मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
साधनोपदेशपर पदें

साधनोपदेशपर पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
पांचिं अहेतु न येतो जन्मा, जो महप्तदाब्ज परा गाश्रित, प्राप्त विज्ञानीं ॥धृ०॥
अहंता त्यजि त्या, महंतिं समता पावे निजानंद निष्कामसि त्यंज्ञान मनंतं ब्रह्म निजात्मानुभव ध्यानीं ॥पां०॥१॥
प्राप्ता प्राप्तीं न हाले, अखिलात्मत्वें साधी निजात्मैक्य वर्त्मासंतप्त तेहि निवति, यद्वाग मृतें निराभिमानी ॥पां०॥२॥
दास्यत्व करितां वैष्णव गुरु चरणाचें, भेटे अखंड चिच्छर्मा अजश्रम व्यभिचारिणीं भक्तियुक्ता श्री कृष्ण वानी ॥पां०॥३॥

पद २ रें -
राहुंया जरा संत विचारी रे । विषय जसें मृगनीर ॥धृ०॥
दुःखद या संसारीं स्वहित करूं रे सेवूंया बरा स्वात्म सुखाब्धी रे ॥वि०॥१॥
माया भ्रम हा भारीं, विवेकें हरूं रे, साधुंया नरा आत्म पराधी रे ॥वि०॥२॥
विष्णु गुरु कृपा मजला तारी, कृष्ण हें स्मरूं रे, लाउंया त्वरा ऐक्य समाधी रे ॥वि०॥३॥

पद ३ रें -
स्थिरावि चित्त गुरुराज कृपा रे । पहातां कोण मी कैसा रे ॥धृ०॥
अनेक दृष्य जगत्पसारा याचा, एकचि आपण साक्षी उमजा रे ॥स्थि०॥१॥
प्रपंच कांहीं वस्तुत्वें नाहीं, कनकावरि नग जैसा रे ॥स्थि०॥२॥
अस्थि भाति प्रिय जाणुनि आत्मा साचा, नाम रुपात्मक वृत्ती वर्जा रे ॥स्थि०॥३॥
ठायिंच्या ठायीं नुरोनियां ही, जागत स्वरुपीं बैसा रे ॥स्थि०॥४॥
अनुभव व्यवहारितांही समाधी नढळे पाहीं, समय असों भलतैसा रे ॥स्थि०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा, निर्विषय स्फूर्तिनें समजा रे ॥स्थि०॥६॥

पद ४ थें -
जाइं गुरुपायीं लाग वेगेंसी हित पाहीं रे, नरतनु हे स्थिर नाहीं, विषयीं भरसि परि पडसि अपायीं ॥न०॥धृ०॥
स्त्री पुत्र सुहृत् तुज वाटे हित, यम घाला घालि तेव्हां करिसि तूं कायी ॥जा०॥१॥
कोण कोणाचा यांत जिवाचा, भुलसि फुकट कायि धरिसि पिसायी ॥जा०॥२॥
विष्णु गुरुपदा आठवुनीं सदा, कृष्ण जगन्नाथ झाला सुखरूप ठायीं ॥जा०॥३॥

पद ५ वें -
संसार चिंता कां करितां सोडा ॥धृ०॥
देह नव्हे हा शाश्वत, याचा विश्वासहि थोडा ॥सं०॥१॥
निज हृदयस्थित राम कळाया, सद्गुरुपद जोडा ॥सं०॥२॥
संसार साक्षि अलक्ष लक्षुनि, आवरा मन घोडा ॥सं०॥३॥
उठतां वृत्ति आत्मस्मरणें आपणांतचि ओढा ॥सं०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ ह्मणे, भवबंधन तोडा ॥सं०॥५॥

पद ६ वें -
श्री रामनाथ गारे आवडीं । वेगें संत समागम जोडीं ॥श्री०॥धृ०॥
भवंडि विषय बुज, कवडी न मिळे तुज, चावडि सांडुनि घेइं स्वस्वरुपीं गोडी ॥श्री०॥१॥
गणित करुनियां जें, ह्मणसि सकल माझें, कोणिच न पावे जेव्हां यम डोयी फोडी ॥श्री०॥२॥
करितां संसार काम वाचे उच्चारावें नाम, विष्णु कृष्ण जगन्नाथ देहबुद्धी तोडी ॥श्री०॥३॥

पद ७ वें -
सहज राम सुखधाम अससि तूं, ह्मणसि नाम रुप देह मी कसा, काम विषयिंचा भ्रमविल हा तुज ॥स०॥धृ०॥
भुलसि प्रपंचा मानुनि साचा, खेद मनानें आपणा आपण शोधुनियां बुज ॥स०॥१॥
खूळ पण रहित शोध मुळाचा, कुल करि पावन त्रिजगातें न होय व्याकुळ, कथिलें हित गुज ॥स०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा अनुभव कीं ग्रासुनि द्वैतातें, अद्वय सेवीं गुरु चरणांबुज ॥स०॥३॥

पद ८ वें -
जरि तरिच सहज सुखी अससी ॥धृ०॥
संत समागमीं जाणुनीं, आत्म एकांतीं बससी ॥ज०॥१॥
आपणा आपण जाणत जाणत, विस्मृतिला ग्राससी ॥ज०॥२॥
विष्णु गुरुपदीं कृष्ण जगन्नाथ जसा, तसा डससी ॥ज०॥३॥

पद ९ वें -
चिन्मात्र मात्र पाहीं रे, अपवित्र त्यागीं रे ॥धृ०॥
बैसुनि एकांतीं नाठवावें चित्तीं, कलत्र पुत्र कांहीं रे ॥चि०॥१॥
जडादि प्रकाशि एक अविनाशी, अन्यत्र सूत्र नाहीं रे ॥चि०॥२॥
विष्णु गुरु कथी कृष्ण जगन्नाथीं, न अस्वतंत्र राहीं रे ॥चि०॥३॥

पद १० वें -
श्री राम तुझें सहज करिल कल्याण ॥धृ०॥
सांडुनि स्नेहा विसरुनि देहा, जरि रोधिसि मन प्राण ॥श्री०॥१॥
आपपर ऐसें द्वैत न कल्पुनि, आपणा आपण जाण ॥श्री०॥२॥
विष्णु गुरुकृपें अनुभव घेउनि, कृष्ण जगन्नाथ वाहे आण ॥श्री०॥३॥

पद ११ वें -
तरिच सुखरूप तुझा संसार, करिसी आत्म विचार ॥धृ०॥
पंचभुतात्मक देह तुझा हा, न जाणसी कां रे । साक्षी तूं याचा वाहूं नको कीं भार ॥त०॥१॥
असंग होउनि स्वरुपींच रहा, न ढळतां बारे । रज्ज्वात्मा मिथ्या दृष्य भुजंगाकार ॥त०॥२॥
विष्णु गुरु कृष्ण जगन्नाथा, भेटतां पहारे । आपुला आपण अनुभव आला सार ॥त०॥३॥

पद १२ वें -
सदैव राम राम ह्मणा रे बापानो ॥सदैव०॥ नरतनु हे दुर्लभा गणा रे ॥धृ०॥
तुम्हीं प्रपंच केला जरि निका । तरि होइल शेवटिं हा फिका । यम काढिल शोधुनि बहु चुका । मार मारिल कठिण आयका रे ॥बा०॥१॥
काय घालवितां वय फुका । ध्यानि आठवा रघुनायका । ब्रह्मत्वें आपणां तुका । जन्म मरणाला मग मुका रे ॥बा०॥२॥
देह पडेल कधिं न भरंवसा । निज आत्मा आपुला कसा । हें जाणत एकांति बसा । न कळे तरि गुरुला पुसा रे ॥बा०॥३॥
मोठेपणिंचा अभिमान सोडा । छी छी देह मी पण खोडा । दृढ असंग शस्त्रें तोडा । आहे अखंड सुख तें जोडा रे ॥बा०॥४॥
जगीं तारक विष्णव गुरु । त्याचे चरण जाउनि दृढ धरूं । कृष्ण जगन्नाथ सांगे उद्धरूं । आपआपणा सावध करूं रे ॥बा०॥५॥

पद १३ वें -
जप तूं राम नाम किती मधुर, मधुर, मधुर, मधुर ॥धृ०॥
राम नाम ध्वनि उमटे । तेथें लक्ष लाविं नेटें । ब्रह्मानंद सहज भेटे । प्रचुर, प्रचुर, प्रचुर, प्रचुर ॥ज०॥१॥
दृष्य देखतांचि दिठी । देईं द्रष्टे यासि मिठी । आपुलें आपण सौख्य घोटी । नदुर, नदुर, नदुर, नदुर ॥ज०॥२॥
राम विष्णु कृष्ण ध्यान । त्यासि दे मुकुंद ज्ञान । जेणें होय समाधा । चतुर, चतुर, चतुर, चतुर ॥ज०॥३॥

पद १४ वें -
आहे भासे प्रिय राम स्फुरे, हृदयिं प्रगट कां धरितो देह मी ॥धृ०॥
भू, वन्ही, आकाश, पवन, जल । अंश नटक या भुलुनिं फुकट ॥आ०॥१॥
तत्वमसि महा वाक्य विवरितां । सर्वहि निरसुनि ब्रह्म निकट ॥आ०॥२॥
स्वयंप्रकाशी तूं अविनाशी । अलक्ष लक्षुनिं होईं मुकुट ॥आ०॥३॥
वैष्णव सद्गुरुपद फळ ऐसें । पांडुरंग कृष्णासि विकट ॥आ०॥४॥

पद १५ वें -
पाहें रे पाहें नृजन्मीं या थोरवा, पाहें रे स्वस्वरुपीं जागें रे ॥धृ०॥
धन दारादिक होय उपाधिक, करूनि विवेक, जनिं वागें रे ॥पा०॥१॥
देह अनात्मा, आपण आत्मा, विवरिसै तरि सोय लागे रे ॥पा०॥२॥
विष्णुपदीं रत, कृष्ण जगन्नाथ, कथि निज हित अनुरागें रे ॥पा०॥३॥

पद १६ वें -
येव्हां रामकृष्ण हरि मुखें बोलुं या रे । बाळपणिं कांहिं चिंता नाहीं ह्मणुनियां ॥ये०॥ होइल आनंदचि त्या सुखें डोलुं या ॥सु०॥सारे मेळुया येथें खेळूं या ॥ये०॥धृ०॥
विषयोप भेगें, तरुणपणि वय जाय । सुखावरि दुःखें येतां, मनीं होइल हाय हाय । इछित हेतु न साधे तरि मग अंगीं क्रोधाची जढाय । कोणी नीच उत्तर देतां लागे करावी लढाय । नित्य संसार चिंता मोठेपणाची बढाय । प्रभु कंसारि जो कृष्ण त्याचे नाठवेल पाय ॥ये०॥१॥
वृद्धपणामाजी छी, छी, कोणी नव्हती सहाय । आह्मी प्रत्यक्ष पहातों हाल हाल होती काय । दिवसें दिवस बुद्धी चळती बैसवेना एके ठाय । जरी पडला भूमी तरी त्यासि कोणी न उठाय । तरि विषयांच्या सोसें वाढे अधिक पिसाप । गळती शक्ति ज्याची त्याची कांहीं न चले उपाय । तैं मग साधेल कैसा नवविधा भक्ति व्यवसाय । विष्णु कृष्ण जगन्नाथा हरी सर्व ही अपाय ॥ये०॥२॥

पद १७ वें -
भाग्य मोठें प्रभुनें दिला देह मानवाचा । दशेंद्रियें मन बुद्धि दिलीं साह्यते जिवाच्या । पठुत्वहि दिधलें किति तें न बोलवे वाचा । उपकार वाटे सदय हृदय राघवाचा ॥भा०॥१॥
श्रवण भक्ति साधुनि प्रेमें सुखें बोलुं नाम । आकळेल मूळ सुखाचें होतिल पूर्ण काम । स्वानुभवें भेटेल हृदयिं स्फुरुनि आत्माराम । तेणें आत्मा होइल सदोदित अखंड आराम ॥भा०॥२॥
चरणिं यात्रा साधुनि गाऊं वाजऊं करटाळी । श्याम सुंदर ध्यान मनोहर पाहुं वनमाळी । सत्संगीं आत्म भजन रंगीं रंगुंया त्रिकाळीं । लोळुनि तत्पदिं पाय धुळीतें लाउंया कपाळीं ॥भा०॥३॥
ऐसा हा आनंद इतरां योनि माजि नाहीं । पशुपश्वादि जन्मीं न घडे आत्म बोध कांहीं । कळुनि आत्म महिमा न पडो दुःखाच्या प्रवाहीं । विष्णू कृष्ण जगन्नाथ आठऊं लवलाहिं ॥भा०॥४॥

पद १८ वें -
कां रे उचाट तूं ऐसा । प्राण्या न कळुनि कोण मी कैसा ॥धृ०॥
सत्कर्मावरि निष्ठा न तुझी । जमविसि मात्र तूं पैसा ॥कां०॥१॥
ज्या त्या अंगावरि तूं येसी । क्रोधानें पशु जैसा ॥कां०॥२॥
गुरु विष्णू कृष्ण जगन्नथा । तुजहि सुखद हो तैसा ॥कां०॥३॥

पद १९ वें -
मीपण शोधिं तुझें शोधिं तुझें । कोठुनि बा हें उपजे ॥धृ०॥
उगेंचि असतां जेथें, । मीपण उमटे लक्षी तेथें ॥मी०॥१॥
नसतें बोलसि वदनी । मीपण नेईल तुज यम सदनीं ॥मी०॥२॥
मी मी ह्मणवुनि उडसी । अवाच्य शब्द बडबडसी ॥मी०॥३॥
मीपण धरिसी खोटें । निद्रेमाजि असे तें कोठें ॥मी०॥४॥
आवडि गुरुपदिं साची । विष्णू कृष्ण जगन्नाथाची ॥मी०॥५॥

पद २० वें -
चला गडे या हो, अयोध्येसी जाऊं । भक्त काम कल्पद्रुम राम नयनिं पाहूं ॥धृ०॥
नाशवंत देह, तैसा हा संसार । अभिमानें मोठे मोठे नाडियले फार ॥चला०॥१॥
अनंत जन्मीचें पुण्य ज्याचे गाठीं । त्यास अनायासें होय, सुखें राम भेटी ॥चला०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ राम कृपा मूर्ति । ऐसी हे प्रगट झाली, त्रैलोक्यीं सत्कीर्ति ॥चला०॥३॥

पद २१ वें -
राम कृष्ण हरि ह्मणा, राम कृष्ण हरी ॥धृ०॥
नाम, परि मुखें बोला राम । आला सीताराम, चला पाहूं अभिराम ॥ रामकृष्ण हरि ह्मणा० ॥१॥
नाम गाय भावें, त्याचें काम देव करीं ॥रामकृष्ण॥रा०॥२॥
श्याम सुंदर राम तनु, काम कल्पतरु । धाम आनंदाचें त्याचें नाम नित्य स्मरूं ॥रा०॥३॥
गळां वैजयंती माला, शोभे मेघश्याम । वेळों वेळां साधु जेथें पवती विश्राम ॥रा०॥४॥
हळाहळ शिव प्याला कळत मुद्दाम । कळा निधी हुनी जळा फळला श्रीराम ॥रा०॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ अचल आराम । सेवितां सेवितां होय विपदविराम ॥राम०॥६॥

पद २२ वें -
भाग्यवंत ऐसा मनुजा तुझ्यासम कोणिच नाहीं ॥धृ०॥
ह्मणसि भाग्य माझें कैसें । हृदयीं राम प्रकटे ऐसें । जैसें कर्म करिसी तैसें । प्रपत फळ न संशय कांहीं ॥भा०॥१॥
जरि तूं जाउनि करिसिल चोरी । मार खासिल परोपरी । आपुला आपण होउनि वैरी । दंड होती ते ते साहीं ॥भाग्य०॥२॥
मुखें नाम हाती टाळी । वाजवि त्याची विघ्नें टाळी । विसंबेना कधि वनमाळी । मागें पुढें रक्षित राही ॥भाग्य०॥३॥
नवविधा मक्ति केली । ब्रह्मानंद पदवि उदेली । दुःख दुर्दशा ते गेली । सांडुनियां दिशा दाही ॥भाग्य०॥४॥
जरि तूं होता वृषभ गाई । श्वान सुकर नव्हति बढाई । भगद्भक्ति घडती काई । विचारें आप आपणांत पाहीं ॥भाग्य०॥५॥
मनुष्य जन्म पदवि न थोडी । पुनर्जन्म बंधन तोडी । लागेल जरी सज्जन गोडी । न पडवी दुःख प्रवाहीं ॥भाग्य०॥६॥
दाटुनी जरी पापें करिसी । लक्ष चौर्‍याशिं योनी फिरसी । जन्मुनि जन्मुनि पुनरपि मरसी । श्वान सूकर होउनि गाई ॥भाग्य०॥७॥
संत संग जरि तूं धरिसी । आत्मज्ञानें भवनिधि तरसी । पूर्ण आनंदांतचि भरसी । देती वेदशास्त्रें ग्वाही ॥भाग्य०॥८॥
विष्णुकृष्ण जगन्नाथाला । सत्यत्वेंहा अनुभव आला । ह्मणुनि कळवितो सर्वांला । गोष्टि अंतरांत धरा ही ॥९॥

पद २३ वें -
अयोध्येसि उत्साह भला, तुह्मीं येतां काय हो पाहुं चला ॥धृ०॥
संतसाधु समुदाय मिळाला ॥येतां०॥१॥
कीर्तन नर्तन थाट मिळाला ॥येतां०॥२॥
राज्यासनिं श्री राम बैसला ॥येतां०॥३॥
मंदहसित सुख छंद भजनिं, आनंदघन सांवळा । रत्न जडित शिरीं मुकुट झगझगित, पितांबर पींवळा ॥तुह्मीं०॥४॥
गळ्यांत मौक्तिक पंक्ती धवला ॥येतां०॥५॥
पदकें नवरत्नांन्वित माला ॥येतां०॥६॥
उमटति विद्युत्प्रकाश ज्वाला ॥येतां०॥७॥
लखलख शोभे भाळीं केशर, कस्तुरि चंदन टिळा । केसरि पट पांघुरला । त्रिभुवनिं अगम्य ज्याची लीला ॥तुह्मीं०॥८॥
व्यापक ब्रह्मांडाचा सकळां ॥येतां०॥९॥
जिवन्मुक्ताचा जिव्हाळा ॥येतां०॥१०॥
सदैव ज्याचें भय कलि काळा ॥येतां०॥११॥
आज्ञाधर विधि हर इंद्रादिक, सुर जोडूनि करकमला । वर वांछिति दृढतर भक्तीचा । परम प्रीतिकर आगळा ॥तुह्मीं०॥१२॥
सुरवर वानर संघ दाटला ॥येतां०॥१३॥
किन्नर विद्याधर गण आला ॥येतां०॥१४॥
सुंदर गाती प्रेम जयांला ॥येतां०॥१५॥
सनक शुकादिक योगी भोगित, ध्यानीं सुख सोहळा । कनकालंकृति वामांकावरि, जनक नृपाची बाला ॥तुह्मीं०॥१६॥
जपी तपी सन्यासी मेळा ॥येतां०॥१७॥
भक्त नाचती मांडुनी खेळा ॥येतां०॥१८॥
दर्शन घेती वेळोवेळां ॥येतां०॥१९॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ सदा । अवलोकीं निज डोळां । पवनात्मज सुता भजनि लंपट, करुनि मनाचा गोळा ॥तुह्मीं०॥२०॥

पद २४ वें -
हितकर गोष्टी न घेसि तुं कानीं । तुज वारंवार किति कथितों हित गुज जाउनियां याच्या त्याच्या बससी दुकानीं ॥धृ०॥
नित्य उठोनियां जेथें तेथें तूं त्रिकाळीं । बैसोनियां मारिसि तूं लोकाचि टवाळी । साधु संतां देसि रे, उगिच शिव्या गाळी । तरी बा तुझी, मोड ही खोड वाईट, जोड भगवद्भक्ति नीट, कधिंच न होय तृप्ति विषय सुखानीं ॥हितकर गोष्टी न घे०॥१॥
रात्रंदिवस वागविसि संसार व्यथा । नावडे हरी पुराण कीर्तन कथा । गेलें रे तुझें यांतचि आयुष्य सारें वृथा । एखादा तुज जरी, कोणी नेला बळें, आळसानें अंग वळे, न ह्मणतां राम मुखें राहसि मुख्यानें ॥हितकर गोष्टी न घे०॥२॥
जरि तूं न भजसि दयाघन रामराया । चुकेल भाग्य फसेल ही मानव काया । परत लागसि तूं नाना योनि भ्रमाया । न जाणों माकड, बैल बोकड, पशुपक्षी होउनि कीं, कीं, चीं, चीं, पीं, पीं, करिसी वृक्षीं असंख्य रूपानीं ॥हितकर गोष्टी न घे०॥३॥
आतां तरि भज विष्णु कृष्ण जगन्नाथा । वदनीं वद सद्भावें सद्गुण गाथा । वरद हस्त ठेविल कीं आपुल्या माथा । जो आपण सच्चिदानंद, प्रगटुनि हृदयीं तुझ्या, पुरविल हेतु नानाविध कौतुकांनीं ॥हितकर गोष्टी न घे०॥४॥

पद २५ वें -
आतां तरी जाऊं या रामभेटी । धरुनियां आवडी पोटीं ॥धृ०॥
किती खेपा जन्मा आलों । बाळ तरुण वृद्ध झालों । भोगियलीं दुःखें कोटी ॥आतां०॥१॥
जे जे संसारासी येती । ते ते मृत्युपंथें जाती । पुढें यमयातना मोठी ॥आतां०॥२॥
वेद पुराणें गर्जती । धरारे संत संगती । मिथ्या हे प्रपंच रहाटी ॥आतां०॥३॥
कोटी सूर्य समप्रभ । राम अद्वय स्वयंभ । प्रगटला भक्तांसाठीं ॥आतां०॥४॥
वैष्णव सद्गुरु स्वामी । नित्य वसे अचला रामीं । कृष्ण जगन्नाथ आंगें गांठी ॥आतां०॥५॥

पद २६ वें -
अयोध्येसि आनंदें नाचती नरकवासि सुरवृंद । सिंहासनि रघुराज बैसला जानकि परमानंद ॥धृ०॥
कीर्तन गजरें थाट मिळाला भक्तजनांचा पुंज । छत्र पतका चवरें उभविती ध्वज नामाच छंद ॥अयो०॥१॥
झणझणाणती टाळ विणे किती वाजताति मृदंग । स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध कवणासि अटक ना बंद ॥अयो०॥२॥
पुष्पांचा पर्षाव बुक्याचा घम घम येति सुगंध । धन्य धन्य नरजन्म घोंटिती केवळ ब्रह्मानंड ॥अयो०॥३॥
संत साधु सत्पुरुषांचा जो सर्व सुखाचा कंद । निज भजकां श्रीराम विलोकी हास्य करुनियां मंद ॥अयो०॥४॥
लक्षकोटि संख्यांक मशाला घेउनियां निःशक । निरहंकारें उभे ज्या नसे थोर पणाचा गंध ॥अयो०॥५॥
धों धों नौबत वाद्यें वाजति चित्र विचित्र अनंत । उडती वानर जय रघुवीर ह्मणुनि स्वच्छंद ॥अयो०॥६॥
रघुरायाची कीर्ती गर्जती मानिति भूवैकुंठ । अखंड स्वरूपानंदानें आलिंगिति निर्बंध ॥अयो०॥७॥
रत्नजडित लखलखीत मंडपीं विबुधोद्यानवसंत । श्रीसीतापति पद कमलावरि मारुति होय मिलिंद ॥अयो०॥८॥
देव ऋषी गंधर्व भाट जन सन्मुख गाति प्रबंध । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ प्रिय निरतिशयानंद ॥अयो०॥९॥

पद २७ वें -
तरी तुज प्रपंच हा वाटे अति गोड । जरि पुत्र नातु पणतु सुना शिव्या देती नारी ॥तरी०॥धृ०।
चाळणिचें जळ विषय सुख केवळ । चिळस न ये जरि बहुविध दुःखें गांजला संसारीं ॥तरी०॥१॥
बोलसि घरच्यांसि फार । खर्च करितां वारंवार । तीं तुज बोटें मोडिति मागें, घालिसी जैं घसारीं ॥तरी०॥२॥
ह्मणसी मी शहाणा । चतुरांचा राणा । बैल जसा घाण्याचा प्राण्या श्रमसि त्यापरि भारीं ॥तरी०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा भक्ति मार्गें शोधीं आतां । सांपडेल सुखमय हृदय माझारीं ॥तरी०॥४॥

पद २८ वें -
भज रे मानसिं राघवा । आनंद पावसि आवघा । जरि तुज वाटे वानवा । विचारिं संतांसि मानवा ॥भ०॥धृ०॥
हरुनि सकल आपदा । दाखविल आपुल्या पदा । ना तरि योनि श्वापदा । निश्चयें भोगिसि तापदा ॥भ०॥१॥
नाठविसि राम येधवां । आठविसि तरि केधवां । काय करिसि तूं तेधवां । यम मारिल तुज जेधवां ॥भ०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ या । स्मरतां वारिल तो भया । स्वसुखानुभव यावया । विषयिं न घालिं या वया ॥भ०॥३॥

पद २९ वें -
प्रभु अखंड सुखमय रामचि हा । देह मीपण सांडुनि उलट पहा ॥प्र०॥धृ०॥
दिसतो जो तुज दृष्य पसारा । मिथ्या मृगजल जाण, होशिल सुजाण, वधुनि शत्रूंसि सहा ॥प्र०॥१॥
अंतर दृष्टी करुनि निरीक्षीं । खेळे ज्यावरि प्राण, लक्षिं त्या आण, न कल्पित उगिच रहा ॥प्र०॥२॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणें । करि कल्याण, सख्या तुझि आण, ज्यासि प्रिय भक्त महा ॥प्र०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP