पद १ लें -
श्री लक्ष्मी व्यंकटेश चरणीं शरण अशा भावें ॥धृ०॥
विषय वासना रहित वाटतें तुज गावें । श्रवण मननिं मन उन्मन होउनि स्वरुपीं लागावें ॥श्री०॥१॥
स्मरण अविद्या वरण हरि असें सतत मला व्हावें । बाह्याभ्यंतर भेदनिवारक निजदर्शन द्यावें ॥श्री०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथें प्रिय भजनीं वागावें । रात्र दिवस आत्म निकट बैसुनि अन्य न मागावें ॥श्री लक्ष्मी व्यंकटेश चरणीं शरण असा भावें॥३॥
पद २ रें -
पाहुं या लक्ष्मी व्यंकटेश शेषाचल वासि रे ॥धृ०॥
लक्षी निजभजकांसि ऐसा, रक्षी त्रिभुवन ॥ल०॥१॥
पूर्ण दयेचा सागर स्मरतां, यावें सत्वर आत्म भक्त हृदय विलासी रे ॥ल०॥२॥
जननि जनक तोचि संकटापासुनि मोची, भेटेल अखंड सुख राशी रे ॥ल०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा प्राणाहुनि प्रिय चित्ता, ठाव दिला नित्य पायापाशिं रे ॥लक्ष्मी व्यंकटेश शेषाचल वासिरे॥४॥
पद ३ रें -
पाहेन आत्मभावें लक्ष्मी व्यंकटेशा, प्रेमें राहीन सतत पदीं ठेवुनि मस्तक ॥धृ०॥
सदैव हृदंयीं ध्यास तुझा, प्रभु त्रास हरुनि विषयांचा, न उरविं पाप लेशा, भवांबुधि हा तारक तूंचि त्रिभुवनि एक ॥पा०॥१॥
शरण तुला निज चरण दावि मज, स्मरण सदोदित व्हाया दर्शनें, हृषिकेशा नवविध भक्ति सुखरस घोंटिन सन्मुख ॥पा०॥२॥
कमल नयन हृत्कमल मल रहित, विमल स्वरुपीं आवरीं करुनियां सदुपदेशा, विष्णु कृष्ण जगन्नाथा मज नावडे आणिक ॥पा०॥३॥
पद ४ थें -
व्यंकटेश कां रे अझुनि तुला श्री लक्ष्मे व्यंकटेश कां रे अ० लागला उशिर जिव भागला संसारिं ॥धृ०॥
होउनि आत्म विस्मृति, मानी देह मी हे मती, स्नेह विषयिं जडुनि पडे अविचारीं ॥व्यं०॥१॥
किति तरि धीर धरूं, स्थिति नये आवरूं, येरे झडकरिं नको लावूं वेळ भारीं ॥व्यं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा, जोडुनि उभय हात, सदनि वाट पहात दुरितें निवारीं ॥व्यं०॥३॥
पद ५ वें -
लक्ष्मी वेंकटेशा मजला कधिं भेट देसि रे ॥धृ०॥
आकाश नृपाच्या भक्ती, पद्मावती वरिली शक्ती रे । दर्शनें त्या दिधली मुक्ती, अंतीं निश्चयेंसि रे ॥ल०॥१॥
दृष्य शेषाचलावरी, सर्व साक्षी तूं श्रीहरी रे । असुनीयां कां अंतरीं उदया न येसि रे ॥ल०॥२॥
विष्णु गुरु ज्ञान मूर्ती, निजानंदें स्फुंरवी स्फूर्ती रे । कृष्ण जगन्नाथ आतीं, पुरवि हृषिकेशि रे ॥ल०॥३॥
पद ६ वें -
व्यंकटेश मजला लक्ष्मी व्यंकटेश मजला, व्यंकटेश निज देश दाउनि अघलेश नुरवि हृषिकेश, विनविं तुज ॥धृ०॥
दोष हरुनि निर्दोष हृदयिं संतोष अखंडित देइं कथुनि गुज ॥व्यं०॥१॥
आस रहित तव दास करुनि, नमनासि दावि प्रिय आत्म पदांबुज ॥व्यं०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ शरण, स्वस्मरण देउनि हरि मरण जनन ॥व्यं०॥३॥
पद ७ वें -
श्री लक्ष्मी वेंकटपति करुणादृष्टि करुनि मज पाहीं दयानिधी ॥धृ०॥
भजनिं लाउनि दिनरजनि सुखविं मन, कुजनत्व हरुनि तरविं भवांबुधि ॥श्री०॥१॥
विषय इंद्रिय स्मृति, त्यजुनि स्वरुपिं मति, धरुनि आत्म जागृति, राहुं सदा निरवधि ॥श्री०॥२॥
कमल नयन कधिं विमल करिसि प्रभु, विष्णु कृष्ण जगन्नाथा नावडे देह मी कुधी ॥श्री०॥३॥
पद ८ वें -
लक्ष्मी वेंकटेश गिरिराया रे, लक्ष्मी वेंकटेश गिरिराया रे । गिरिराया रे, गिरिराया रे ॥धृ०॥
वेंकट पति भव संकट हर निज, निश्चल स्वरुपिं रमाया रे । तळमळविसि किति भक्त वत्सला, बहु मळविति तव माया रे, तव माया रे, तव माया रे ॥ल०॥१॥
चळवळुनि विषनि विषयिं डळमळतें मन पळभरि न सुख जिवा या रे । कळवळ ना कसि अजुनि तुला मज, दाखविं निज प्रिय पाया रे, निज पाया रे, निज पाया रे ॥ल०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ पहा क्षणभंगुर हे काया रे । नवविध भजनावांचुनि माझें जाउं न दे वय वाया रे, वय वाया रे, वय वाया रे ॥ल०॥३॥
पद ९ वें -
त्वरित ये रे लक्ष्मि वेंकट रमणा त्वरित भव संकट हरुनि मज रक्षी ऐसा नाहीं दुजा ॥धृ०॥
कां रे नयेसि अजुनि असुनि जनि विजनि ध्यास दिवस रजनिं लागला हृदयिं तुझा ॥त्व०॥१॥
सर्व साक्षी तूंची एक नटला जग अनेक ठेउनि पदिं मस्तक करिन चरण पूजा ॥त्व०॥२॥
तूंचि भक्तांचा कैं पक्षी आत्मकृपा दृष्टी लक्षीं विष्णु कृष्ण जगन्नाथा दाविं स्वपदांबुजा ॥त्व०॥३॥
पद १० वें -
लक्ष्मी वेंकटपति मजला भेटुनि भवनिधि तरवीं रे ॥धृ०॥
भक्ति नवविध श्रवणादि घडवीं मत्तनुकरवीं रे । संत साधु सत्पुरुषांच्या शब्दार्थीं मति शिरवीं रे । ज्ञातृत्वा हंकृति सदया ब्रह्मात्मपदीं जिरवीं रे ॥ल०॥१॥
तूं सेव्य सेवकासि मला, विषयेंद्रिय भ्रम नुरवीं रे । देहात्मभाव हरुनि सदा निज सच्चित्सुख स्फुरवीं रे । प्रिय अद्वय निर्गुण स्वरुपीं कल्पना सकल मुरवीं रे ॥ल०॥२॥
बाह्याभ्यंतर देहरहित स्वानुभवें मज फिरवीं रे । सत्क्षेत्रीं सव्संगतिनें सत्कर्मीं मन स्थिरवीं रे । विष्णु कृष्ण जगन्नाथा शरण मनोरथ पुरवीं रे ॥ल०॥३॥
पद ११ वें -
निकट असुनि हरि फुकट श्रमलों भारीं लक्ष्मी वेंकट गिरि राया रे ॥धृ०॥
सच्चित्सुखरूपें तूं नटला त्रिभुवन हें निर्माया रे । कथितां सज्जनिं गुज हृदयिं गांठिला तुज सहजिं सहज भेट व्हाया रे ॥नि०॥१॥
रात्रदिवस क्षणमात्र न सोडित जोडित चित्त पदा या रे । मोडिन देह मी खोडी मनाला गोडी तुझीच कळाया रे ॥२॥
विष्णूकृष्णजगन्नाथ जिवन तूं परिहरिं सर्व अपाया रे । काया हे क्षणभंगुर जरि तरि तुजविण जाउं न वाया रे ॥नि०॥३॥
पद १२ वें -
नमो नमस्ते श्री लक्ष्मी वेंकट गिरिया स्वामी ॥धृ०॥
श्री भूदेवी शोभति ललना, उभया दक्षिण नामीं । सदया पाहुनि, हृदयामध्यें, न विसंबें तुजला मी ॥न०॥१॥
त्यागुनि श्री वैकुंठ पातला, प्रिय भक्तांच्या धामीं । अखंड आत्मत्वाची दे मज जागृति अंतर्यामीं ॥न०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ तुझा, दास करुनि निष्कामीं । ज्ञानभक्ति वैराग्य विवर्धुनि, आवडि दे निज नामीं ॥न०॥३॥
पद १३ वें -
नमन लक्ष्मी वेंकट रमणा, निकट भक्तिला प्रकट तुं होसी भव संकट हरणा ॥न०॥धृ०॥
धन्य धन्य नर जन्म त्वां दिला, प्रिय नाम स्मरणा । सदय न तुज सम भक्त वरद कळला अंतःकरणा ॥न०॥१॥
नवविध भक्ति घडवि अखंडित, करविं सदा चरणा । हेचि विनंति विष्णू कृष्ण जगन्नाथोद्धरणा ॥न०॥२॥
पद १४ वें -
भवसंकट हरणा वेंकट रमणा, ये रे परब्रह्म परिपूर्ण सदोदित अखंड दर्शन दे रे ॥धृ०॥
विषयांचा भ्रम, केवळ हा श्रम, देह भावना निरसुनि माझी वृत्ती स्वरुपीं ने रे ॥भ०॥१॥
अपराध कोटी घालुनियां पोटीं, देउनियां निज भेटी चुकवि जन्म मृत्यु फेरे ॥भ०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा, मज कृपा कटाक्षें कळउनि वेगें निजात्म पदरीं घे रे ॥भ०॥३॥
पद १५ वें -
तुज शरण आलों मज तारिं तारिं जय जय श्री लक्ष्मी वेंकटेशा, श्री लक्ष्मी वेंकटेशा ॥धृ०॥
हरुनि अहंता भेटसि संतां, तूंचि आवडसि भारिं भारिं ॥तु०॥१॥
श्री भू नामा शोभति रामा, उभय भागिं पुतनारि नारि ॥तु०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रभु, त्रिविध ताप हे वारिं वारिं ॥तु०॥३॥