मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार

श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


“ यत्कुलदेव लक्ष्मीनृसिंह ” सुखदायी । पिता “ जगन्नाथ ” माता “ निरसाई ” । “ पितृव्यमुकुंद ” चुलती “ लक्ष्मीबाई ” । कृष्णद्विज मी जन्मा आलों अचला ठायीं ॥धृ०॥
शिणलों प्रपंचि फिरतां नकळुनि आयुष्यकाला । भिक्षुकिवृत्ति करितां आला मनिं कंटाळा । मत्पत्नी जनित स्मरतां माझीं पोरांबाळा । “ मी ” “ माझें ” मनि धरितां सांपडलों मोहजाला ॥य०॥१॥
त्रिविध तापाग्नीनें चित्त जईं पोळलें । दारापुत्रीं गृहवित्तावरि कंटाळलें । संतमुखें जइं तारक ईश्वर मज कळलें । तईं पासुनि मन माझें तद्भजनिंच वळलें ॥य०॥२॥
आळवितां रात्रं दिन किति वर्षें प्रभुला मी । सदयासि दया माझी येउनि अंतर्यामीं । साक्षात्सद्गुरु आपण प्रगटति विष्णुनामीं । दृष्य विलक्षण मज स्थिर केला आनंदधामीं ॥य०॥३॥
सद्गुरुनीं जी मजवरि केली करुणादृष्टी । सच्चित्सुख कनकनगासम समजाविलि सृष्टी । वदले बहु जन्मीं तूं होता बाळ कष्टी । आतां पूर्ण सुखी हो घेउनि आनंदवृष्टि ॥य०॥४॥
यच्छद्बें आनंद स्फुरला तो आपैसा । पिंडब्रह्मांडातें ग्रासी नेट ऐसा । अनुभव तो या वदनें बोलवेल कैसा । द्वैताद्वैतरहित; लहरीविण समुद्र जैसा ॥य०॥५॥
ऐश्या सद्गुरुसी म्यां द्यावें तरी काई । तनु मन धन हें अर्पण झालें पूर्वींच पायीं । देण्याजोगी वस्तु ज्याविण दुसरी नाहीं । आतां कोण्यायोगें होईल मी उतराई ? ॥य०॥६॥
विचार ऐसा जईं मज अंतःकरणीं आला । तैं सद्गुरुचा हृदयामाजी रफूर झाला । “ वर्णन करिं आनंदप्रद रागवचरिताला । सर्व सुखास्पद सेवा पावे तेचि आम्हाला ” ॥७॥
नाहं कर्ता, स्फूर्ती समर्थ गुरुरायाची । घडविलि सेवा वदवुनि सुकीर्ति राघवाची । श्रोता वक्ता अवघी सद्गुरुस्फूर्ती साची । कविताशक्ति न गुरु विण कृष्णजगन्नाथाची ॥८॥
जय जय रघुवीर समर्थ । श्रीबलभीम मारुतिराय समर्थ ।
श्रीमत्सच्चिदानंद वैष्णव कृष्ण जगन्नाथ स्वामि सद्गुरुमहाराज की जय ।

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP