स्वात्मतत्त्वामृतशतकम्
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
नमिन वैष्णवसद्गुरुपादुका । प्रिय बहू मज ज्या सुखदायका ॥
कथिन तन्महिमा परमादरें । जरि न ये वचनीं कथितां बरें ॥१॥
संसारतापशमनार्थ प्रयत्न केले । जे जे न ते सुख करूं मजला शकेले ।
मी माझें यांत बुडलों विषयांध झालों । दुःखें अनावर अशास्तव मी निघालों ॥२॥
माझें स्त्री पुत्र माझें गृह धन पशु हें द्रव्य हें देह माझें ॥
संसारीं सर्व माझें म्हणुनि फिरतसें चित्त ना शांत माझें ॥
या तापें तप्त झालों त्यजुनि सकळ हें दूर देशीं पळालों ॥
सोडीना कर्म माझें मज कठिण अशा पातकानें जळालों ॥३॥
संसारबंधन हरील असा न कोणी । भेटे, म्हणूनि स्मरिला दृढ चक्रपाणी ॥
जो निर्विकार परि जाणुनि भाव आला । श्री सद्गुरू वदति वैष्णव नाम ज्याला ॥४॥
ज्यांचें दर्शन तें कधीं न उरवी तापत्रयाची कथा ॥
वाड्माधुर्यरसामृतें परिहरी जन्मादिकांची व्यथा ॥
नाशी जीवदरिद्र आत्मसुखसाम्राज्यासनीं स्थापुनी ॥
ते आले गुरुराज वैष्णव जगीं जे राहिले व्यापुनी ॥५॥
भवसमुद्र भयानक यांत मी । बुडुनि जाचतसें बहु या तमीं ॥
मज अशांतुनि पार करा तुम्हीं । म्हणुनि सद्गुरुचे पद मी नमीं ॥६॥
गुरुवरें कर ठेवुनि मस्तकीं । वदति भ्रांति हरीन समस्त कीं ॥
न धरिं याविषयीं मनिं काळजी । कथिन जें तुज मी धरिं काळजीं ॥७॥
करिन जो उपदेश तुला मनीं । दृढ धरोनि बसे निज चिंतनीं ॥
मृगजलापरि या भवसागरीं । न बुडतांचि उगा भय कां धरी ॥८॥
नर तटस्थ जरी उदकामधी । निरखि तो प्रतिबिंब बुडे कधीं ॥
न बुडतां बुडलों ह्मणतो जसा । न भवसागरसंग तुला तसा ॥९॥
तटीं आहें जो मी न कधीं उदकामजि शिरलों ॥
न ठावें त्या वाटे हरहर बुडालों न उरलों ॥
विचारें तूं पाहें जरि धरि निज ज्ञान तरि तो ॥
बुडालों मी ऐशी किमपि न मनीं भ्रांति धरितो ॥१०॥
मी हा एक असे असें सहज तूं जाणोनियां नेणसी ॥
कल्पी देह तुझ्यांत त्यांत शिरसी तो देह मी मानिसी ॥
याचा संग धरोनि सौख्य विषयीं कल्पोनियां भोगिसी ॥
हें माझेंच खरें असो मज सदा आनंद हो चिंतिसी ॥११॥
आनंद आपण असें न कळे मनातें । घेऊनि विस्मृति धरी विषयांसि नातें ॥
कीं होय सौख्य तुज तें विषयांत आहे । वाटे, उगा भ्रम तुझा तुज बाधताहे ॥१२॥
विषय कल्पुनि जें सुख भोगिसी । स्वरुप तेंचि तुझें परि नेणसी ॥
ह्मणुनि दुःख अनावर वाटलें । तुजवरीच तुझें तम दाटलें ॥१३॥
तूं निर्विकार अनिवार सुखस्वरूप । झालें अहंपण तुझ्यांत विकाररूप ॥
विस्तार सर्व घडला मग हा तयाचा । देहादि सर्व जडभार पुढें जयाचा ॥१४॥
अज्ञान हें तुजवई उपजोनि तूतें । झांकोनियां मिरवती वरि पंच भूतें ॥
दृष्टांत यासि कथितों तुज शिष्यराया । ऐकोनि जो दृढ धरीं हरि सर्व माया ॥१५॥
सुर्यावरी किरण त्यावरि अभ्र झालें । तैं सूर्यतेज मुळिंचें न दिसोनि आलें ॥
संपूर्ण अभ्रमय जें नयनासि भासे । तें भासणें समज कीं रविज्या प्रकाशें ॥१६॥
अभ्रांत दृष्टि पसरे तंव सूर्य नाहीं । ऐसें दिसे परि वसे रवि तेथ पाहीं ॥
जें अभ्र तें उपजलें किरणांत ज्याच्या । तो शुद्ध सूर्य कधिं संग तया न याचा ॥१७॥
तूं निर्विकल्प रवि शुद्ध तुझ्या स्वरूपीं । स्फूर्ती अहं किरण ज्ञान उठे अरूपीं ॥
ज्ञानप्रभेवरि उठे बहु नाम रूपें । अभ्रें रवीसि तुज झांकिति शुक्तिरूपें ॥१८॥
जें कां अहंपण तुझें उठलें तुझ्यांत । तेणेंचि सर्व रचिलें विषयादि जात ॥
तूं कल्पनारहित कल्पित मीपणातें । सांडूनि लक्षित रहा निज आपणातें ॥१९॥
तूं एकला तुजवरी घडलें अनेक । जें वस्तुता न दिसतें करितां विवेक ॥
झाला उगाचि भ्रम जेविं भुजंग दोरीं । मिथ्या परी उठति भ्रांति नसे विचारीं ॥२०॥
रज्जूसि जैं विसरला भुजगासि भ्याला । बोले भयें करुनि कोठिल सर्प आला ॥
तेथें विचार न करूनि प्रयत्न केले । नाशार्थ, ते न फळ देउनि व्यर्थ गेले ॥२१॥
तैसाचि तूं विसरला तुझिया मुळाला । जो एकला परि न जाणुनि या खुळाला ॥
हे सर्व खेळ अवघे तुझिया मनाचे । कल्पूनियां विषय सौख्य तुझ्यांत नाचे ॥२२॥
जो तूं असंगपण टाकुनि संग घेसी । वृत्ती अनावर ह्मणे उबगे तयांसी ॥
तूं पाहसी तुज पुढें उठतात वृत्ती । सांडूनि एकपण शोधिं तुझे निवृत्ती ॥२३॥
उठे वृत्ती बैसे परि न उठणें तूज बसणें ॥
वसे साक्षित्वानें परि न कधिं त्या आंत घुसणें ॥
अशा धैर्यें मेरूसम अढल तूं बा तुजमधीं ॥
असंगत्वें प्राप्ती तुझि तुजचि याला न अवधी ॥२४॥
देहेंद्रियें विषय प्राण मनादि यांतें । जो एकला स्फुरणरूप धरी तया तें ॥
आहे अखंड सुख जें तुजमाजिं पाहें । ग्रासूनि द्वैत निज आपण मात्र राहें ॥२५॥
अज्ञानें तुजमाजि वृत्ति उठती त्यां देखसी एकला ॥
तूं चैतन्य परंतु सूक्ष्म मुळिंचा जो मार्ग तो चूकला ॥
त्याला तो व्यतिरेक अन्वय असा अभ्यास जैं साधिजे ॥
ब्रह्मानंदनिमग्नरूप मुळिंची जे खूण ते लाधिजे ॥२६॥
तो अभ्यास कसा म्हणोनि पुससी बा शिष्यवर्या जरी ॥
जाणावा व्यतिरेक शुद्ध तुज तो सांगूं धरूं अंतरीं ॥
जें जें दृश्य दिसे तयाहुनि असें मी वेगळा पाहणें ॥
द्रष्टा दर्शन दृश्य या त्रिपुटिला सोडोनियां राहणें ॥२७॥
दृष्टांतें कथितों तुला त्रिपुडि हे नाहींच देखावया ॥
कीं सूर्यप्रतिबिंब जें जलघटीं तें स्पर्शतें कीं तया ॥
नेणें दृष्टि घटांत हें जल तयामध्यें रवी भासतो ॥
न स्पर्शेच कधीं रवी गगनिंचा जो या त्रिवर्गासि तो ॥२८॥
जल घट प्रतिभानू शुद्ध सूर्यांत नाहीं ॥
त्रिपुटि नयनिं भासे ज्या प्रकाशेंचि पाहीं ॥
रविसि न वळखे जे ते घटीं सूर्य पाहे ॥
नसुनि दिसत नेत्रीं कां अधो दृष्टि आहे ॥२९॥
ज्या दृष्टीस दिसे घटीं जल तयामध्येंच भानू असे ॥
त्या दृष्टीस घटोदकस्थ रविचा संबंध कांहीं नसे ॥
दृष्टीला दिसणें रवी गगनिचा जो शुद्ध त्याच्या गुणें ॥
तो दृष्टीस कधीं न संग करितो आहे निजांगेंपणें ॥३०॥
दृष्टी ज्ञान तुला रवेरेसि विसरे अज्ञानकुंभामधीं ॥
पाहे वृत्तिजळीं तुझ्या प्रतिमुखा जें वस्तु नव्हे कधीं ॥
देखे विस्मृतिकुंभ वृत्तिउदकीं तूं बिंबला मानुनी ॥
त्या ज्ञानासहि तूं प्रकाशक पहा एकात्मता शोधुनी ॥३१॥
न दृश्य तूं साक्षि असे तयाचा । मागें पुढें भास दिसे मनाचा ॥
सर्वांसि या आपण मूळ साचा । अलक्ष सच्चित्सुख लक्षणांचा ॥३२॥
दिसे तें तूं पाहें परि वळख द्रष्ट्यासि वळुनी ॥
असे जो सत्यत्वें सुखमय सदा वृत्ति त्यजुनी ॥
दिसे भासे सारें तुजवरिच हें तूं न दिससी ॥
तुला तूं लक्षाया सहज समजानेंच अससी ॥३३॥
देहादी दृश्य सारें जग मृगजल या कल्पका मीपणातें ॥
सोडीं जाणोनि साक्षी निरखि रविसी सच्चित्सुखा आपणातें ॥
मी माझें हें न कल्पीं स्वसुखमय तुझें रूप चिन्मात्र साधीं ॥
स्वानंदीं मग्न होसी अनुभवुनि निजात्मैक्यतेची समाधी ॥३४॥
तूं लक्षिसी दृश्य जगत्पसारा । सुखात्मबोधा विसरूनि सारा ॥
अलक्ष्य तो आपण या विचारा । करीं, न लक्षीं तनु पुत्र दारा ॥३५॥
विसर न तुज तूं जो सच्चिदानंदरूप । जरि तुजवरि भासे इंद्रियां विश्वरूप ॥
समज सकल द्रष्टा दृश्य आत्माचि सारा । उलटुनि अवलोकीं आपणा निर्विकारा ॥३६॥
उलट उलट शिष्या देखणें दृश्य सोडीं ॥
वळखुनि निज द्रष्टा ग्थे तदात्मैक्य गोडी ॥
उठति विषयवृत्ती कल्पुनी सौख्यराशी ॥
त्यज, भज निज आत्मानंद जोडीं मिराशी ॥३७॥
तुला वाटे मातें विषय सुखदाते खचितसे ॥
ह्मणूनी तद्भोगीं मन दिवस रात्र भ्रमतसे ॥
तरी त्यांच्या भोगें वय सरुनि तृप्तीच न घडे ॥
सुखाच्या इच्छेनें घडि घडि तुझें चित्त बिघडे ॥३८॥
ज्यांचा आठव दुःखदायक मना जैं भोग ते ना मिळे ॥
लाभे तैं मज आणि आणिक मिळो वाटेच इच्छामुळें ॥
नाहीं तृप्ति कधीं जरी हि विटला सेवूनि इच्छी पुन्हा ॥
व्हाया सौख्य अखंड संग्रह करी दुःखीं पडे वासना ॥३९॥
आहे कोण पदार्थ नित्य सुखत्रीं ऐसा जगीं दाखवीं ॥
ज्याचा वीट न ये सदैव असुनी दुःखें न जो माखवी ॥
यल्लाभाहुनि अन्य लाभ न दिसे शश्वद्गुणें चांगला ॥
तो दावीं मज जीव ज्यावरि तुझा मोहूनियां पांगला ॥४०॥
सुख दिसेल जरी धन तें तुला । तरि पहा धनिकांसि जनीं मुला ॥
तळमळूनि दुज्यां विषयांप्रती । सुख ह्मणूनि अहर्निशिं धांवती ॥४१॥
द्रव्य स्त्री पुत्र नव्हे सुख विवरिं मदुक्तीस या शिष्यराया ॥
यांपासूनीच होतें सुख ह्मणुनि सदा टेंकसी तूं मराया ॥
यांसंगें त्रास होतां त्यजुनि सकळ जाऊनि बैसेन रानीं ॥
ऐसे खेदिष्ट त्यांनीं सुख कवण धरावें विचारें नरांनीं ॥४२॥
पहातां संसारीं सुखमय अशी वस्तु न ठरे ॥
ठरावी जे वस्तु सुख ह्मणुनि ते दुःख पसरे ॥
सुखाचा दुःखाचा अनुभव जया त्यासि निवडूं ॥
विचारें सत्याच्या जडतनुजगद्भान दवडूं ॥४३॥
सुखें दुःखें कल्पीं प्रति विषयिं देहादि जगिं तूं ॥
जडत्वानें ते तौं असति सुखदुःखाविरहित् ॥
न आद्यंतीं जे हे विषयी भ्रम हा जाण तुजला ॥
सुखाच्या इच्छेनें सुखमय तुला तूं विसरला ॥४४॥
सुखाची जे इच्छा त्यजुनि बळ मागें परतुनी ॥
स्थिरत्वानें राही सुखमय निजात्मा समजुनी ॥
उठों नेदी वृत्ती महज सुख येईल उदया ॥
तदाकारें घोटीं स्फुरत सुख जें आपण तया ॥४५॥
आहे सौख्य अखंड तूंचि समजे नाहीं दिसे जें दुजें ॥
देहादी जड विश्व मीपण पहा विस्तारलें हें तुझें ॥
तूं या आदि न कोणि अंतिं दुसरा सच्चित्सुखात्म्याविण ॥
लक्षीं आपण जो अलक्ष्य मुळिंचा ग्रासूनियां मीपण ॥४६॥
मी हा शब्द उठे जिथें स्वरूप तें सच्चित्सुखात्मा तुझें ॥
देहादी जड विश्व ज्यामधिं स्फुरे तो तूं स्वयें ना दुजें ॥
आहे आपण मीपणारहित हे लक्षी मुळींची खुणा ॥
दृश्यादृश्य गिळोनि तन्मयपणें हो तूं तुझा देखणा ॥४७॥
निद्रेमाजिं जसा निवृत्ति अससी जागेपणीं हो तसा ॥
आनंदांत मुरोनि विस्मृति न घे रक्षी सुखात्मा ठसा ॥
जें जें पाहसि तें सुखात्मक असे येईल लक्षीं तुला ॥
तूं आनंदसमुद्र विश्व लहरी जाणोनि घोटीं मुला ॥४८॥
आहे कोण सदैव हेंचि विवरीं कीं दृश्य त्या देखणा ॥
नाहीं त्या अवलोकिं कोण धरि त्या आहेपणाची खुणा ॥
निद्रा जागृति स्वप्न यासि वळखे नाशे न त्यांच्या सम ॥
आहे आपण पूर्ण व्यापकपणें लक्षूनि टाकीं भ्रम ॥४९॥
भासे आपण आपणासि न दुजें हें दृश्य ज्याच्याविण ॥
बाह्याभ्यंतरिं जो नगीं कनकसा आहे पहा हे खुण ॥
चित्तंतूवरि दृश्य विश्व पट हा भासे न तंतूविण ॥
ऐसा आपण आपणासि निरखी सांडूनि मी - तूंपण ॥५०॥
आहे आपण आपणा समजणें जें तेंचि सच्चित्पण ॥
वाटे स्वस्थ उपाधि नाहिं जइं तो आनंद वृत्तीगुण ॥
ऐशा तीन खुणा तुझ्या कळविल्या लक्षांत याया तुला ॥
जाणोनी निरुपाधियोग मुळिंचा साधूनि घे आपुला ॥५१॥
वृत्ती त्या उठती सुखांत बसती ज्यां ठाउके ना सुख ॥
सारा इंद्रियवृत्तिनाच विषयीं बाहेरि ज्यांचें मुख ॥
अंतर्दृष्टि करूनि त्यां वळवितां होती सुखाकार त्या ॥
नित्याभ्यास करीं सुखास्पदचि तूं हो त्या न ठेवीं रित्या ॥५२॥
तूं आनंद समुद्र पूर्ण लहरी विश्वात्मका या तुझ्या ॥
आहे व्यापक तूं अखंड निरखीं नाहीं कदा हेतु ज्या ॥
होतो जो व्यवहार तो तुजविणें नाहीं पहा आपणा ॥
जो आहे सहजें सुख स्वरुप हे लक्षीत राहें खुणा ॥५३॥
तूं हें सर्व तुझ्यामधीं सकल हें ऐसा तुला तूं दिसे ॥
वाटे मीच शरीर हें तुज असे तें कल्पनेचें पिसें ॥
नाहीं हें जड दृश्य विश्व निरखीं सच्चित्सुख व्यापला ॥
आदी अंत न जेथ जेथ वळुनि घे शोध तूं आपला ॥५४॥
ज्ञानादर्शचि तूं तुझ्यामधिं पहा त्रैलोक्य हें बिंबतें ॥
वस्तुत्वें न अशांत तूं तुजविणें कांहींच नाहीं रितें ॥
ज्याचें मोज न आणि शेवट नसे तो तूंचि चित् आरसा ॥
आहे एकचि सत्य वस्तु किती मी बोधूं तुला फारसा ॥५५॥
आनंद चिद्घन अनंत अपार तो तूं । आहेसि व्यापुनि जगीं पटिं जेविं तंतू ॥
हा विश्व मेघ वळखें मृगतोय सारा । चित्सूर्य तूंचि तुज जो दिसतो पसारा ॥५६॥
जें जें दिसे तुजविणें न तयासि थारा । तूं आपणा वळख चित्सुख निर्विकारा ॥
जैं साधिसी गुरुकृपांजन युक्त दृष्टी । आनंदरूपचि कळेल समस्त सृष्टी ॥५७॥
आहे नाहीं हे मनाचे विकार । त्या पूर्वीं तूं सर्वदा निर्विकार ॥
भासे नासे जाण ते सर्व माया । सांडी साधीं निश्चला आत्मठाया ॥५८॥
आहे आपण हा प्रपंच सगळा कापूस तंतू जसा ॥
तंतू तो पट जेविं तेविं धरिं तूं विश्वात्मतेचा ठसा ॥
नाहीं कीं पट एक तंतुचि खरा जो तो नसे कापुसीं ॥
आहे कापुस तेविं चित्सुखाचि तूं लक्षीत राहे तुसीं ॥५९॥
मेघाचें जळ जेविं सूर्यकिरणापासूनियां उद्भवे ॥
वर्षे वर्षऋतूंत ज्या स्थळिं जळें वाटे रवी संभवे ॥
ग्रीष्मीं आटति जैं जळें प्रतिरवी नाहींच सूर्य स्वयें ॥
आहे, आपण सर्व वृत्ति मुरतां नाशे न जो निश्चयें ॥६०॥
दिसे जें दिसा विश्व सूर्यप्रकाशें । तसें रात्रिचें लागतां दीप खासे ॥
अशा सूर्य - दीपासि हे चक्षु पाहे ॥ तुझी बुद्धि सर्वांसि या जाणताहे ॥६१॥
ते बुद्धी तुज नेणतां तुजपुढें कल्पूनि नाना जडें ॥
जे सच्चित्सुख आपणा विसरुनी आनंद व्हाया रडे ॥
ती मागें न वळे ह्मणूनि नकळे आनंद तो आपण ॥
या दृश्यासि भुलूनि नाचत सदा कल्पूनि मी तूं पण ॥६२॥
देहादि हें जग दिसे निज चित्प्रकाशें ॥
भासे प्रकाशमय तूंचि कदां न नाशे ॥
वृत्ती प्रकाशति प्रकाश तुझाचि सारा ॥
तूं ज्योति ब्रह्म परिपूर्ण सुखैक थारा ॥६३॥
तूं लक्षीं निज चित्प्रकाशचि खरा वृत्तीप्रकाशाविण ॥
पूर्ण ज्योति न दृश्य जो स्थिरचरीं आंगें असे आपण ॥
दृश्य ज्योति न सत्य तूं भुलुं नको आहेसि द्रष्टा स्वयें ॥
ज्योती आपण आपणांत वळतां आनंदसी निश्चयें ॥६४॥
प्रकाशक मुळीं खरा सकळ ज्योतिंला देखणा ॥
अनंत सुखरूप तूं अढळ आपुली हे खुणा ॥
धरूनि वळ अन्तरीं त्यजुनि कल्पना हेतुला ॥
अखंड स्मर आपणा भ्रम नुरेल पाहें मुला ॥६५॥
भला दिससि तूं मला स्वअधिकार पाहोनियां ॥
न लाभ तुज याहुनी समज सत्य जाणोनियां ॥
जलावरि तरंगसे निरखिं विश्व आत्म्यावई ॥
सुखास्पद अखंड जे पदवि आपुली हे वरी ॥६६॥
त्याचें मानवजन्मसार्थक जया सत्संगती आवडे ॥
आत्माभ्यास घडे सुखांत पहुडे देहात्मता ती उडे ॥
सात्वित्सौख्य घडे मती न बिघडे आनंदवृत्ती चढे ॥
भाग्य श्री उघडे अखंडितपणें स्वात्मैक्य बोधी जडे ॥६७॥
जरि नरतुन भाग्यें प्राप्त झाली जिवाला ॥
निजसुखपदवी हे सांपडे कीं तयाला ॥
सुख मय परमात्मा जाणुनी सर्व सृष्टी ॥
मुरुनि सुखसमुद्रीं चित्त पावेल तुष्टी ॥६८॥
किति सुलभ असे हा मार्ग सच्छिष्य राया ॥
मृगजलवत हा संसारसिंधू तराया ॥
त्यजुनि सकळ वृत्ती लक्षितां आपणातें ॥
सहज सुखसमुद्रीं मग्नता ये मनातें ॥६९॥
संसारीं असतें जरी सुख पहा राजे निघाले कसे ॥
राज्यें त्यागुनि बैसले वनिं तपश्चर्येसि ऐकों असें ॥
ना ये वीट जयां जरी विषयिंच्या भोगें बहु त्रासती ॥
ऐसा मूर्खसमूह पाहुनि तयां साधू सदा हांसती ॥७०॥
मी ज्ञानीं मज सर्व ठाउक असे संसार माझा खरा ॥
स्त्रीपुत्रादिसमूहिं रंगुनि पडे लुब्धोनि गुंते घरा ॥
होती त्रास पदोपदी तरिहि ते लक्षांत नाणी कदा ॥
मी हा कोठिल कोण नेणुनि सदा भोगी बहु आपदा ॥७१॥
माझीं हीं पुत्र कन्यादिक जिवलगही स्त्री सुखा पार नाहीं ॥
ऐसा लुब्धोनि गुंते निशिदिनिं बहु गांजे न ये वीट कांहीं ॥
द्रव्याचा लोभ मोठा कवडि न कवणा दे पहा मोह ऐसा ॥
देहातें मीच मानी स्वसुख न कळतां मुक्त होईल कैसा ॥७२॥
मी मी शब्द वदे सदा तनुमदें नेणेच मी कोणता ॥
देखे सर्व जगा परी न वळखे मी कोण या पाहता ॥
ऐके शब्द सुगंध घे प्रियपणें सप्रेम चाखी रसा ॥
तो मी कोण विचार कांहिं न करी जो आपुल्या मानसा ॥७३॥
होतो जो व्यवहार इंद्रियगणीं वृत्ती उठोनी कसा ॥
तो तो जाणत, जाणत्या न वळखे जो बाह्य दृष्टी असा ॥
कष्टी होय पदार्थ जो प्रिय बहू भोगासि जैं ना मिळे ॥
नेणे कीं प्रिय वस्तु आपणचि, हें सत्संगतीनें कळे ॥७४॥
प्रपंच बहु आवडे जरि न दुःख त्या पासुनी ॥
घडेल, जिव ना तरी पळुनि जाय हा त्रासुनी ॥
सुखास्तव प्रपंच हा करुनि जीव हे शीणती ॥
सुखस्वरुप आपण प्रिय पदार्थ हे नेणती ॥७५॥
पदार्थ सुखसे तुला जरि दिसे सुषुप्तीं पहा ॥
अपार सुख निद्रिता न विषयीं जिवाची स्पृहा ॥
प्रपंच सुख हा जरी तरि निजेंत कैचें सुख ॥
न तैं विषयवृत्ति, जागृतिंत जें दिसे सन्मुख ॥७६॥
त्यजी विषयचिंतनीं मन सुखार्णवीं त्या निजे ॥
मुखें न वदवे निजानुभववृत्तिनें जाणिजे ॥
असे सुख अखंड आपणचि जें न ठावे जना ॥
ह्मणोनि विषयेच्छुंची विषयिं धांवती वासना ॥७७॥
जैं वासना वळविशी स्वसुखैकठाया । वाटेल त्यां कठिण तेथुनिया उठाया ॥
जें तें स्फुरेल सुख आपण विश्व सारें । दुःखें न राहतिल या निज सद्विचारें ॥७८॥
लाभांत लाभ परिपूर्ण निजात्मलाभ । नाशे न जो नुरवि लेशहि दुःखगाभ ॥
तो जाहला तुज, तुझा भ्रम सर्व गेला । सच्चित्सुखस्वरुप बोधरवी उदेला ॥७९॥
ब्रह्मानंदनिधीस तूज शरिराहंवृत्तिनें झांकला ॥
तो तूं दृश्य नव्हे अदृश्य निरखीं सच्चित्सुखें फांकला ॥
सर्वांपूर्विल जो अनंत परिपूर्णत्वें असे एकला ॥
त्या तूं जाण अनेक सर्व त्यजुनी या दृश्यरूपा कला ॥८०॥
जो सच्छिष्य असे तयासिच डसे सच्चित्सुखात्मैक्यता ॥
वाक्यें सद्गुरुच्या अखंड सुख तें होऊनि घोटीं स्वतां ॥
वाटे विश्व समस्त त्या जरि दिसे आनंद हें तत्वता ॥
ऐसा दुर्मिळ शिष्य सद्गुरुवचें जाणेल ब्रह्मात्मता ॥८१॥
नसे ज्या शिष्याला गुरुवचनिं विश्वास घसरे ॥
स्वरूपापासोनी उठति बहु वृत्ती नच सरे ॥
शरीरा मी मानी निज गुरुसि कल्पी मनुजसा ॥
तयातें लक्षावा मनुजसमुहीं हा पशु जसा ॥८२॥
ज्याला सद्गुरु पूर्ण ब्रह्मचि असें वाटे सुशिष्या तया ॥
विश्वासें गुरुवाक्य अर्थ उदया ये नाश नाहीं जया ॥
वाटे आपण जें दिसे सकल तें आनंद सच्चित्गुरू ॥
वर्षें जो सुखमेघ ये रिति न तो शिष्यासि ये सांवरूं ॥८३॥
आला प्रत्यय ज्यासि हा गुरुकृपें आनंद तो आपण ॥
मिथ्या देह जगद्भुजंग निज रज्ज्वात्मा वरी मीपण ॥
गेलें दुःख समग्र आपण सुखाचा जो समुद्र स्वयें ॥
झाला तो तरला भवाब्धि गुरु वाक्यार्थाचिया निश्चयें ॥८४॥
गुरू तो जो शिष्या परम सुखदाता निज मुला ॥
चिदात्मैक्यस्फूर्ति धरुनि तनु मूर्ती प्रगटला ॥
गुरूदेवांमध्यें तिळभरिहि तूं भेद न धरीं ॥
स्मरावें ते सच्चित्सुख जलधि मी विश्व लहरी ॥८५॥
गुरू देव यांमाजिं ना द्वैत कांहीं । तयांच्या स्वरूपासि लक्षोनि पाहीं ॥
स्वशिष्यासि दावी गुरू देव ठाया । सुखात्मा कळे देव हे भक्तराया ॥८६॥
घडे ज्या प्रियत्वें गुरूदेवभक्ती । प्रपंचीं असोनी जिते त्यांसि मुक्ती ॥
तयां विश्व हें सच्चिदानंद वाटे । जरा जन्म दारिद्र्य दुःखादि आटे ॥८७॥
तुला कळविलें जसें मज कळे सुशिश्या खरें ॥
निजानुभव घोंटि तूं वळुनि स्वस्वरूपीं बरें ॥
प्रपंच करि चांगला न ढळसी सुखाच्या बळें ॥
अखंड स्मर आपणा न मळसी मनाच्या मळें ॥८८॥
श्रवण मनन नित्याभ्यास सोडूं नको हा ॥
घडि घडि सुखकारी जो उरों नेदि मोहा ॥
स्मरुनि प्रियपणातें आपुलें सौख्य भोगीं ॥
न भवसि कधिं दुःखी आणि संसाररोगी ॥८९॥
आत्मानात्मविचार जो सुलभ शब्दांनीं तुला बोधिला ॥
तो लक्षीं धरिं आपणासि वरिं ज्या सद्वृत्तिनें शोधिला ॥
होतो हा व्यवहार सर्व सहजें साक्षी असे आपण ॥
त्या त्या कालिं उठोनि वृत्ति तरि तूं कल्पूं नको मीपण ॥९०॥
उठति सकळ वृत्ती साक्षि तूं कल्पनांचा ॥
सहज अससि देखें भास मिथ्या मनाचा ॥
सहजिं सहज भासे विश्वरूपें तुला तूं ॥
सहज सुख कळाया तूं नको कांहिं चितूं ॥९१॥
सहज अढळ तो तूं लक्षिं घे शिष्यराया ॥
सहज धरिं मृषा हीं इंद्रियें आणि काया ॥
व्यवहरति प्रपंचीं ज्या नसे कीं मृषा तो ॥
सहज अनुभवें या हा मृषा काळ होतो ॥९२॥
जागा होसी सहज सहजें स्वप्नसाक्षित्व ज्याला ॥
निद्रा ये ती सहज समजे तोचि तूं जाण त्याला ॥
येती जाती सहज निज कामार्थ जे लोक सारे ॥
त्यां द्रष्टा तूं सहज सहजें नासती जे पसारे ॥९३॥
दिसे भासे जें जें सहजपण सोडीं नच तया ॥
अशाचा तूं द्रष्टा सहज अससी नाश न जया ॥
सुशिष्या तूं ऐसें सहजपण जैं लक्षिसि बरें ॥
समाधीपूर्णत्वें सुख अनुभवा येइल खरें ॥९४॥
सहज सुखसमुद्रा तूंचि हें विश्व आहे ॥
सहज लहरिरूपें तो तुला तूंचि पाहे ॥
सहज सुख समाधी हा ढळेना कदापी ॥
अनुभवि पुरुषातें जो न घाली त्रितापीं ॥९५॥
बा हें भाग्य तुझें तुला कळविलें नाशे न कल्पांतिं तें ॥
आत्मत्वें परिपूर्ण तूं तुजविणें कांहींच नाहीं रितें ॥
पाहे आपण आपणा सहज तूं आहे सुखाचा निधी ॥
मी हा शब्द मुरोनि जो स्फुरसि तो आनंद पावे सुधी ॥९६॥
आहे तूं अधिकारि यास्तव तुला हें स्वात्मतत्वामृत ॥
झालें प्राप्त न सोडितां घडि घडी पीसी न होसी मृत ॥
सारा हा भवरोग जाउनि तुला आरोग्य सच्चित्सुख ॥
होवोनी अजरामरत्वपदवीं दे होइं अंतर्मुख ॥९७॥
गुह्यांत गुह्य गुरुगम्य मुखें तुला या ॥
जें बोधिलें सुखाचि आत्मपणें कळाया ॥
तें घोटिं तूं न करिं चावटि लोकजागीं ॥
कीं ज्यासि नाहिं अधिकार न ते विभागी ॥९८॥
नित्याभ्यास करीं मनांत विवरीं जें दृश्य तें अनृत ॥
अभ्यासाविण बा फळेल न तुला हें स्वात्मतत्वामृत ॥
माझें हेंचि खरें असें धरुं नको मी देह कल्पूं नको ॥
आहे जो सहजें सुखस्वरुप त्या देवासि सोडूं नको ॥९९॥
श्रीमद्वैष्णवसद्गुरू निजकृपें भेटोनि मातें स्वता ॥
श्रीलक्ष्मीपति विष्णु बोध कळवी सच्चित्सुखात्मैक्यता ॥
झाले शंभर श्लोक हे स्फुरुनि जे ते वर्णिले म्यां तुला ॥
तूं यांतें विवरूनि स्वात्मसुख घे सांडूनियां हेतुला ॥१००॥
विष्णू कृष्णजगन्नाथ स्मरणें सद्गुरुमुखें ॥
लाभेल जें स्वात्मतत्वामृत तें घोंटि तूं सुखें ॥१०१॥
इति श्रीमद्वैष्णवसद्गुरुकृपान्वित कृष्णजगन्नाथस्फुरणजनित स्वात्मतत्वामृत शतकम् संपूर्णम्.
॥ ॐ तत् - सत् श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP