मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें

श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
नरहरिराया करिं कृपा वरद हस्ता, तुज शरण मी लक्ष्मि नरसिंह निरतंर ॥धृ०॥
चरण अखंडित दावुनि आत्म स्मरणीं, हें मन लावीं हरुनी चिंता समस्ता, चित्तिं धरिला निर्धार निजपदीं देसी थार ॥न०॥१॥
ताप सहाती पाप अनावर घडलें विषय विलासें पाववीं दुरित, पूर्ण दयेचा सागर तूंची त्रैलोक्यीं उदार ॥न०॥२॥
स्वरुपीं दृढ लक्ष न राहे पाहुनि, दृश्य पसारा जगद्भास हा नस्ता, विष्णू कृष्ण जगन्नाथा प्रिय कर तूंचि फार ॥न०॥३॥

पद २ रें -
श्री लक्ष्मी नरसिंह कृपा जलधर, वर्षुनि करिं सदैव हर्ष मज ॥धृ०॥
वरदहस्त मन्मस्तकिं ठेउनि, दावि हृदयिं अविनाश स्वपद निज ॥श्री०॥१॥
गांजवितें नाना परि देहींचें मीपण हरीं, विनवितों नरहरि कर जोडुनियां तुज ॥श्री०॥२॥
होउनियां बहिर्मुख विषयिं मानिलें सुख, कळों आलें तेंचि दुःख आत्मानुभावें सहज ॥श्री०॥३॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ लाविं आस भक्ति पंथा, चरणिं अर्पिला माथा तूंचि माझें हितगुज ॥श्री०॥४॥

पद ३ रें -
जय श्री लक्ष्मी नरसिंहारे, जय श्री लक्ष्मी निरसिंहारे; नरसिंहारे, नरसिंहारे ॥धृ०॥
लक्ष्म विषयिं एक क्षण नुरऊनि रक्षिन निजपद ठेवारे । भक्षिन परमामृत आत्मत्वें भेटसि तूं मज केव्हांरे; मज केव्हां रे मज केव्हां रे ॥जय श्री०॥१॥
हाचि मनोरथ साच करुनि मज, वांचवि तूं स्वयमेवारे । जाच न साहुनि आळवितों तुज, अज्ञ असा मी जेव्हां रें; मीं जेव्हां रे, मी जेव्हां रे ॥ज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ अतिप्रिय तूं नरहरि देवारे । चंचल मति सोडुनि आत्म स्मरणीं, हों रत जिव्हारे; रत जिव्हा रे, रत जिव्हा रे ॥ज०॥३॥

पद ४ थें -
श्री लक्ष्मी नरसिंह नरहरे, दे निज भक्ति मला रे ॥धृ०॥
मायामय हा प्रपंच सारा, भोगुनि जिव दमलारे । सत्संगतिच्या द्वारा अंतरिं सत्य तूंचि गमला रे ॥श्री०॥१॥
देह मीच या नीच पणानें, स्नेह विषयिं रमला रे । गेह पुत्र धन कलत्र चिंतुनि, मद्विचार भ्रमला रे ॥श्रे०॥२॥
कनक कशिपरिपु जनक जननि तूं, वरदहस्त विमला रे । विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझा मी, दाखविं पद कमला रे ॥श्री०॥३॥

पद ५ वें -
लक्ष्मी नरसिंहा चरणिं शरण स्वस्मरणिं लावुनि हरिं मरण जनन ॥धृ०॥
नरहरि राया, भक्त सुखाया, प्रकटुनि स्तभिं केलें असुर हनन ॥ल०॥१॥
ब्रह्मांदि अमर नारद तुंबर, निजनाम गुण गाती करुनी सनन ॥ल०॥२॥
श्री विष्णु तुझ्या अवतार कथा, कृष्ण जगन्नाथ करि श्रवण मनन ॥ल०॥३॥

पद ६ वें -
सदा मी नरहरिं शरण तुला ॥धृ०॥
शरण अंतरिं तुज नरहरि । कैं पक्षिला, लक्षिला, साक्षिला, रक्षिला, भक्त निज प्रल्हाद कडकड स्तंभि प्रगटुनि घडडि गगन ॥स०॥१॥
अवतरुनि त्वां हिरण्यकशिपु । थरारिला, विदारिला, मारिला, तारिला, सकल सुर समुदाय वंदुनि, पाय स्मरती सिंहवदन ॥स०॥२॥
आवडुनि नरसिंह नरहरि । पाहिला, मायिला, राहिला, वाहिला, देहभ्रम गुरु विष्णूच्या पदिं, कृष्ण जगन्नाथ करितो नमन ॥स०॥३॥

पद ७ वें -
ऐसी कृपा दृष्टि व्यावी नरहरि राया रे । पावविती निज आत्म ठाया रे ॥धृ०॥
स्वस्वरूप स्फुरवी चित्तीं, उलटवूनि नुरवीं वृत्ती । स्वप्रकाशीं न ठेविती माया रे ॥ऐ०॥१॥
अलक्षीं लाववीं लक्ष । अनुभववीं अपरोक्ष, हरविती सर्वही अपाया रे ॥ऐ०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा तूंचि मज माता पिता । वय माझें जाऊं न दे वायां रे ॥ऐ०॥३॥

पद ८ वें -
श्री लक्ष्मी नरसिंह तुझें प्रिय भजनचि दे, नरहरि देवा रे ॥श्री०॥धृ०॥
सच्चिदानंद स्वरुपी जाईं आठवसी, न स्फुरती तईं धनसुत जाया रे । अखंड ध्यातां हृदयीं अद्वय भावें, अधिकाधिक सुख ठेवा रे ॥श्री०॥१॥
सत्संगतीनें कळतां प्रपंच मिथ्या, दृष्य पसारा सर्वहि माया रे । निजात्मा ज्ञानें विस्मृतिच्या अभावें, आवडली पद सेवा रे ॥श्री०॥२॥
श्रीविष्णु कृष्ण जगन्नाथा चरणीं ठेवीं, तव दास्य कराया रे । हास्य मुखा तुज सेवकें म्यां पहावें, आनंदा आनंद देत खेंवा रे ॥श्री०॥३॥

पद ९ वें -
श्री लक्ष्मी नरसिंह नरहरी येइं रे । किती अंतरसाक्षी निश्चय पाहसि ॥धृ०॥
येइं रे येइं रे वेगीं नाहीं तुज विण जगीं । आइबाप उगा कैसा राहसी ॥श्री०॥१॥
धरवेना मज धीर लाविलासी कां उशिर । निष्ठुर मनिंचा कधीं नव्हसी ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा नावडे संसार कथा । तूंचि माझा सर्व भार वाहसी ॥श्री०॥३॥

पद १० वें -
श्री लक्ष्मी नरसिंह वरदकर, हुरुनि सकल दुर, करि कृपा मजवर, नरहरि निरंतर, शरण तुझ्या पदा ॥श्री०॥धृ०॥
नावडे विषयी जन, विटलें संसारीं मन । कधि भेटति सज्जन, करविति आत्मध्यान, स्वस्वरुपीं उलटउन, रहाविं आंगें सदा ॥श्री०॥१॥
देहींचें मे पण भारीं, जाचवितें नाना परी । काच बैसवी अंतरीं, साच सांगतों श्री हरी । माझे मज झाले वैरी, नुरवि हे आपदा ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा, प्रिय निज गुण गाथा । ठेउनि स्वकर माथा, हरि वेगें भव व्यथा । लावि नित्य भक्ति पंथा, दयाघना सर्वदा ॥श्री०॥३॥

पद ११ वें -
केला प्रगट हृदय कमळीं अद्वय, केला प्रगट हृदय कमळीं, तुज लक्ष्मी नरसिंह नरहरी भक्त जनीं ॥केला०॥धृ०॥
संत संगतिनें ज्यांचा, शुद्ध झाला भाव साचा । स्वस्वरुपीं काया वाचा, लागले भजनीं ॥के०॥१॥
भक्त प्रल्हादाची आर्ती, तूं हे नारसिंह मूर्ति । सच्चित् सुखमय स्फूर्ति, मूळ उमजुनि ॥के०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, एकत्वें तुजचि ध्यात । नित्य नाम गातां, लौकिक त्यजुनि ॥के०॥३॥

पद १२ वें -
जय श्री लक्ष्मी नारसिंहा, येइं नरहरि राया रे ॥येईं न०॥धृ०॥
मज एक क्षण, युगसम तुजविण । नावडे प्रपंच जाया रे ॥ज०॥१॥
अंत पाहसि किति, श्रमलों मी नाहीं मिति । गांजिति अविद्या माया रे ॥ज०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, निज नाम गुण गातां । दावी प्रीय आत्म पाया रे ॥ज०॥३॥

पद १३ वें -
श्री लक्ष्मी नरसिंह भेटला नित्य आत्म सुखकर ॥धृ०॥
शरण येति जे या पदा, अभय त्यां मी देतों सदा, गुप्त द्विह सार्थ घोंटिला नृसिंहाचा ॥गुप्त०॥ निश्चय बळकट हृदयीं ज्याला, कधीं न विसरे त्याला, रक्षिं निरंतर ॥श्री०॥१॥
नरहरि भक्तांचा कैवारी, प्रगटुनियां स्तंभा माझारी, हिरण्य कश्यपु फाडिला क्रोधें साचा ॥हरि०॥ आत्मपदीं स्थिर केला, निज प्रिय प्रल्हादाला, ज्याच्या आस्तिक्यत्वें स्फुरे हृदय चराचर ॥श्री०॥२॥
विष्णू चतुर्भुज स्वामि नारसिंह, अंतर्यामी सच्चित् मुखमय दाटला विरेवाचा ॥सच्चित्सुख०॥ परि सेव्य सेवकत्व न मोडूं देतां, एकत्व कृष्ण जगन्नाथ उभा जोडुनियां कर ॥श्री०॥३॥

पद १४ वें -
केव्हां भेटसि लक्ष्मी नरसिंहा, कळवळसी जेव्हां, भक्तिस्तव आठविं मी तुज तेव्हां, प्रभु वळलि जिव्हा ॥धृ०॥
स्मरला प्रल्हाद तुला, न विसरला असुरेश्वर भरला कोधें, जैं तत्कालचि तूं स्फुरला, स्तंभीं गुरगुरला ॥के०॥१॥
सदया येउनि आत्मत्वें उदया, शांतविं बा हृदया । नरहरि हरि काम क्रोध मत्सर मद या मजवरी करुनियां दया ॥के०॥२॥
श्रमला जिव हा संसारीं, सुख विषयीं न मला । विष्णू कृष्ण जगन्नाथ प्रति विमला, दाखविं पदकमला ॥के०॥३॥

पद १५ वें -
लक्ष्मी नारसिंहा नरहरि ऐसी कृपा करीं रे ॥धृ०॥
संगें साधु सद्भक्तांच्या रंगीं रंगुनि निज भजना आंगें रे । उठति लहरि मनाच्या आनंद सागरीं रे ॥ल०॥१॥
चित्त नाठवि संसारा विसंबेना आत्म विचारा रे । नित्यत्वें तुज निर्विकारा न सोडिं अंतरीं रे ॥ल०॥२॥
नावडे विषय कथा विष्णु कृष्ण जगन्नाथा रे । ज्ञानें जाणुनि तुज हृदयस्था देखें चराचरीं रे ॥ल०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP