मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
संतसंगाच्या महिमेचा अभंग

संतसंगाच्या महिमेचा अभंग

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


धन्य धन्य धन्य सज्जनाचा संग । ज्ञान भक्तिरंग रंगावया ॥१॥
रंगावया मन चैतन्यस्वरूपीं । नाही दुजा ओपी ज्ञान ऐसें ॥२॥
ज्ञान ऐसें जागें जयाचे हृदयीं । नित्य त्याचे पायीं ठेवूं माथा ॥३॥
ठेवूं माथा अहंकार निरसोनी । सेवा संपादूनी राहूं तेथें ॥४॥
राहूं तेथें मन सर्वदा विश्रांती । संसाराची खंती आठवेना ॥५॥
आठवेना एका आपणांवाचोनी । जनी मनीं वनीं घनदाट ॥६॥
घनदाट सुखस्वरूप आपुलें । अंतरीं धरिलें आत्मभावें ॥७॥
आत्मभावें निज दर्शनाचा लाभ । दिधला स्वयंभ गुरुराया ॥८॥
गुरुराया स्वामी ! समर्था ! वैष्णवा ! । द्यावी निज सेवा कृष्णदासा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP