शिष्याकरितां केलेला अभंग
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
गुरुराज बोले, अरे शिष्यराया ! । एकांतीं बैसाया उबगूं नये ॥१॥
उबगूं नये कधी साधन करितां । क्षण एक रिता राहूं नको ॥२॥
राहुं नको दासबोध ग्रंथावीण । आत्मा हा आपण अनुभवावा ॥३॥
अनुभव साधीं आपण एकला । सकल दृश्याला साक्षी तो मी ॥४॥
साक्षी तो मी जो हा वायु उठे त्याचा । उठल्या वृत्तीचा मीच साक्षी ॥५॥
मीच साक्षी एक वृत्ती या अनेक । पाहतों कौतुक एकला मी ॥६॥
एकला मी पाठीं, वृत्ती पुढें दिसे । संग मज नसे या वृत्तीचा ॥७॥
या वृत्ती उठती मजपुढें सार्या । देखणा मी बर्यावाईटाचा ॥८॥
बर्यावाईटाचा संग नसे मज । साक्षी मी सहज दिसे त्याचा ॥९॥
दिसे त्याच्या पाठीं आहें मी एकला । पाहणार झाला मोकळा मीं ॥१०॥
मोकळा मीं देह इंद्रियांचा साक्षी । आपणांतें लक्षी आपणची ॥११॥
आपणासी लाभ आपणाचा परी । अभ्यास हा करीं गुरुबोधें ॥१२॥
करी गुरुबोध ऐसा चच्छिष्यास । म्हणे कृष्णदास वैष्णवांचा ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP