पद ६१ वें -
सकळ जन भाग्य उदय झाला, अयोध्ये रामचंद्र आला ॥धृ०॥
जन्मोजन्मिचें पुण्य कोटी । तयासची होय राम भेटी । वधुनि रावणादि दुष्टांला ॥अ०॥१॥
थाट सुग्रिवादि वानरांचे । नाचती सन्मुख रामाचे । अशा ह्या साधुं पर्वकाळा ॥अ०॥२॥
साधु सद्भक्त संत येती । कीर्तनीं गजर थाट करिती । प्रेमानंद समरतांला ॥अ०॥३॥
धन्य आजि दिवस सोनियाचा । पाहिला थाट कीर्तनाचा । नित्य जन घेति दर्शनाला ॥अ०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाची । आवडी हृदयिं पूर्ण साची । न सोडी प्रेमळ भक्तांला ॥अ०॥५॥
पद ६२ वें -
या मनाचा काम पुरविता राम जगाचा स्वामी । नाम गातां शाम सुंदर, प्रगटे अंतर्यामी ॥धृ०॥
वामजानुवरि जानकि शोभे, वामजानुवरि जानकि शोभे, वामलोचना साजे । काम मनोहर मूर्ति जगन्मय, धाम सुखाचें गाजे ॥या०॥१॥
भला जन्म लाभला गड्यानों, चला अयोध्ये जाऊं । न लाभ याहुनि मला वाटतो, कलाकुशल हरि गाऊं ॥या०॥२॥
थाट शोभतो कीर्तन गजरें, दाट समुह संतांचा । वाट फुटेना गांठुनि घ्याया, ब्रह्मानंदचि साचा ॥या०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सदां, प्रेमळ भक्तजनांचा । अखंड भजनीं तो दिनरजनीं, लंपट निज नामाचा ॥या०॥४॥
पद ६३ वें -
आला जानकिजीवन्, चला जाऊंया पाहुंया राम । दुष्ट दशवदनादि राक्षस वधून् ॥आ०॥धृ०॥
आतां काय भय चिंतो, पाय राघवाचे ध्यातां । नित्य नाम गातां सुटे प्रपंचा मधून् ॥आ०॥१॥
कीर्तनाच्या रंगणांत, आनंदें नाचति भक्त । टाळ तुंबुरे वाजति मृदंगें अजून् ॥आ०॥२॥
वानरांचें भार किति, परस्परें आलिंगिती । श्रीरामाचा प्रेम ज्याचे हृदयीं वेधून् ॥आ०॥३॥
किति जन पाहों येति, दर्शनानंद घोटिती । ऐसा हा अलभ्य लाभ घेऊंया साधून् ॥आ०॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ, अचला रामीं वसत । नित्य एकांत सेवित चित्त निरोधून् ॥आ०॥५॥
पद ६४ वें -
राम राजीवलोचन्, आजि जाऊंया पाहुंया । भक्त काम कल्पद्रुम करि जिवासी मोचन् ॥राम०॥धृ०॥
संत आनंदें नाचति, सिंहासनिं रघुपति । वामांकिं जानकि शोभे विनतालोचन् ॥रा०॥१॥
स्मरणिं रंगुनि मन, चरणिं मारुति लीन । येउनियां सुरगण करिति पूजन् ॥रा०॥२॥
ह्मणे जे शरण येति, त्यासि रक्षिन निश्चिती । एक पत्निव्रत ज्याचें एकचि वचन् ॥रा०॥३॥
सुग्रीवादि वानरांचे थाट, नाम गाती वाचे । धन्य धन्य अयोध्येचे, वाटति सुजन् ॥रा०॥४॥
वसिष्टादि ऋषिगण, करिति वेद पठण । वाद्यें वाजताति होय, राज्याभिषेचन् ॥रा०॥५॥
मानुनि सुख विषयिं, किति पडलों अपायीं । ऐसें हें सदैव कांहीं, होइल पचन् ॥रा०॥६॥
भक्तीचा सुखसोहळा, मुक्तिदायक सगळां । जरी करूं वळोंवेळां, आत्मविचेचन् ॥रा०॥७॥
सांडुनि आळस सारा, ध्यातां एका रघुविरा । न राहे मोह पसारा, होतो आकुंचन ॥रा०॥८॥
वसति अचला रामीं, वैष्णव सद्गुरु स्वामी । कृष्ण जगन्नाथ मुळींहुनी निष्किंचन् ॥रा०॥९॥
पद ६५ वें -
कोणी नाहीं कामाचे । रामाचे गुण गाईं वाचे ॥धृ०॥
घटकेन घटकेन हें वय जाय । फुटक्या तुटक्या गोष्टिंत काय । पडशिल तोंडिं यमाचे ॥माझ्या रामाचे०॥१॥
फटकळ चटकळ हा संसार । हटकुन झटका करुनि विचार । लटक्या पराक्रमाचे ॥माझ्या रामाचे०॥२॥
कलबल गलबल करूं नका । जिवाचें जीवन राम केवळ सखा । भलभलत्या नेमाचे ॥माझ्या रामाचे०॥३॥
सिटकुन किरकुन गुरुकुन वांय । घुरकुन बोलण्यांत् तिळ सुख नाहीं । जिवलग सर्व श्रमाचे ॥माझ्या रामाचे०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । सदैव नाचे भक्त जनांत । आवडिनें बापा प्रेमाचे ॥माझ्या रामाचे०॥५॥
पद ६६ वें -
भक्त जिव्हाळा भक्ति लाघव । राम जय सीताराम राघव ॥धृ०॥
प्रेम पुतळा जनकजाधव ॥राम०॥१॥
प्रकट होय भक्ति घडे ज्या नव ॥राम०॥२॥
तो हा ज्या स्मरत अपर्णा धव ॥राम०॥३॥
देवादि देव भेटला होउनि मानव ॥राम०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ श्री वैकुंठ रमा धव ॥राम०॥५॥
पद ६७ वें -
नृपति भला, रमवि मला । राजाराम, निजनाम संकीर्तनिं, लावुनियां, निशिदिनीं, ध्यानिंमनीं, एकचि आपण त्रिभुवनीं ॥धृ०॥
हृदयासि दया ये उदया । हरुनि भया, देव ऋषिजन, तारक रावणादि, शत्र निवटुनि, वेगें झडकरि, आत्मपुरिं, माजि शोभे, छत्रसिंहासनीं ॥नृ०॥१॥
आपदा हरि भक्तांचि सदा । लावुनि पदा, प्रिय आत्मसुखकारक, स्वामि जानकिनायक, चापपाणि प्रगटला, निरखिला सच्चिदानंद, आत्मनयनीं ॥नृ०॥२॥
करुणाघन गुरु विष्णु खरा । चरणिं बरा, बलभिम सेवक, कृष्ण जगन्नाथ हात, जोडोनियां गात मुखें, कीर्ति सुखें, आवडुनि अद्वय भजनीं ॥नृ०॥३॥