श्रीसद्गुरु विष्णु महाराज सोमण यांचीं पदें.
पद १ लें -
वैष्णव सद्गुरु जनक जगीं मज, सद्विद्या ते आयी रे ।
ध्यान मिषें तनु भान, अखिल अभिमान, नुरे ज्या ठायीरे ॥वै०॥धृ०॥
जाउनि दृढ धरिं पाय, उणें मग काय, तुला जगीं पाहीं रे ॥वै०॥१॥
नाम हृदयिं जप, काय अन्य तप, तरसिल याचि उपायीं रे ॥वै०॥२॥
तो मी ब्रह्म अशा अभ्यासें दृश्य नुरे बा कांहीं रे ॥वै०॥३॥
साधन या रिति, करितां विस्मृति, सांडुनि स्वरुपीं राही रे ॥वै०॥४॥
कृष्ण जगन्नाथात्मज याचें साधन आणिक नाहीं रे ॥वै०॥५॥
पद २ रें -
नमन वैष्णव सद्गुरु राजा ॥धृ०॥
स्वरुपीं जगनग कनकावरि, निश्चय हा माझा ॥नम०॥१॥
पदकमलाहुनि विषय न रुचती, चित्तभ्रम राज्या ॥नम०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे मज, निजानंद पाजा ॥नम०॥३॥
पद ३ रें -
भेटले मज वैष्णव सद्गुरुराज ॥धृ०॥
माया मृगजल भ्रांति उडाली । चढतां चिन्मय पाज ॥भे०॥१॥
जग धोंडाळुनि पाहत असतां । मागुनि केला गाज ॥भे०॥२॥
एकांति एकांतिं पाहतां पाहतां । अवचित मिळले आज ॥भे०॥३॥
कृष्ण जगन्नाथात्मज नाचे सांडुनि लौकिक लाज ॥भे०॥४॥
पद ४ थें -
गुरुंचा विसरुं कसा ऊपकार ॥धृ०॥
स्वस्वरुपाच्या अनुसंधानें । हरिला हा जड भार ॥गु०॥१॥
कोण मी याचा विचार पाहतां । चरणीं दिधला थार ॥गु०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज यासी । वैष्णव सद्गुरुंचा आधार ॥गु०॥३॥
पद ५ वें -
सद्गुरु मजला घडी घडि निजपद आठव द्यावा ॥धृ०॥
साक्षित्वें मी चालत असतां, हळु हळु स्वस्वरुपांत रिघावा ॥स०॥१॥
तनु मन धन संबंध नसो मज, स्वपद भजनि दृढ नित्य असावा ॥स०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज विनवी, हितकर गुरुवर हृदयिं वसावा ॥स०॥३॥
पद ६ वें -
तारक गुरु मजला गुरु मजला । तसाचि होइल तुजला ॥ता०॥धृ०॥
अनुभव कथितों माझा । सच्चित्सुखमय श्रीगुरु राजा ॥ता०॥१॥
मित्रत्वें तुज कथिलें । शास्त्रीं निगमागमिं जें मथिलें ॥ता०॥२॥
हृदयिं प्रगट गुरु झाले । माझे त्रिविध ताप वीझाले ॥ता०॥३॥
निश्चय समजा साचा । विष्णू कृष्ण जगन्नाथाचा ॥ता०॥४॥
पद ७ वें -
गुरु मज प्रिय वाटे प्रिय वाटे । जरि अज्ञ जना दुर वाटे ॥गु०॥धृ०॥
गुरु वचनाच्या नियमा । पाळुनि गाइन श्रीगुरु महिमा ॥गु०॥१॥
श्रीगुरु देवचि कळला । हृदयीं सच्चित्सुखमय फळला ॥गु०॥३॥
गुरुविण व्यर्थ पसारा । दिसतो संसाराचा सारा ॥गु०॥४॥
दैवत श्रीगुरु साचें । विष्णू कृष्ण जगन्नाथाचें ॥गु०॥५॥
पद ८ वें -
गुरुपद साधिं मनातें । विसरवि सकळ विषय वमनातें ॥धृ०॥
आद्य पुरातन जें नवनूतन, हर्षद भक्त जनातें ॥वि०॥१॥
चुकवि पुनर्भव दुःखद हा भव, धरितां जें निज नातें ॥वि०॥२॥
बाह्याभ्यंतरिं सुविचारें करिं, अखंड गुरु भजनांतें ॥वि०॥३॥
विष्णू कृष्ण जगन्नाथ जया मानितसे निज नातें ॥वि०॥४॥
पद ९ वें -
गुरुपदिं प्रेम धरा रे प्रेम धरा । अनुचित तें तुह्मि न करा ॥धृ०॥
गुरुविण देव न दुसरा । समुजुनि सर्व मनांतिल विसरा ॥गु०॥१॥
गुरुवचनोक्ति राखा । आपण चंद्र दिसे ती शाखा ॥गु०॥२॥
गुरुचा शब्द न खोटा । अनुभव सूक्ष्म विचारें घोंटा ॥गु०॥३॥
दुःसंगातुनि कसरा । शाश्वत स्वरुपीं निजमति पसरा ॥गु०॥४॥
लक्षुनियां स्वहिताला । विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥
पद १० वें -
गुरुपद संभाळा रे संभाळा । सांडुनि दृष्य उन्हाळा ॥धृ०॥
पंच पंचकें सोडा । गुरुच्या वचनें मन हें जोडा ॥गु०॥१॥
विकल्प टांकुनि सारा । पेवा गुरुपरमामृत धारा ॥गु०॥२॥
अहंमदाचा वारा । न शिवुनि गुरुपदींच धरा थारा ॥गु०॥३॥
निरसुनि दृष्य पसारा । साधा चित्सुख गुरुच्या द्वारा ॥गु०॥४॥
मानुनि या सुपथाला । विष्णू कृष्ण जगन्नाथाला ॥गु०॥५॥
पद ११ वें -
गुरुवर तारक हा साचा । माझा निश्चय हा मनिंचा ॥धृ०॥
न कळुनि कोणी कांहीं ह्मणतो स्वभाव अज्ञ जनाचा । कळला अभिमानाचा ॥गु०॥१॥
निंदक हो तुह्मिं निंदा, कीं भर आंगीं भाग्य मदाचा । परि मी श्रीगुरुदास सदाचा ॥गु०॥२॥
विष्णू कृष्ण जगन्नाथाचा हृद्रत हेतु जिवाचा । गुरुवर पूजुनि गाइन वाचा ॥गु०॥३॥
पद १२ वें -
वचन गुरूचें पाळीं । बाधक दुष्ट बुद्धितें गाळीं ॥ब०॥धृ०॥
गुरुपदिं मीपण हेंचि कुलक्षण, करिसि गुरुचि उफाळी । तारक गुरुवर संकटकाळीं ॥व०॥१॥
अजुनि तरी सुविचार करुनियां । निज भूषण संभालीं, श्रीगुरु जनन मरण भय टाळी ॥व०॥२॥
नम्रपणें गुरुपद सेविसि । जरि लक्षुनि आत्म जिव्हाळीं, पावसि आंगें स्वसुख वनमाळी, विष्णू कृष्णजगन्नाथ सदा ध्यातो गुरुवनमाळी,जरि जन वाजवि नित्य धुमाळी ॥व०॥३॥
पद १३ वें -
पदवि गुरूची मोठी । प्राण्या गोष्टि नव्हे ही खोटी ॥धृ०॥
गुरूचरणीं अपराधि तया यम, रौरव नरकीं लोटी ॥प०॥१॥
शरण गुरुच्या चरणिं रिघसि जरि, उद्धरिसी कुळें कोटी ॥प०॥२॥
श्रवण मनन ज्या गुरुसंगति तो, स्वरुप सुखामृत घोंटी ॥प०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ हृदय, - साक्षी पाठीं पोटीं ॥प०॥४॥
पद १४ वें -
किति तुज शिकवुं भाग्यमंदा नका करुं श्री गुरुंची निंदा ॥धृ०॥
त्यजा दुःसंग दुष्ट धंदा । देव गुरु एकत्वें वंदा ॥कि०॥१॥
धरुनि गुरु भजनाच्या छंदा । पदोपदिं सेविं निजानंदा ॥कि०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सुख कंदा । हृदयिं दृढ स्मरतां हरि बंधा ॥कि०॥३॥
पद १५ वें -
करिं निज उद्धरणा रे उद्धरणा । लागुनि श्री गुरुचरणा ॥धृ०॥
हरहर मी पण खोटें । जागृति स्वप्नीं दुःखद मोठें ॥क०॥१॥
अनुचित हट बा धरिसी । खटपट निष्कारण तूं करिसी ॥क०॥२॥
धन्य धन्य जगिं व्हाया । विसरुं नको श्रीगुरुराया ॥क०॥३॥
श्री गुरु तारक साचा । हा मज निश्चय सत्य त्रिवाचा ॥क०॥४॥
गुरु सुख सेवकचि बरा ॥ विष्णु कृष्ण जगन्नाथ खरा ॥क०॥५॥
पद १६ वें -
शोधुनि मूळ पहा रे मूळ पहा । उगाचि कां कल कल हा ॥धृ०॥
सोडुनि दे शत्रु सहा । अधिकचि पेटविती जे कलहा ॥शो०॥१॥
कोण मी कैसा याचें । विवरण नेणसि निज उदयाचें ॥शो०॥२॥
अधिष्ठान त्रिजगाचें । आपण जैसें कनक नगाचें ॥शो०॥३॥
गुरु करुणाब्धी साचा । विष्णु कृष्ण जगन्नाथाचा ॥शो०॥४॥
पद १७ वें -
गुरुनीं ऐसी चटक लाविली मोठी । स्वयंभ हृदयीं मज देउनि भेटि ऐ०॥धृ०॥
विसरवि देह घट आपण होय प्रगट । बुजुनि द्वैताची वाट आनंदिं लोटि ॥ऐ०॥१॥
नावडे विषय धन केवळ वाटे वमन । होउनि मन उन्मन स्वरूप घोंटि ॥ऐ०॥२॥
विष्णु गुरु ज्ञानदृष्टी व्यापुनि नुरवि सृष्टि । कृष्ण जगन्नाथ गोष्टी न वदे खोटि ॥ऐ०॥३॥