मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
११ ते २०

अभंग - ११ ते २०

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


११
रामा तुज विण कोणा । माझि येईल करुणा ॥१॥
वत्सालागीं जैशी गाई । सर्वार्थीं तूं माझी आई ॥२॥
जरि तूं टांकिसी वनमाळी । तरि मज कोण रे संभाळी ॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । येरे वेळ न लावीं आतां ॥४॥

१२
ऐसें ऐकिलें म्या पाठीं । कळवळसी तूं भक्तांसाठीं ॥१॥
तरि मी आहे कीं दांभीक । लपुनि पाहसी कंवतुक ॥२॥
तुझें दयाळुत्व मोठें । परि मजकरितां झालें खोटें ॥३॥
ऐसें नकरीं दयाळा । येवुनि भेटें या मज बाळा ॥४॥
लोक पिटीतील टाळी । जाईल तुझी ब्रीदावळी ॥५॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । नको सोडूं मज अनाथा ॥६॥

१३
तुज पाहुनियां निज डोळां । सुख घोटिंत वेळों वेळां ॥१॥
मज लागली हे आशा । कां न पुरविशि जगदीशा ॥२॥
चराचरीं तूं उघडा । परि मज दिसेना दगडा ॥३॥
यासि आतां करूं मी काई । जळों वय हें फुकट जाई ॥४॥
रामा सारुनि सर्व अपाया । दाखविं आपुल्या दिव्य पाया ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा रे । तुजविण चित्त न माझें थोर ॥६॥

१४
ऐकुनि शब्द न येसी माझे । कां रे चित्त तुझें लाजे ॥१॥
आहे दुष्ट अवगुणी । जाउनि भेटावें त्या कोणी ॥२॥
ऐसें जरी तूज वाटे । तरि हा लाविन जीव वाटे ॥३॥
सत्य सांगतों राघवा । जरि तूं नयेसी येधवां ॥४॥
तरि मी न ठेवीं हा जीव । त्वरित दावीं पदराजीव ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । सोसवेना वियोग व्यथा ॥६॥

१५
ह्मणसी आहे तूं अतिपापी । चित्त माझें त्या संतापीं ॥१॥
सकल पातकांचें कोड । तुझें न पाहें मी तोंड ॥२॥
ऐसा जरि तूं रागावसी । जगीं अपकीर्ती पावसी ॥३॥
पतीत पावन तूज ह्मणती । या नामांची गति कोणते ॥४॥
मी पतीत तूं पावन । राम जानकी जीवन ॥५॥
रोगां नाशी औषध जैसें । पाप्या पावन नाम तैसें ॥६॥
पतीत पावना श्रीरामा । साच करीं आपुल्या नामा ॥७॥
हाचि माझ्या हृदयीं धीर । तारिसि मज तूं श्री रघुवीर ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । भेटुनि पुरवीं मनोरथा ॥९॥

१६
धरूं कोणाचा भरवंसा । तूंचि मज जानकीशा ॥१॥
बहुत येती आणि जाती । तूं मज जन्माचा सांगाती ॥२॥
मज आपुली आवडी । आठवतोसी घडी घडी ॥३॥
क्षणभंगूर हे काया । भेट देरे रामराया ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । गातो आत्म गूण गाथा ॥५॥

१७
कां रे न येसी अजूनी । दिवस आहे मी मोजूनी ॥१॥
गुप्त राहोनी एकांता । मौज पाहसि कीं सीताकांता ॥२॥
चोज वाटतें हें मज । तळमळविसी असुनी समज ॥३॥
तरि तूं ऐसें करिसी काय । भक्त वत्सल तूं रघुराय ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । हरी माझी अंतर्व्यथा ॥५॥

१८
म्हणसि ये ना मी तुजपासीं । नाहीं गणती तुझ्या पापांसी ॥१॥
दयाळें त्वा मायबापें । माझीं लक्षावीं काय पापें ॥२॥
अनंत कोटी अपराध माझे । न लक्षावे त्वां रघुराजें ॥३॥
माझ्या जिवींच्या जीवना । ये रे धांवुनि दयाघना ॥४॥
दावी आत्म भक्ती पथा । विष्णु क्रुष्ण जगन्नाथा ॥५॥

१९
करीं इतुका ऊपकार । नुरवीं देह अहंकार ॥१॥
सेवितां यां विषयां पांचां । पूर्ण हेतू न होय मनाचा ॥२॥
कळलें कळलें हें मज देवा । तूंचि पूर्ण सुखाचा ठेवा ॥३॥
ते मज पदवी उघडुनि दावीं । विषयासक्तां जे न ठावी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । गाइन निशिदिनिं आत्मगाथा ॥५॥

२०
कृपा केल्या त्वां रघुनाथें । लाथा हाणिल संसारातें ॥१॥
ऐसा हृदयीं मज आवांका । काय विषय सुखाचा लेखा ॥२॥
तरि हें आहे तुजपाशीं । भेट देणें गरीबासी ॥३॥
आतां न लावीं ऊशीरा । देरे दर्शन श्री रघुवीरा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । आवडती आपुल्या कथा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP