पद १ लें -
रामा नमन तुला पावन नामा, परिपूर्ण कामा । मुळिंचा चिद्घन तूं निज सुख धामा, मुनि मन विश्रामा ॥धृ०॥
असतां सहज निजाश्रमिं तो नसतां, येउनियां डसतां । शक्राहंकार न जाणुनि फसतां, पति मजवरि कसतां ॥रा०॥१॥
पतितें भ्रष्टाविलि शुद्धा मतितें, ये क्रोध पतितें । शापें दे जन्म शिलेचें सतितें, करि उःशाप तितें ॥रा०॥२॥
कळला मत्प्रिय कर वर हा फळला, पापौघ जळला । सच्चित्सुख राम दयाघन वळला, भवताप पळला ॥रा०॥३॥
तो तूं जो निरहंकृति निर्हैतू, हें सत्य परंतु । नटला जगपाळ या जिवजंतूं, जेवीं पटतंतू ॥रा०॥४॥
माया हे होय शिलामय काया, परि ती सहराया । धरिला अवतर तृषां रघुराया, मज उद्धराया ॥रा०॥५॥
धंदा हाचि सदां कृष्ण मिलिंदा, स्वपदारविंदा । नचुक निज चिन्मधुप्राशन छंदा, दे परमानंदा ॥रा०॥६॥
माथां कर ठेउनि निज परमार्था, वदवीं हृदयस्था । वर दे विष्णु कृष्ण जगन्नाथा, रघुवीर समर्था ॥रा०॥७॥
पद २ रें -
जानकी जीवन मज भेटला । कमल नयन रामभक्तजन पूर्ण काम । सदैव ज्याचें नाम वारि संसारींचा श्रम । विधिशिव सुखधाम । विलोकितां घनश्याम । हृद्गत शोक आटला । सद्गद कंठ दाटला । सुकाळ अवघा वाटला ॥जा०॥धृ०॥
मुकुट कुंडलें माळा शोभे वैजयंति गळां । पीतांबर पिंबळा सुंदर आगळा । कोटी सूर्य प्रभाफांके अंगीं वर्ण सुनीळा । सच्चित्सुखघन एकला । त्रिजगद्रूपें फांकला । परि निज भक्तां वीकला ॥जा०॥१॥
वामांकिं जनक बाळा शुद्ध विज्ञान कळा । उभा लक्ष्मण दक्षिण भागीं मारुति धरि पद कमला । चरणांगुष्ट चोखुनि तत्सुखीं तन्मय वृत्ती अचला । लंपट तप्तदिं जडला । भक्ति सुखामृतिं बुडला । अलभ्य लाभ हा घडला ॥जा०॥२॥
प्रभुराजा रामधनी धृतशर चापपाणीं । रत्नजडित सिंहासनीं शोभे सांवळा । प्रेमाश्रु पाझरे डोळां ऐसा सुख सोहळा । वैष्णव गुरु पद कमला । कृष्ण मिलिंदवत् रमला । ज्या स्वरूपीं विश्रामला ॥जा०॥३॥
पद ३ रें -
नमिन वेळोवेळां जानकि राम हा ॥धृ०॥
जन्माचा सांगाति, तो हा माझा रघुपति, सदैव एकांतिं आठविन ज्या । जेथें तन्मय होतां वृत्ति, दूरि देह भाव चित्तीं, उन्मनी हे आयति महा ॥न०॥१॥
त्रितापें तापति त्यां, विश्रांति सितापती, ब्रह्मांदि गाति कीर्ति राघवाचि या । शोभे सिंहासनिं मूर्ति, तेजोमय सांगु किति, रवि शशी लोपति पहा ॥न०॥२॥
वैष्णव संगति, सितारामीं जडे मति, निजात्म प्रतीति उमजुनियां । कृष्णदास निराकृति, आंगें राम आत्म ज्योति, परि देह स्थिति असहा ॥न०॥३॥
पद ४ थें -
नमस्ते राघवा या भवातूनि तार । नकळे कैसा करिती साधु विचार ॥धृ०॥
सच्चिदानंद स्वरूपीं मन हें धांवे आत्म हेतु ज्या । देह जगद्भ्रम वारुनि दे पदिं थार ॥न०॥१॥
ध्येय ध्याता ध्यान अशा या त्रिपुटी नेणें मी तुझा । सर्वहि एकचि आपण निश्चय सार ॥न०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझी ऐसी भावितो पुजा ॥ प्रार्थितसे कर जोडुनि वारंवार ॥न०॥३॥
पद ५ वें -
देवादि देवा नमोस्तुते स्वामि राघवा । तूंचि जननी जनक जगीं जानकि नायक ॥दे०॥धृ०॥
तारक भव समुद्र सनकादिक योगींद्र, जाणति तूं रामचंद्र अनेकिं एक ॥दे०॥१॥
चरणिं शरण वारिं जनम मरण, करिं हरण त्रिताप तुझा होइन सेवक ॥दे०॥२॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ हा जोडुनि हात, मागतसे देइं मज निजात्म विवेक ॥दे०॥३॥
पद ६ वें -
त्रिभुवनीं रामचि दयाळु खरा ॥धृ०॥
पुरा शोधुनि केला विचार देवा एक रघुविर ॥रा०॥१॥
निज भजक वरा दे पदी थारा । न दिसे दुसरा किति कोमल मनिंचा बरा ॥रा०॥२॥
त्यजुनि असारा करुनि विचारा । कोठुनि आपुलें मुळ विवरुनि दृढ धरा ॥रा०॥३॥
मी पण भारा जाळुनि सारा । विष्णु कृष्ण जगन्नाथ आत्म भक्तिभावें वरा ॥रा०॥४॥
पद ७ वें -
श्री रघुराज रामचंद्र गावा । विधि शिवहृत्कमलींचाप्राणविसावा ॥धृ०॥
आत्मविचारें जो जग सारें । चिन्मात्रवें भाव अखंड असावा ॥श्री०॥१॥
निजभक्तांचें करि हित साचें । यास्तव क्षणहि वियोग मनांत नसावा ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु । राघव सीता वल्लभ नयनीं डसावा ॥र०॥३॥
पद ८ वें -
दाशरथी भवपाश हरिल अवकाश न देतां मानसीं श्रीराम तो पहा ॥धृ०॥
शंकित न व्हा कीं ध्यात पिनाकी त्यास यदंकीं जानकि विराजे तो महा ॥दा०॥१॥
निस्त्रैगुण्य स्वरूपीं भ्रमंतज्ञानी रमति योगी आनंद थोर हा ॥दा०॥२॥
सद्वाक्यद्वारें परात्मैक्य विवरितां निजास्तिक्यत्व ज्ञानांगें निःशब्द तूं रहा ॥दा०॥३॥
वैष्णव गुरु पदाब्जीं कृष्ण भ्रमरा परि रमतां उष्ण त्रिविध न राहे अलभ्य लाभ वहा ॥दा०॥४॥
पद ९ वें -
नरमति विरमति विषय सुखाला गुण रामाचे न मुखाला ॥धृ०॥
जे अवकाश न देतां सेविति परमानंद रसाला । छंद असा गति मंदन ज्यांची प्रदीप्त ज्ञान मशाला ॥न०॥१॥
हे नव रीति तुमची कंची योग्य न होय अशाला । वर्म नेणता शर्म मिळाया करणें कार्य कशाला ॥न०॥२॥
परमात्मा श्री विष्णु सद्गुरू कृष्ण जगन्नाथाला । होइल कीं हें मान्य पहा जें चुकणें आत्मपथाला ॥न०॥३॥
पद १० वें -
देव तो हा दयाघन दशवदनारीरे । सद्रिपु कंदन श्री रघुनंदन सुरकृत वंदन ॥धृ०॥
रत्न जडित शिरीं मुगुट जयाच्या, वामांकि जानकी शोभे नारी रे । राघवाच्या वामां० ॥ जोभवभंजन मुनि मनरंजन नित्य निरंजन ॥दे०॥१॥
सुंदरश्याम मनोहर मूर्ति, विलोकितां भवभय हारी रे । राम तो हा विलो० ॥ अंबुज लोचन दुष्कृत मोचन विनता लोचन ॥दे०॥२॥
लक्ष्मण भरत शत्रुघ्न मारुत, भक्त विराजति सेवा कारी रे ॥राघवाचे भ०॥ वैष्णव साधन कृष्णाराधन राम अबादन ॥दे०॥३॥