कृष्ण जगन्नाथ रफूतीं । स्वस्वरुपीं मेळविली ॥आ०॥५॥
पद ४२ वें -
रघुनंदन वंदन करुं तुजला । भेटुनि करुं आनंद मला ॥धृ०॥
ग्राम देवतेच्या द्वारीं । नुरवुनि दुष्ट महामारी । ग्राम सकल हा तारीं । प्रभो श्रमला ॥र०॥१॥
होउनि तूंचि सहकारी । परि हरि विघ्नें हीं सारीं । न करी विलंब सुरक्षीं । जिवें दमला ॥र०॥२॥
भयभित मानसिं नरनारी । तुजवरि विश्वासति भारीं । रक्षिसि तूंचि जगांत । दुजा न मला ॥र०॥३॥
पाळिशि भक्तां दिवस निशीं । तरि अंत आमुचा किति पहाशी । त्वरित सकल भय नाशी । प्रभो अमला ॥र०॥४॥
सकळ देवता तूंचि खरा । दाविसि प्रत्यय हाचि बरा । विष्णु कृष्ण जगन्नाथ हृत्कमला ॥र०॥५॥
पद ४३ वें -
जय जय रघुविर समर्थ माझा ज० वारिल सकल भय तारिल दृढ निश्चय ॥धृ०॥
काम क्रोधादिक षड्रिपु नुरउनि । पुरवुनि मनोरथ करिल आनंदमय ॥ज०॥१॥
भक्तांसाठीं कळकळ मोठी । पाठीं पोटीं रक्षुनियां दाविल आत्मउदय ॥ज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथचि तो जेथें तेथें आत्म नेटें भेटेल स्वसुखमय ॥ज०॥३॥
पद ४४ वें -
मंदमति मि प्रभु वंदितों तुज रघुनंदन दाशरथे । मति हे भ्रमते, श्रमते नावडत गृह दारा पुत्र स्नेह जाचवि मीं देह भ्रमला ॥धृ०॥
काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा, रिपु महा विषयिं पीडिति, जन्मासि आणिति, आवेशें ताडिति स्वहिता नाडिति, विरोध साधिति, भक्ति मार्गा प्रति, भक्तरते ॥मति हे भ्रमते०॥१॥
चिद्रत्न खाणि जानकि जननि आत्मध्यानि शंभुला, स्वयंभुला स्थिरवुनि प्रेम पुरवुनि, श्रम दुरवुनि, दुःख मुरवुनि, सुख स्फुरउनि चित्त मुरविसि नित्य शुद्ध मते ॥म०॥२॥
दीन गरिब मी त्यजीं न मज । अकीर्ति हे तुला, अहेतुला तुला, विष्णु कृष्ण जगन्नाथ पदांबुज दावुनि कलविं, निज हितगुज सांडुनियां लाज भाकितए तुज रघुपते ॥म०॥३॥
पद ४५ वें -
लंकेश रिपु नृपते, साकेताधिपते, स्वनिकेतनि मनि हेत राहिन श्वेत छत्रपते ॥धृ०॥
कर कंकणान्वित ते, नर देव हित कर ते । आइबाप वर शरचाप धर, मत्पाप हर सुमते ॥लं०॥१॥
हे मंद हंसित मुख रे, संसारिं न मज सुख रे । अकलंक, दावि पदपंकद, श्रीशंकर - प्रियते ॥लं०॥२॥
शिरिं रत्नमय मुकुट रे, भ्रुकुटि शुशोभित रे । आनंद जनक, जनकजासहित, दे दर्शन विश्वपते ॥लं०॥३॥
मत्जनन मरण हर रे, परिपूर्ण कृपा कर रे । घेउनि भार, सहपरिवार, मज उद्धार परम गते ॥लं०॥४॥
हे मन्मन चालकरे, हे त्रिजगत्पालक रे । त्वन्मूर्ति, चिन्मय रफूर्ति, विरवित कीर्ति, तन्मय ते ॥लं०॥५॥
रघुवीर स्मरण तुझें, करिं स्थीर चित्त सहजें । तव नेट मानसिं भेट, दे मति आत्मरुपीं रमते ॥लं०॥६॥
हे नवनव हर्षद रे, मन पवन सुखास्पद रे, आनंद घन, तुज वंदन न मन, अन्यत्र पर ते ॥लं०॥७॥
तूं जग नग जरक बरें, सच्चित्सुख कनक बरें । तूं व्याप्य, व्यापक विष्णु कृष्ण जगन्नाथ, अखंड भक्त रते ॥लं०॥८॥
पद ४६ वें -
मंद हसित वदन सुख सदन मंद० कुंदरदन किति सुंदर सांवळाराम ॥मं०॥धृ०॥
यत्स्वरूप चिंतन, भवबंध, निकृंतन, केवळ आनंद चिद्घन, पाहेन वेळोवेळ राम ॥मं०॥१॥
षड्रिपु कंदन, श्रीरघुनंदन त्याचे पदि सद्भावें वंदन, पट ज्याचा पिंबळा राम ॥मं०॥२॥
रत्नमुकुट शिरीं, आंगिं वस्त्रें भरजरि, शोमे सालंकृत भारीं भक्तांचा सोहळा राम ॥मं०॥३॥
पदक रत्न मुक्तमाळा, लखलख होती ज्याच्या गळां, जिवाहुनि जो आगळा, प्रेमाचा पुतळा राम ॥मं०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ, ऐसें स्मरतां स्फुरवित, विश्वतरंगीं आपण अद्वय चिज्जल राम ॥मं०॥५॥
पद ४७ वें -
भक्त जिव्हाळा भक्ती लाघव, राम जय सीताराम राघव ॥धृ०॥
प्रेमपूतळा जनकजा धव ॥रा०॥१॥
प्रगट होय भक्ती घडे ज्या नव ॥रा०॥२॥
तो हा ज्या स्मरत अर्पणाधव ॥रा०॥३॥
देवादि देव भेटला होउनि मानव ॥रा०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ श्री वैकुंठ रमाधव ॥रा०॥५॥
पद ४८ वें -
दशरथ नंदन मेघश्याम, रविकुल मंडण राजाराम ॥धृ०॥
तारक सकलां मंत्र जपा हा, देइल सुख विश्राम ॥द०॥१॥
पापजनित संतप हरुनि, निष्पाप वरिल हें नाम ॥द०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु, भक्त हृदय आराम ॥द०॥३॥
पद ४९ वें -
मंत्र शिरोमणि मंगलधाम, श्रीराम जय राम जय राम ॥धृ०॥
नित्य जपत शिव विश्रांतीस्तव, पार्वति प्रियकर नाम ॥ज०॥१॥
साधन ऐसें त्रिजगांत नसे, पुरवित इच्छित काम ॥मं०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ सदा-, वश जपतां निष्काम ॥श्री०॥३॥
पद ५० वें -
राम जय राम जय राम जय राम, पवित्र सुखकर जनीं अभयकर गाउं वदनि प्रिय नाम, सीताराम जय राजाराम, जयराम जयराम जय जय राम ॥धृ०॥
दशरथ नंदन रविकुल भूषण कौसल्या विश्राम, पंकज लोचन राजाराम सीताराम ॥रा०॥१॥
रावण मर्दन राम राघव वाली मर्दन राम, सीता राघव जय जय राघव जय रघुविर सीताराम ॥रा०॥२॥
सीतारंजन मेघश्याम, कौसल्या सुत पंचवटी स्थित राम, जय जय दशरथ नंदन राम ॥रा०॥३॥
कोदंड खंडण दशशिर मर्दन कौसल्या सुत राम, सीतानंदन राजाराम, श्री सीताराम सीताराम ॥रा०॥४॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ सदोदित पुरविल काम, श्रीराम जो सुखधाम गातां नाम विपद विराम ॥रा०॥५॥