मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री गणपतीचीं पदें

श्री गणपतीचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
येरे नमितों मी भावें त्ज गजवदना । देरे दर्शन मज निजसुख सदना ॥धृ०॥
देह इंद्रिय प्राण मनादि पंचकांसी । तूंचि प्रकाशक एकरदना ॥येरे०॥१॥
सनातन ब्रह्मानंद, ध्याती योगीजन वृंद । तोचि तूं सिंधुर गण धूम निधना ॥येरे०॥२॥
देहात्मभावना विघ्न हरुनि स्वरुपिं मग्न । करीं देवा कृष्ण जगन्नाथ नंदना ॥येरे०॥३॥

पद २ रें -
गजवदना नमन तुला । मज आत्मभजनी प्रेमा देइं निरंतर ॥ग०॥धृ०॥
चतुर्मुखादि सुर मुनिवर निज महिमा नित्य गाति रे । प्रगट झाला भक्तांच्या संकटीं जाणुनियां शुद्ध हेतुला । माथां मुगुट कुंडळें कानिं शोभति सुंदर ॥ग०॥१॥
गण सिंधुर कमलादिक दैत्य वधुनी दुष्ट जाति रे । प्रबळ विघ्नासुर शमविला बाळपणीं धरुनीं आखुला । वरि आरुढ होउनि केला मूषक उद्धार ॥ग०॥२॥
समर्थ तूं निज नाममंत्र जपकांचा पक्षपाति रे । नवल मोठें केलें त्रिभुवनीं निवटुनियां धूम केतुला ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ तूंचि निर्विकार ॥ग०॥३॥

पद ३ रें -
निजानंदकर गजानना मज भजावया तुज दावी पदपंकज अंतर साक्षी अंतरिंचें गुज जाणसी तूं देवा ॥धृ०॥
प्रिय भक्तांचा तूं कैवारी, आलें संकट विघ्न निवारी ह्मणुनि विघ्ननाशन संसारीं, वदति सकळ देवा ॥नि०॥१॥
सकल सुरां तूं वंद्य गणपती मनुष्यमात्रां आवडसी अति, पाहुनि भक्ती भक्तजनाप्रति पाळिसि तूं देवा ॥अहर्निशि॥नि०॥२॥
भक्तांसाठीं धांवुनि येसीं, नाना अवतारांतें घेसीं, बहु कळवळिनें दर्शन देसी, विघ्न हरुनि देवा ॥सदोदित॥नि०॥३॥
शंकर गिरिजेसह कैलासी, असतां छळिलें जेणें त्यांसी, वरोन्मत त्या सिंधूरासी, वधिला त्वां देवा ॥ प्रतापें वधिला त्वां देवा ॥नि०॥४॥
गण कमलासुर धूम प्रतापी, अगणित वधिले दुर्जन पापी, गणित न शरणागत अद्यापी, स्तविति तुला देवा ॥निरंतर॥नि०॥५॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ तुझी, कल्पुनि मूर्ती हृदयांत पुजी, सच्चित्सुखमय स्फूर्ती न दुजी, आवडि मज देवा ॥न दुजी आ०॥नि०॥६॥

पद ४ थें -
मोरया थोर तुझेविण कोणि दिसेना या जनीं ॥धृ०॥
चोर काम क्रोधादिक रिपुंचा जोर मोडिं बाधक तव पुजनीं ॥मो०॥१॥
भोरपिसा कोरडा न करिं मज गौरि नंदना ठेउनि कुजनीं ॥मो०॥२॥
मूषक वाहन समोर तुझ्या मी आवडिनें गातों दिनरजनीं ॥मो०॥३॥
घोर प्रपंचातुनिं या मजला तारिं तारिं लाउनि निज भजनीं ॥मो०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरण करि, आत्मकिशार सदा जनिं विजनीं ॥मो०॥५॥

पद ५ वें -
पाहुनि प्रभु तुजला गणपते आनंद मज झाला ॥धृ०॥
धन्य धन्य आजि दिवस आमुचा उदयाप्रति आला । नयना या, सुखव्हाया, भय जाया, सर्वांला ॥पा०॥१॥
सिंधुरादि दैत्यांसि वधुनि त्वां हरिलें विघ्नांया । त्रिजगा या, तुजगाया, निज गाया, दाविसि लीला ॥पा०॥२॥
प्रिय गजवदना चित्सुखसदना आलासि दीन दयाळा । या ठाया, चित्त रमाया, श्रीगणराया, त्रिभुवनपाला ॥पा०॥३॥
मूषक वाहना हे मनमोहना स्वसुखें जिवधाला । विष्णू कृष्ण जगन्नाथ करी प्रणिपात स्वपदाला ॥पा०॥४॥

पद ६ वें -
मज पद निज गदवदना दाखविं मज पद० जें कां सदन सुखाचें होय जीवन जीवाचें ॥धृ०॥
नावडे देह मी विषयिं पावलों शिण विस्मृति विघ्नहरण करिं मुळ साचें ॥मज०॥१॥
करुणासागर तुजविण धरवेना धीर भवाब्धि संकट हर आत्म भजकांचें ॥मज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ नित्य आपणास ध्यात लाधुनियां श्रवणांत वाक्य सज्जनाचें ॥मज०॥३॥

पद ७ वें -
चरणिं रहाविं मज स्मरणिं लाउनि निज सुखद आपण गजवदनारे ॥धृ०॥
प्रापंचिक दुःख शोक भोगुनि बहुत देख क्षिण झालों धाष एक रदनारे ॥च०॥१॥
आठवसि जगजेठि कधिं देसि आत्मभेटि सौंदर्यें जिंकिसि कोटी मदनारे ॥च०॥२॥
विष्णुगुरु तूं प्रमुख दाखविं प्रिय विमुख कृष्णजगन्नाथ सुख सदनारे ॥च०॥३॥

पद ८ वें -
गिरिजा नंदना करिं कृपा एक दंता करुणाब्धि गि० बहुविध अपराध कोटि घडति घालुनि देवा पोटिं ॥धृ०॥
निकटहृदयिं तूं प्रकट न भासुनि फुकट वय निघु जातें करुनि संसार चिंता परिहार देहबुद्धि खोटी ॥ सदया देउनि आत्मभेटी ॥गि०॥१॥
मंदमति हरुनि छंद लाविं निजानंद प्राप्त मज व्हाया विघ्ननाशन महंतां पावसि भजकांतें संकटीं ॥ त्रिभुवनि कीर्ति तुझी मोठी ॥गि०॥२॥
विष्णु गुरुचरणीं नम्र सदोदित कृष्ण जगन्नाथ तुला विनवि संहरिं अहंता सच्चित्सुखमय जगजेटी ॥ हितकर नाम गातों ओठीं ॥गि०॥३॥

पद ९ वें -
श्री गजवदना निजसुखसदना मज रदना लावि आत्मभक्ति काजिं ॥धृ०॥
दुर्लभ मानव जन्म वायां, जाईल दाखविं दिव्य पाया, प्रगटुनि हृदयीं गणपतिराया, नुरवीं देह बुद्धी माझी ॥श्री०॥१॥
वाटतो प्रपंच सारा, चंचळ आकाशींचा वारा, आपण ब्रह्मानंद खरा, कळतें संतसंगें आजी ॥श्री०॥२॥
विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथा, रक्षीं श्रीकर ठेउनि माथा, वदउनि अवतारांची गाथा, सदैव नामामृत पाजीं ॥श्री०॥३॥

पद १० वें -
गजवदना येइं रे सदय गजवदना येइं रे, मनि गजबज होय मज तुजविण भारीं ॥ग०॥धृ०॥
विषय वासना विघ्न हरुनि, स्वरुपीं मग्न करुनि, देहभावना नुरविं संसारीं ॥ग०॥१॥
जाळिं हें विस्मृति बीज, लाउनि ज्ञानाग्नि निज, दाखविं सुख सहज भक्त हितकारी ॥ग०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, आपणासि आठवित, प्रगट होउनि सर्व संकटें निवारिं ॥ग०॥३॥

पद ११ वें -
श्री गजमुख निज सुख दे मजला श्रीगज० सुख दे मजला सुख दे० ॥धृ०॥
विषय विष सदृश मुषक वहान अहि भुषण प्रपंचि जिव भ्रमला, निवविसि कधिं प्रिय दर्शन येउनियां करुणा, येउनियां करुणा, येउनियां करुणा० ॥श्री०॥१॥
वंदन गिरिजा नंदन हरि भव बंधन करिं निर्हेतु मला, सेतु भवाब्धिस नामचि बळकट सेउनियां मनि हा भजला, मनि हा० मनि हा० ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ आत्मपदीं दास्यत्वेंचि सदा रमला, तूंचि उदार अखंड आठउनि अंतरंग प्रेमें भिजला, प्रेमें भि० प्रेमें भि० ॥श्री०॥३॥

पद १२ वें -
नमन तुला तुला गणपती सदा मज निज चरणीं सद्गती ॥धृ०॥
वारुनि भवभय दे सदया प्रिय साधु सज्जन संगति, श्रवण मनन निदिध्यास बळें जे आत्म भजनि रंगती ॥नम०॥१॥
भक्तांस्तव अव्यक्त असुनि त्वां व्यक्त होउनि त्रिजगतिं, गणसिंधुर कमलादि असुर बहु वधिले दुष्ट न मिति ॥नम०॥२॥
सुंदर तव मुख होय हृदयिं सुख अखंड नामामृतीं, विष्णु कृष्ण जगन्नाथ विनवि हरि देह रूप मन्मती ॥नम०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP