मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
महाकारण निरसन

महाकारण निरसन

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज


॥ श्रीगणेशायनमः ॥ अथ महाकारण निरसन ॥
महाकारण तो कसा । ऐक सांगतो तमासा । तीही देहा साक्षी असा । अभिमान धरितो ॥१॥
शून्य कारणदेहाचाही । साक्षी झालों मीचि पाहीं । कृत कृत्य होऊनि राही । परी तो जाण अज्ञानी ॥२॥
मुळीं ज्ञान ना अज्ञान । तेथें साक्षी कैचा कोण । देह विदेहाचें भान । तेंही जेथें न सरे ॥३॥
शून्यत्वाचा ये चपाटा । करी भ्रांति खटपटा । साक्षात्कारावीण खोटा । उगाचि तोंडें बडबडी ॥४॥
ज्ञानाग्नीचें प्रगटी करण । होतां पिंडाचें दहन । मग ब्रह्मांड भस्मोन । उरे उरी आपुली ॥५॥
ब्रह्मसाक्षात्कार ऐसें । शास्त्रीं नाव कीं तयास । आत्मा साक्षात्कार मिसें । अनुभवी बोलती ॥६॥
श्रवण मनन निदिध्यास । आत्म साक्षात्कारास । वेळ नाहीं परी अभ्यास । सद्गुरुही पाहिजे ॥७॥
दुर्लभ सद्गुरुची प्राप्ती । आत्म श्रवणास प्रचीती । एकांत अभ्यास निरुती । तिनीं जाणें दुर्लभ ॥८॥
सद्गुरु आणिक सत्शिष्य । सत्शास्त्र श्रवण अभ्यास । साधन शाखा चंद्रन्यायेस । सप्रतात निरूपण ॥९॥
ज्यांसी वैराग्य अंतर्बाह्य । साधनासी अती साह्य । त्यासी घडे साक्षात्कार्य । नाहीं तरी बडबड ॥१०॥
सर्वां साक्षी तोचि आत्मा । शास्त्र ऐसें बोले नेम । शास्त्र इंगितार्थ आत्मा । भ्रमिष्टासी नकळे ॥११॥
द्रष्टा तेंचि पर ब्रह्म । शास्त्रें बोलती संभ्रम । त्याचा विचार अनुक्रम । ऐक शिष्या सावध ॥१२॥
द्रष्टत्वाभिमान नसे । शुद्ध चैतन्य गवसे । दृष्ट नसतां द्रष्टत्व असे । शास्त्र ब्रह्म म्हणे त्या ॥१३॥
द्वैतावीण अद्वैताची । वार्ता बोलतां नयेची । शाखेवीण त्या चंद्राची । सूक्ष्म रेखा ना कळे ॥१४॥
दृष्य विरहित जें शुद्ध । घन चैतन्य प्रसिद्ध । त्यासी दृष्टत्व संबंध । कळावया बोलती ॥१५॥
महाकारणीं जो पडे । त्यासी ज्ञान धड पुढें । झालें ह्मणूनी पहुडे । सिद्धत्वाच्या योग्यते ॥१६॥
आतां ब्रम्ह जाहलों मी । ऐश्य संभ्रमाच्या भ्रमीं । पडूनि रहातसे कामीं । चित्त त्याचें गुंतलें ॥१७॥
ब्रम्हीं नाहीं दुजे पण । सर्व ब्रह्मचि आपण । कर्ता करविता भगवान । अच्यावच्या बडबडी ॥१८॥
विषय संपादना करितां । ब्रह्म झालें म्हणे आतां । मज काहीं नाहीं चिंता । परब्रह्म मी झालों ॥१९॥
महा प्रसाद न होतां । फिटे ना ती वाचाळता । गेल्याविण प्रपंचता । कैसी सरे सांगा कीं ॥२०॥
स्वप्नीं जहाला ब्रह्मज्ञानी । कृतकृत्य झाला जनीं । त्यासी मानिला मुर्खानीं । तैसा ब्रह्म झाला तो ॥२१॥
न चिंतितां देह बुद्धी । आत्मत्वाची तैसी सिद्धी । झाली तरीच उपाधी । महाकारण निवारे ॥२२॥
विषय संपादन करितां । सिद्ध झालों ह्मणे आतां । मज कांहीं नाहीं चिंता । परब्रह्म मी झालों ॥२३॥
आतां असो हें बोलणें । वाचे किती करूं शीण । जातां वैष्णवां शरण । आत्म शोध लागतो ॥२४॥
इति श्रीलघुआत्ममथने गुरुशिष्य कथने महाकारण देह निवारण पंचम पद समाप्तः ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP