पद १ लें -
कपिवर मारुति हा वंदा, नसे पराक्रमी आणिक दुसरा, नित्य निरंतर रामपदीं रत ॥धृ०॥
गुरु कृपांजनि सुत हा गगनीं, उडाला प्रबोध सूर्य गिळाया, इंद्रादिक हें जाणुनि वर्णिति, पावुनि आनंदा ॥ दृढतर ॥मा०॥१॥
रामचि होउनि राम उपासक, केवळ निजात्म सौख्य कळाया, श्री राम भजक जन त्या अनुकुल, हरितो भवकंदा ॥सत्वर॥मा०॥२॥
सद्गुरु विष्णु कृपें हा निश्चय, कृष्ण जगन्नाथासि फळाला, वरदहस्त हनुमत्प्रभु चिंतुनि, सकल करा धंदा ॥अनंतर॥मा०॥३॥
पद २ रें -
धन्य एक मारुति सेवक रामाचा । अन्य नाहीं त्रिभुवनिं काया मनें वाचा ॥धृ०॥
हेह लंके माजि शोधी जाणिवे सीतेला । जाणतां अशोक मुळीं भेटावया गेला ॥ध०॥१॥
दाविली खुणा तिसी निज राम मुद्रा । पहातां तन्मय झाली आनंद समुद्रा ॥ध०॥२॥
अद्वय होउनी सितारामीं लीन झाला । राम नाम स्मरणाचा नित्य नेम ज्याला ॥ध०॥३॥
अभय वरदहस्त करुनियां ऊभा । वाम कर कटीं ठेउनि दावि दिव्य शोभा ॥ध०॥४॥
मारुति संकट हारी राम भजकांचा । विष्णु कृष्ण जगन्नाथा उपयोगी साचा ॥ध०॥५॥
पद ३ रें -
भव जलधि मधिल भय हरिल सकल । बलभीम हा मारुती ॥धृ०॥
वांचविला ज्याणें लक्ष्मण प्राणें, वेगें न लगतां क्षण आणुनियां द्रोणाचल ॥ब०॥१॥
अंजनी बाळक त्रैलोक्य चाळक, जेणें लंके माजि केला रावणासी कलकल ॥ब०॥२॥
श्रीराम सेवक लयाण कारक, राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणीं अचल ॥ब०॥३॥
पद ४ थें -
श्री राम दास मारुति सन्मुख पाहुं, लक्षुनियां त्यासी मुळ स्वरूपीं राहूं ॥धृ०॥
देह अयोध्या नगरीं, राम राजा राज्य करी, अज्ञान मी पण वारी, चरणीं वाहूं ॥श्री०॥१॥
मार्गीं कल्पनेची दाटी, तरी जाऊं आत्म वाटीं, ऐक्यपणें घेउं भेटी, द्वैत न साहूं ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथीं, मारुति आवडे प्रीती, उपासना दृढचित्तीं, सुखचि लाहूं ॥श्री०॥३॥
पद ५ वें -
ब्रह्मनिष्ठा बलभीम मारुति राया रे । पद सुमनें हीं रचिलीं त्वां आत्म ठाया रे ॥धृ०॥
सुगंध भोक्ता श्री राम आपण झाला रे । परि समजावी दुर्गंध ज्यांसि आला रे ॥ब्र०॥१॥
काव्य व्याकरण पांडित्य मिरविति त्यांला रे । कळेल कैसी स्वानुभवें सुमन माला रे ॥ब्र०॥२॥
तुझा महिमा आणुनि तूं प्रत्ययाला रे । स्वरुपानंदें तोषविसी सज्जनाला रे ॥ब्र०॥३॥
वंदिति निंदिति मजला कां पद सुमनाला रे । ईश्वर भावें नमन तयां सर्वत्रांला रे ॥ब्र०॥४॥
सहाय होउनि विष्णु कृष्ण जगन्नाथाला रे । राम उपासकां रक्षिसि अंजनि बाला रे ॥ब्र०॥५॥
पद ६ वें -
प्रकटला बलभीम मारुति राया, राम उपासक संकट विघ्न हराया रे ॥धृ०॥
त्रिभुवनि आपण एकचि मजला, न दुजा सहाय कराया रे ॥प्र०॥१॥
वंदन अंजनि नंदन, हे मंदमती न उदया रे ॥प्र०॥२॥
विष्णु चरण रत कृष्ण जगन्नाथ, स्वात्म सुखींच विराया रे ॥प्र०॥३॥
पद ७ वें -
विजयी झाला रामदास मारुती भला, विजयी० खल संहारुनि राम चरणिं राहिला, झाला० ॥धृ०॥
रामभक्त सहाकारी, ब्रह्म निष्ठ ब्रह्मचारि, सेव्य सेवक भावें देह दास्यत्वें वाहिला ॥वि०॥१॥
राक्षस समुदायासह खोटा, रगडुनि जंबुमाळी मोठा, पुच्छाग्नीनें त्रुतिय वांटा, लंकेचा दाटिला ॥वि०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा, रक्षिसि होउनि मातापिता, करुणासिंधु आटवितां, सन्मुख पाहिला ॥वि०॥३॥
पद ८ वें -
पराक्रमी बलभीम मारुति वीर धृ०॥
राम उपासक कार्य कराया घडिहि न लावि उशीर ॥प०॥१॥
श्रीरामाच्या दारय सुखाचें हास्य मुखावरि स्थीर ॥प०॥२॥
वाम हस्त कटिं सव्य वरद करीं फिरवि पुच्छ गरगर ॥प०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाला रक्षि येउनि निज धीर ॥प०॥४॥
पद ९ वें -
राम सेवका मारुति राया भेटुनि त्वां मजला । सुखमय केलें बा, सुखमय केलें सकल जगांतरिं नमस्कार तुजला ॥धृ०॥
कांतीं सुवर्णमय थाटे, आनंद हृदयिं दाटे, लखलखाट घन दाट दर्शनें, सुखमय सकलां वाटे ॥रा०॥१॥
राक्षस लंकेतिल मोठे, स्वभावें दुष्ट महा खोटे, जंबुमाळि अखयादि वधुनि रावणासि मारि सोटे ॥रा०॥२॥
तूं पराक्रमी ऐसा, मज वर्णवेल कैसा, विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय तूं मज, चंद्र चकोरिं जैसा ॥रा०॥३॥
पद १० वें -
विजयि महा बलभीम, वीर मारुती हा, श्रीमद्बलभीम वि० ॥धृ०॥
नीरद श्यामल राम उपासक, धीरद गुण गंभीर, अति निकट ॥वि०॥१॥
जंबुमाळि अखयादि वधुनि, विध्वंसिलि लंका मांडुनि धुसपट ॥वि०॥२॥
पुच्छाचा मार धपट, राक्षसां सकट देउनियां बळकट ॥वि०॥३॥
रामाचा दास त्या नरा त्रास रहित करि नुरवुनि खटपट ॥वि०॥४॥
पद ११ वें -
बलभीम मारुति राया, झडकरीं दाविं तव पाया, मिळउनिया राघव ठाया, परि हरि अविद्या माया ॥धृ०॥
जाळिलि लंका त्वां निःशंका, राक्षसांसि जिंकाया ॥झ०॥१॥
जंबुमाळि अखयादि वधुनि तैं, कळविसि पराक्रमा या ॥झ०॥२॥
कधिं मज भेटसि तळमळ हे असि, लागलि फार जिवा या ॥झ०॥३॥
पुराण कीर्तन श्रवणानंदीं अखंड चित्त रामाया ॥झ०॥४॥
तुजविण मजला क्षणभर न रुचे, प्रपंच धन सुत जाया ॥झ०॥५॥
त्रिविध ताप मज कांपविति, मत्पाप जनित नुरवाया ॥झ०॥६॥
या दुर्व्याधी जना न बाधी, ऐशा साधिं उपाया ॥झ०॥७॥
रामविष्णु कृष्णु जगन्नाथ प्रिय मज उद्धराया ॥झ०॥८॥
पद १२ वें -
बहु मला गांजिति निःसीम दुष्ट ज्यां श्री मद अति बलभीम मारुति तूं पहा घडि घडि ठायीं ठायीं ॥धृ०॥
राम भजक संभाळ करिसि कीं, चालक त्रिभुवनि तूंचि एकला । ऐसा धरुनि हृदयीं धीर स्मरुनियां रघुवीर दास हा रामा विण नेणें कांहीं ॥ब०॥१॥
दिप मालउनि लंकाधिप छळिला त्वां जो राघविं चुकला । कडकडुनि रावण धडधडुनि बोलत वधि कोण हा बळी तुज सम नाहीं ॥ब०॥२॥
श्री सीतापति रामचंद्र पद भक्त पुनर्जन्मा मुकला । विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय भजनिं आवडि इंद्रियां दाहा राम नामी सुख पाहिं ॥ब०॥३॥
पद १३ वें -
हे अंजनि तनया रे । दे दर्शना सदया रे । रघुवीर - दास उशीर न करिशि, धीर हृदया रे ॥हे अंजनि०॥धृ०॥
नुरवुनि मी पण रे । स्फुरवुनि आपण रे । अवनी मला, बलभीम करि निःसीम, उदया रे ॥हे०॥१॥
रघुनंदन सेवक रे । तुज वंदन प्रेम भरें । भजनांत, विळवि अनाथ, मी न जनांत समया रे ॥हे०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ रे । स्वसुखेंचि भवाब्धि तरे । तें अंग, कळवि असंग, परमानंदमया रे ॥हे०॥३॥