श्री नृहसिंहाचीं पदें
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.
पद १ लें -
नरहरि तो भेटवा हो । कोणि तळमळ माझि चुकवा हो ॥धृ०॥
देहन मी द्विज काय तुह्मांला । करिन चरण सेवा हो ॥न०॥१॥
कळला हा संसार पुरे मज । होती जाच जीवा हो ॥न०॥२॥
सज्जन जे तुह्मीं सदय तयांतें । मज साठीं विनवा हो ॥न०॥३॥
जगन्नाथ सुत कृष्ण तुमचा । करितो नमन वांचवाहो ॥न०॥४॥
पद २ रें -
ध्यास तुझा हृदयीं नरसिंह निरंतर । भेट कृपाकर मजवरी रे ॥धृ०॥
पाहुनिं तव मुख सेविन मीं सुख । होइं देवा संमुख झडकरीं रे ॥ध्या०॥१॥
त्रिविध ताप मज जाचविती निज । दावि पद पंकज नरहरी रे ॥ध्या०॥२॥
धन सुत जाया जाइल काया । दुस्तर माया आवरीं रे ॥ध्या०॥३॥
जगन्नाथ द्विज बाळ विनवि तुज । कृष्ण पाप बिज परिहरि रे ॥ध्या०॥४॥
पद ३ रें -
नरहरि तूं मजला प्रिय वाटे । मन दाटे निज पद आठउनीं ॥धृ०॥
हा मज ध्यास निरंतर देवा । जीवा दे सुख गांठउनीं ॥न०॥१॥
दुष्ट पातकी विषय सुखीं मी बुडालों कर्में दाटउनी ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याला । मुखमय करिं तुज भेटउनीं ॥न०॥३॥
पद ४ थें -
किति चुकलों नकळे नरसिंहा । मज जेव्हां दुरदुरसा दिससी ॥कि०॥धृ०॥
व्यापक हेम नगीं जग तैसा । व्यापुनि चिद्रूपें अससी ॥कि०॥१॥
तळ मळ जीव पणाची माझी । न सुटे काय उगा बससी ॥कि०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण वदे कीं । निर्दय मनिंचा तूं नससी ॥कि०॥३॥
पद ५ वें -
लागला मज नरसिंह असा ध्यास ॥धृ०॥
दर्शन देउनि पावन केला । हरिला माझा त्रास ॥लागला०॥१॥
प्रल्हादाचा जो वर दाता । सुखकर तोचि मनास ॥लागला०॥२॥
जगन्नाथ सुत कृष्ण ह्मणे मी । झालों नरहरि दास ॥लागला०॥३॥
पद ६ वें -
सेवीं नारसिंहराज । नको मना तळ मळ ॥धृ०॥
विषयी जनाची संगती सांडीं । किति तुज विनवणि करितों कांहीं धरीं लाज ॥से०॥१॥
साधु समागम लक्षुनि जाईं । दुसरा हा भव निधि तरणें साधीं हेंचि काज ॥से०॥२॥
जगन्नाथ बाळक कृष्ण तयाला ।फिरविसिकां पर सदनीं येइना किं वाज ॥सेवीं नारसिंहराज०॥३॥
पद ७ वें -
गाइन प्रेम भरित नरहरी । मुख पाहिन सुख मज तो करी ॥धृ०॥
इहपरलोकीं जें उपयोगी साधीन तें झडकरीं ॥गा०॥१॥
त्याहुनि आणिक कोणि न मजला । निश्चय हा अंतरीं ॥गा०॥२॥
यात्या मागें काय फिरोनी । हेचि सुलभ चाकरी ॥गा०॥३॥
जगन्नाथ सुत कृष्ण तयाचा । प्रेम अधिक ज्या वरी ॥गा०॥४॥
पद ८ वें -
सदय हृदय नरसिंह मला दे । निज सुख ब्रह्म रसाचें ॥धृ०॥
संचित प्रारब्ध क्रियमाणें । जनन मरण सुखदुःख जिवाला भोग घडे हें साचें ॥स०॥१॥
हा भव बंध अविद्या योगें । पुत्र मित्र धन कलत्र नोहे शाश्वत दों दिवसांचें ॥स०॥२॥
तनय जगन्नाथाचा विनवी । कृष्ण कृपाघन नरहरि राया करिं हित निज दासाचें ॥स०॥३॥
पद ९ वें -
धन्य दिवस माझा आज । भेटला नरसिंह महाराज ॥धृ०॥
जन्म सफल नरहरिनें केला । साधुनि माझें काज ॥धन्य दिवस मा०॥१॥
चंचल हें मन वस्तू ठेवुनि । दिधलें त्याचें व्याज ॥धन्य दिवस मा०॥२॥
भक्त जनाचें कार्य कराया । किमपि न ये त्या वाज ॥धन्य दिवस मा०॥३॥
बोले कृष्ण जगन्नाथात्मज । नाचूं सांडुनि लाज ॥धन्य दिवस मा०॥४॥
पद १० वें -
पाहिन निज डोळां श्री नरहरिला ॥धृ०॥
प्रल्हादा कारणें, स्तंभ गाजविला जेणें । भक्तांसि भेटी देणे हेतु हा जया । नित्य नाम उच्चारणें, मज सौख्य कोटि गुणें, अंतरिंचा श्रम हरिला ॥पा०॥१॥
संसारीं गुंतणें, काय लाभ घडे येणें, नेणतां मूर्खपणें नासिलें वया । अंतियम लोकीं जाणें, नको नको ऐसें जिणें, नारसिंह मनीं धरिला ॥पा०॥२॥
श्री विष्णु स्मरणें, नित्यानंदिं मग्न होणें, भक्ति सुखा काय उणें, कृष्ण दास या । हरिसम आत्म खुणें, दाउनियां नारायणें, निवटिलें भव करिला ॥पाहिन निज डोळां श्री नरहरिला॥३॥
पद ११ वें -
तोचि नरहरि आजि पाहिला । बहुजन्मार्जित पाप ताप गेलें आपें आप । ऐसा प्रताप दाटे अंतरीं सुखरूप । येतां असुराचा कोप धरि भ्यासुर स्वरूप । स्तंभिं कड कड कडाडला । जो रव गगनीं घडाडला । त्रिलोक धाकें धडाडला ॥तो०॥१॥
सहस्र सूर्य लोप पावति तेजीं अमूप । देखे विकट रूप कांपे कानक कशिप । त्यासि देव घालि झेंप ओढुनियां झपाझप । अंकिं उताणा पाडिला, फड्फड् तो रिपु फाडिला, समूळ दुर्मद झाडिला ॥तो०॥२॥
प्रपंच हा अंध कूप, जेवीं कासवीचें तूप । अखंड ज्ञान दिप, नारसिंह विष्णु रूप । सांडुनि अज्ञान झोंप, भक्त प्रल्हाद समीप । नृसिंह दर्शन गोडिला, संसारभ्रम सोडिला, निज मनिं कृष्णें जोडिला ॥तो०॥३॥
पद १२ वें -
नरसिंह राजा ब्रह्म सनातन रे ॥धृ०॥
रौप्यहि नोहे दगडही नोहे । नोहे कांचन रे ॥न०॥१॥
या जड देहा फिरवि तयाचें करणें चिंतन रे ॥न०॥२॥
कृष्ण जगन्नाथात्मज याचें । करि पद वंदन रे ॥न०॥३॥
पद १३ वें -
श्री नारसिंह नमन तुला सदया ॥धृ०॥
सर्वां भूतीं आत्म विभूती । दावुनि हरिसि भया ॥श्री०॥१॥
अनुभव हा प्रल्हादासि महा । स्तंभीं ये उदया ॥श्री०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझा । निश्चय दृढ हृदया ॥श्री०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP